तृप्ती राणे

गेली काही वर्ष सतत खाली येणाऱ्या व्याज दरांमुळे डेट (रोखे संलग्न) म्युच्युअल फंडातील गुंतवणूक आकर्षक वाटू लागली होती. शिवाय त्यांच्यामध्ये तीन वर्षांपेक्षा जास्त काळासाठी केलेली गुंतवणूक ही करकार्यक्षम असल्यामुळे अनेक जणांनी त्यातून हा दुहेरी फायदा लक्षात घेतला आणि पैसे घातले. सगळे तोवर चांगले चालले होते जोवर ‘आयएल अँड एफएस’चा घोटाळा प्रकाशात नव्हता आला! त्या नंतर मात्र डेट फंड सुद्धा धोक्याचे असतात या गोष्टीची जाणीव गुंतवणूकदारांना झाली! पाठोपाठ झी, दिवाण हाऊसिंग, अनिल अंबानींच्या काही कंपन्या यांनी अजून झटके दिले आणि डेट फंड पडले! पुन्हा एकदा हे गुंतवणूकदार मुदत ठेवींकडे वळणार तितक्यात पीएमसी बँकेच्या प्रकरणाने सगळ्यांना संभ्रमात टाकले. मुदत ठेव की डेट फंड? कसा निर्णय घ्यायचा? म्हणून आजचा हा लेख डेट म्युच्युअल फंड कसा, कधी आणि केव्हा निवडावा या संदर्भात!

१) जोखीम व्यवस्थापन:

सर्वप्रथम हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की, जोखीम मुदत ठेवीमध्येही आहे (रिइन्व्हेस्टमेंट रिस्क) आणि डेट फंडांमध्ये सुद्धा (मार्केट रिस्क). पडत्या व्याज दरांमुळे मुदत ठेवीतील गुंतवणूक ही नुकसानकारक होते. या बाबतीत डेट म्युच्युअल फंड सरस ठरतात. परंतु, वाढणाऱ्या व्याज दरांमुळे डेट म्युच्युअल फंडांना जास्त त्रास होऊ शकतो. जर त्यांचा पोर्टफोलिओ कमी व्याज आणि जास्त मुदत असणाऱ्या गुंतवणुकीचा असेल तर! तेव्हा गुंतवणूक करण्यापूर्वी डेट फंडाचा पोर्टफोलिओ नक्की तपासा आणि व्याज दरांची दिशा पाहून घ्या.

२) परतावा की सुरक्षित गुंतवणूक:

डेट म्युच्युअल फंड हे गुंतवणूक सुरक्षित ठेवण्यासाठी आहेत, जोखीम घेण्यासाठी नाही असे माझे वैयत्तिक मत आहे. तेव्हा थोडे परतावे जास्त मिळतील म्हणून जास्त जोखीम असणाऱ्या डेट फंडात पैसे घालणे हे मला योग्य वाटत नाही. कारण डेट फंडाने केलेली गुंतवणूक जर वेळेवर परत मिळाली नाही तर तिथे मात्र गुंतवणूकदाराला नुकसान सोसावे लागते. कॉर्पोरेट बॉण्ड फंड, क्रेडिट रिस्क फंड निवडताना जरा जपून गुंतवणूक करा. जोखीम घ्यायची तर इक्विटीमध्ये घ्या.

३) फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅन्स (एफएमपी):

फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅन्स (एफएमपी) मध्ये गुंतवणूक करताना हे लक्षात घ्या की, तुम्हाला हवे तेव्हा पैसे काढता येत नाहीत. जरी हे फंड शेअर बाजारात घेतले आणि विकले जातात तरी हे व्यवहार फार कमी होतात. शिवाय एफएमपी नक्की कुठल्या प्रतीच्या गुंतवणूक करत आहे हे बघणे खूप महत्वाचे आहे. कारण त्यांची जोखीम तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त असू शकते. मागे ‘झी’च्या प्रकरणामुळे एचडीएफसी आणि कोटक हे दोन्हीही म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना वेळेवर पैसे परत देऊ शकले नाहीत.

४) गुंतवणूक कालावधी:

डेट फंड हे एक दिवसांपासून ते ११/१२ वर्षांपर्यंतच्या गुंतवणुकीसाठी असतात. तेव्हा तुमचा गुंतवणूक कालावधी आणि फंडाचा कालावधी यांचा समन्वय साधणे महत्वाचे आहे. परंतु जेव्हा व्याज दरांची नक्की दिशा ठरवता येत नसेल, तेव्हा दीर्घकाळ गुंतवणूक असणारे फंड टाळावे. ओव्हरनाईट फंड, लिक्विड फंड, अल्ट्रा शॉर्ट डय़ुरेशन, लो डय़ुरेशन फंड हे एक ते  १२ महिन्यांसाठी, शॉर्ट डय़ुरेशन फंड हे एक ते तीन वर्ष, मीडियम डय़ुरेशन हे तीन ते पाच वर्ष आणि लॉँग डय़ुरेशन हे पाच वर्षांपुढील गुंतवणुकीसाठी वापरावे. गिल्ट फंड, बँकिंग आणि पीएसयू डेट फंडांमध्ये गुंतणवूक करताना ही गोष्ट नक्की ध्यानात ठेवा!

५) कर नियोजन:

गुतंवणूकदाराने पर्याय निवडताना जसे आर्थिक ध्येय, जोखीम आणि गुंतवणूक कालावधी लक्षात ठेवणे गरजेचे आहे, तेवढाच विचार करदायित्वाचा सुद्धा करणे आहे. डेट फंडांमधून डिव्हीडंड घेऊ नये कारण त्यांचा डिव्हीडंड डिस्ट्रिब्युशन टॅक्स (डीडीटी) हा २९.१२ टक्के इतका आहे. जर तुम्ही ३० टक्के स्लॅबच्या आत असाल, तर मग नकळतरित्या डिव्हीडंड मिळवण्यासाठी जास्त कर भरताय! त्या ऐवजी ग्रोथ पर्याय निवडून, तीन वर्षांनंतर पैसे काढल्यास २० टक्के कर (इंडेक्सेशन पश्चात) आणि त्याआधी करदात्याच्या स्लॅबनुसार – हे ध्यानात ठेवून मग गुंतवणूक करावी. कधी कधी बँकेत मुदत ठेवीत पैसे ठेवणे फायद्याचे ठरतात!

तर, या दिवाळीपासून पुन्हा एकदा नव्याने गुंतवणुकीची सुरुवात करा. परताव्याच्या मागे न धावता, आपली गरज आणि जोखीम क्षमता तपासा. आधी आर्थिक नियोजन, आणि मग त्यानुसार गुंतवणूक हे ध्यानात ठेवा. घरातील आर्थिक साक्षरता वाढवा, सर्व पिढय़ांमध्ये संवाद होऊ द्या. जे माहित नाही ते ज्ञान मिळवायचा प्रयत्न करा. या सर्व प्रयत्नांना यश मिळो आणि दिवाळीचा लखलखाट कायम तुमच्या आयुष्यात राहो हीच सदिच्छा!

(लेखिका सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार )

trupti_vrane@yahoo.com