राधिका गुप्ता

आपली आर्थिक उद्दिष्टे साधण्याची गुरुकिल्ली म्हणजे एक वैविध्यपूर्ण गुंतवणूक पोर्टफोलिओ तयार करणे. परताव्याला असलेल्या सर्व जोखमांना विविध उपलब्ध साधनांमध्ये विभागणारी गुंतवणूक करून हे साधले जाऊ शकते. सर्वसाधारणपणे समभाग गुंतवणुकीला दीर्घकालीन संपत्ती निर्मितीचे माध्यम मानले जाते तर रोख्यांतील गुंतवणुकीद्वारे स्थिर परतावा आणि नकारात्मक बाजूच्या धोक्यापासून संरक्षण मिळणे अपेक्षित असते. परिणामी, पारंपरिक समज असा आहे की रोख्यांच्या तुलनेत समभागांमध्ये जोखमीची पातळी उच्च असते. तथापि हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की रोख्यातील गुंतवणूक जोखीममुक्त नसते आणि रोख्यांच्या वेगवेगळ्या साधनांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या जोखीम असतात.

रोखे गुंतवणुकीतील जोखीम:

यातील मुख्य जोखीम म्हणजे पत जोखीम (क्रेडिट रिस्क), व्याज दर जोखीम (इंटरेस्ट रेट रिस्क) आणि तरलतेची जोखीम (लिक्विडिटी रिस्क)

*  पत जोखीम : ही जोखीम, जारीकर्ता जोखीम किंवा डिफॉल्टच्या जोखमीच्या संदर्भात आहे. जारीकर्ता देय जबाबदारी पूर्ण न करूशकण्याच्या संभाव्यतेतून ती निर्माण होते. ज्यातून गुंतविलेल्या रकमेचे संपूर्ण मूल्य गुंतवणूकदाराला मिळविता येणार नाही.

*  व्याज दर जोखीम : रोख्यांच्या किमतीत आणि व्याज दरांमध्ये व्यस्त स्वरूपाचा संबंध असतो. म्हणजे व्याजदर वाढल्यास रोख्यांची किंमत कमी होते आणि व्याजदर कमी झाल्यास रोख्यांची किंमत वाढते. याचा अर्थ असा आहे की व्याजदर वाढल्यास, गुंतवणुकीचे मूल्य कमी होईल, जे अर्थातच पोर्टफोलिओला अस्थिरता देऊ  शकेल.

*  तरलतेची जोखीम : याचा संदर्भ रोख्यांची खरेदी आणि विक्री करण्याच्या सहजतेशी आहे.

आदर्श उपाय कोणता?

नि:संशयपणे, एक गुंतवणूकदार म्हणून तुमच्याकडे, डेट म्युच्युअल फंड ते बॉण्ड्ससारख्या, विविध प्रकारच्या रोखे साधनांमध्ये गुंतवणूक करण्याचा पर्याय आहे. तथापि, टार्गेट मॅच्युरिटी डेट इंडेक्स फंड वरीलपैकी अनेक जोखमांचा सामना करण्यास मदत करणारा एक आदर्श उपाय आहे. हा कर्ज गुंतवणुकीचा एक असा पर्याय आहे ज्यात बॉण्ड्सची वैशिष्टय़े आहेत, म्हणजे, परिपक्वता मुदतीपर्यंत ठेवल्यास, अंदाजानुसार परतावा मिळणे इतकेच नव्हे तर त्यात तरलतेचे अतिरिक्त वैशिष्टय़देखील आहे. टार्गेट मॅच्युरिटी डेट इंडेक्स फंडाची मूलभूत गुंतवणूक पीएसयू बाँड्स आणि सरकारी रोख्यांत असल्यामुळे एकाच फंडाद्वारे अनेक फायदे मिळतात.

फायदे काय?

इंडेक्स फंडात गुंतवणूक करणे हे थेट बाँड्समधील गुंतवणुकीपेक्षा अधिक कर-कार्यक्षम आहे. त्याचबरोबर, इंडेक्स फंडांवर ‘इंडेक्सेशन’च्या फायद्यासह कर आकारला जातो. ज्यामुळे गुंतवणुकीच्या परताव्यावरील करदायित्व हे तुलनेने कमी होऊ शकते. ‘ईटीएफ’च्या विपरीत, इंडेक्स फंडाचे युनिट विकत घेण्यासाठी किंवा विकण्यासाठी डिमॅट खात्यातून व्यवहार करण्याची गरज नाही. कोणत्याही म्युच्युअल फंड योजनेप्रमाणेच फंड घराण्यांद्वारे याचे युनिट्स खरेदी केले जाऊ शकत असल्याने, हे व्यवहार सुलभ व कमी खर्चीक असतात.

एक गुंतवणूकदार म्हणून, तुलनेने सुरक्षित आणि मूल्य वाढवणाऱ्या योजनेत गुंतवणुकीचा विचार करीत असाल तर टार्गेट मॅच्युरिटी डेट इंडेक्स फंडांना निश्चितपणे विचारात घेतले जावे.

(लेखिका एडेल्वाइस अ‍ॅसेट मॅनेजमेंट लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालिका व मुख्याधिकारी असून, लेखात त्यांनी व्यक्त केलेली मते पूर्णत: वैयक्तिक आहेत.)