एका १८-१९ वयाच्या विद्यार्थ्यांसाठी जो कमावता नाही, पण ५००-१००० रुपये दरमहा गुंतवू शकतो, अशा गुंतवणूकदारासाठी तुम्ही कुठला म्युच्युअल फंड सुचवाल.

हर्षदा पी. (ई-मेलवरून)

तुम्ही या वयात गुंतवणुकीचा विचार केल्याबद्दल सर्वप्रथम तुमचे अभिनंदन. लहान वयात गुंतवणुकीचा विचार केल्यामुळे तुमच्याकडे गुंतवणुकीसाठी बराच वेळ आहे. खरी संपत्ती निर्मिती ही दीर्घ मुदतीतच होते. आता तुमच्या मूळ प्रश्नाकडे वळूया. जर तुमची म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची ही पहिलीच वेळ आहे तर तुम्ही सुरुवातीला एक अनुभव म्हणून एखाद्या बॅलंस्ड फंडापासून सुरुवात करू शकता. कारण बॅलंस्ड फंडात काही प्रमाणात कर्ज रोख्यांमध्ये गुंतवणूक केलेली असते.

त्यामुळे समभागसंलग्न (इक्विटी) फंडांपेक्षा बाजारात होणाऱ्या चढ-उताराचा परिणाम हा काहीसा कमी असतो. पहिला अनुभव हा कधीही महत्त्वाचा असतो. मानसशास्त्रानुसार पहिल्या अनुभवातून होणारे परिणाम हे माणसाच्या मनात दीर्घकाळ टिकून राहतात. म्हणून म्युच्युअल फंडात सुरुवात करण्यासाठी बॅलंस्ड फंड हा एक योग्य पर्याय ठरू शकतो.

आता तरुण वयातच गुंतवणूक सुरू करण्याचे महत्त्व किती आहे हे समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊ या.

जर एखाद्या गुंतवणूकदाराने १९९६ साली त्याच्या वयाच्या २०व्या वर्षी रिलायन्स ग्रोथ फंडात दरमहा १००० रुपये गुंतवले असते आणि आज त्याच्या वयाच्या ४१व्या वर्षी त्याच्या गुंतवणुकीचे मूल्य हे ६३,९३,०८५ इतके असते. म्हणजेच केलेली गुंतवणूक ही फक्त २,६१,००० तर त्यावर मिळालेला परतावा पकडून आजचे मूल्य हे जवळजवळ ६४ लाख इतके असते. त्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय घेत आहात म्हणून परत पुन्हा एकदा अभिनंदन आणि गुंतवणुकीसाठी शुभेच्छा.

माझी बॅलन्स्ड फंडात गुंतवणूक आहे. त्यामार्फत मिळणाऱ्या लाभांशामधील काही रक्कम मी वर्षभरातच गुंतवणुकीतून काढण्यास सुरुवात केली आहे. अशा लाभांश उत्पन्नावर मला कर भरावा लागू शकतो काय?

आशा पाटील, अंबरनाथ

तुमचा फंड हा जरी बॅलन्स्ड फंड असला तरी मूळात समभागसंलग्न अर्थात इक्विटी फंड आहे. आणि इक्विटी फंडांमार्फत मिळणारा लाभांश हा पूर्णत: करमुक्त असेल. तुम्ही बॅलन्स्ड फंडाच्या ‘डिव्हिडंड पेआऊट’ पर्यायात गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला मिळणारा लाभांश हा पहिल्या दिवसापासून करमुक्त ठरतो. बॅलन्स्ड फंडाला हायब्रीड फंड असेही अनेकदा म्हटले जाते.

असा फंड प्रकार म्हणजे समभाग आणि रोख्यांचे मिश्रण असते. म्हणजे संबंधित फंडातील गुंतवणूक ही कंपन्यांच्या समभागांमध्ये आणि त्याचबरोबर रोख्यांमध्येही होत असते. सर्वसाधारणपणे ६०:४० अशा प्रमाणात ही गुंतवणूक असते. जोखीमेचे संतुलन आणि तसेच स्थिर स्वरूपाच परतावा असा दुहेरी लाभ यामार्फत मिळू शकतो.

  • वाचकांच्या म्युच्युअल फंडविषयक प्रश्नांचे निवारण करणारे मार्गदर्शन आपलेही म्युच्युअल फंडविषयक काही प्रश्न असतील तर, आम्हाला पाठवा: arthmanas@expressindia.com