दरमहा ३,५०० कोटींचा निधी या ‘सिप’ खात्यांच्या माध्यमातून म्युच्युअल फंडात गुंतविला जात आहे. फंड घराणी व ‘सेबी’ला ही बाब कृतार्थ वाटणे साहजिक असले तरी, म्युच्युअल फंडातून निधीचा ओघ वाढविताना गुंतवणूकदारांना अर्थसाक्षर करण्याचे राहून गेल्याचेही दुर्दैवाने निदर्शनास येत आहे.
राजा विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. तलवार उपसून पुन्हा तो झाडावर चढला अन् फांदीवर लटकणाऱ्या प्रेताला खांद्यवर घेऊन मौनात चालू लागला. त्यासरशी प्रेतामधला वेताळ पुन्हा एकदा जागा होऊन विक्रमादित्यास प्रश्न विचारू लागला. ‘‘राजा! देशातील गुंतवणूकदरांच्या ‘सिप’ सुरू असलेल्या खात्यांनी एक कोटीचा टप्पा पार केल्याने म्युच्युअल फंड उद्योगाने एक मैलाचा दगड पार केल्याची भावना संबंधित बोलून दाखवत आहेत. भारतातील गुंतवणूकदार अर्थसाक्षर झाल्याचे हे द्योतक आहे, असे तुला वाटत नाही काय? या माझ्या प्रश्नाचे समाधानकारक अन् योग्य उत्तर तुला माहिती असूनही तू जर ते दिले नाहीस तर तुझ्या डोक्याची शंभर शकले होऊन तुझ्याच पायावर लोळू लागतील,’’ वेताळ म्हणाला.
‘‘म्युच्युअल फंडांच्या सक्रिय ‘सिप’ खात्यांनी १ कोटीचा टप्पा पार केला. ३१ मार्च २०१६ रोजी सक्रिय सिप खात्यांची संख्या ९८.५७ लाख होती तर ३१ मार्च २०१५ रोजी सक्रिय सिप खात्यांची संख्या ७३ लाख होती. दरमहा ३,५०० कोटींचा निधी या ‘सिप’ खात्यांच्या माध्यमातून म्युच्युअल फंडात गुंतविला जात आहे. म्युच्युअल फंडाची शिखर संघटना ‘अ‍ॅम्फी’ला ही बाब कृतार्थ वाटणे साहजिक असले तरी, म्युच्युअल फंडातून निधीचा ओघ वाढविताना गुंतवणूकदारांना अर्थसाक्षर करण्याचे राहून गेल्याचेही निदर्शनास आले आहे. एका अर्थविषयक वार्ताकन करणाऱ्या वृत्तपत्र व एक मार्केट रिसर्च एजन्सी यांच्या संयुक्त विद्यमाने केलेल्या एका सर्वेक्षणात ही बाब उघड झाली आहे. मागील अडीच महिन्यांपासून चाललेल्या व १५ शहरांतून केलेल्या सर्वेक्षणाचे निर्णय म्युच्युअल फंडांना नक्कीच विचार करायला लावणारे आहेत. या सर्वेक्षणात भाग घेतलेल्या ८६५ गुंतवणूकदारांपैकी ९१% पुरुष व ९% स्त्री गुंतवणूकदार होते. सर्वेक्षणात भाग घेतलेल्यापैकी ४.८% लोकांना शेअर बाजार व म्युच्युअल फंड हे मोठय़ा घोटाळ्यांचे भाग असून ‘सेबी’ नावाचा कठोर नियंत्रक आहे याची माहिती नव्हती (म्युच्युअल फंड वितरकांनी २००० मध्ये म्युच्युअल फंडाच्या ‘टेक स्कीम्स’ तर २००७ मध्ये ‘इन्फ्रा स्कीम्स’ आक्रमकपणे विकल्या हे गुंतवणूकदार त्या ‘मिस- सेलिंग’चे बळी ठरले असल्याची शक्यता आहे). यापैकी जवळजवळ प्रत्येकाने म्युच्युअल फंडाबाबत ऐकले होते. केवळ ८.७% लोक म्युच्युअल फंडाबाबत अनभिज्ञ होते. यावरून म्युच्युअल फंडांना किती मोठा टप्पा गाठायचा आहे याची कल्पना येईल. सर्वेक्षणात भाग घेतलेल्यांपैकी ६८% गुंतवणूकदार चाळिशीच्या आतले होते. उत्पन्नाचे पाच गट करून या गटांना सर्वेक्षणांत समान प्रतिनिधित्व दिले गेले,’’ राजा म्हणाला.
‘‘या सर्वेक्षणात भाग घेतलेल्या गुंतवणूकदारांपैकी ३७% लोकांना ‘सिप’ सुरू असलेल्या आपल्या म्युच्युअल फंडाच्या योजनेचे नांव सांगता आले नाही. २७% लोकांना म्युच्युअल फंड गुंतवणुकीत जोखीम असणाऱ्या समभागात गुंतवणूक करतात असे वाटले मात्र म्युच्युअल फंड रोख्यांतसुद्धा गुंतवणूक करतात हे ठाऊक नव्हते. मध्यस्थाशिवाय गुंतवणूक करता येणारे ‘डायरेक्ट प्लान’सुद्धा आहेत हे सर्वेक्षणात भाग घेतलेल्या ४५% लोकांना ठाऊक नव्हते. या सर्वेक्षणांत भाग घेतलेल्यांपैकी ६७.४% लोकांना बँकांच्या मुदत ठेवी व आवर्ती ठेवींवर मिळणारे व्याज हे करपात्र असते व रोखे गुंतवणूक करणाऱ्या म्युच्युअल फंडांच्या तीन वर्षांनंतर विक्रीतून प्राप्त भांडवली नफ्यावर इंडेक्ससेशनचा लाभ घेता येतो, परिणामी अत्यंत कमी कर भरावा लागतो हेही ठाऊक नव्हते,’’ राजा हताशपणे म्हणाला.
‘‘म्युच्युअल फंडांच्या ‘डायरेक्ट प्लान’मध्ये गुंतवणूक केलेल्या व स्वत:ला अर्थसाक्षर म्हणविणाऱ्या गुंतवणूकदारांनाही त्यांनी गुंतवणूक केलेल्या फंडाच्या पहिल्या तीन गुंतवणुका सांगता आल्या नाहीत. या सर्वेक्षणात भाग घेतलेल्यांपैकी ४१% लोकांनी ‘डायरेक्ट प्लान’मध्ये गुंतवणूक केली असून हे गुंतवणूकदार कोणाच्या तरी सांगण्यावरून गुंतवणूक करीत होते. व सल्ला देणाऱ्यांची पात्रता, शैक्षणिक अर्हता त्यांना ठाऊक नव्हती. यापैकी अनेकांना ‘सिप’चे पूर्णरूप सांगता आले नाही. ‘सिप’चे फायदे, चक्रवाढ परिणाम, वगैरे फायदे या तथाकथित अर्थसाक्षर मंडळींच्या गावीही नव्हते. सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे बाजारात केलेल्या गुंतवणुका जोखमीच्या अधीन असतात व ‘सिप’ गुंतवणूक केल्याने केवळ फायदाच होतो असा या मंडळीचा समज होता,’’ राजा गालातल्या गालात हसत म्हणाला.
‘गुंतवणूक करण्यापूर्वी माहितीपत्रक काळजीपूर्वक वाचा’ हा सेबीचा इशारा वाया गेला हेच सांगणारा व सेबी अतिकठोर आहे असे मानणाऱ्यांना अर्थसाक्षरतेची गरज पुन्हा अधोरेखित करणारे या सर्वेक्षणाचे हे निष्कर्ष आहेत, हे नक्की.. असे म्हणताच राजाचे मौन भंगल्यामुळे वेताळ शवासहित गायब झाला आणि झाडावर जाऊन बसला.
पुंगीवाला- gajrachipungi @gmail.com