आशीष ठाकूर

गेल्या लेखात उल्लेख केलेला चीनपुरता मर्यादित असलेला करोना विषाणू अवघ्या दहा दिवसांत अमेरिका, जर्मनी, दक्षिण कोरिया, इराण, युरोप खंडात  पसरत गेल्याचे दिसले. या आणि नंतरच्या घडामोडींचा झपाटाही इतका वेगवान की ‘मन मनास उमगत नाही’ अशा तऱ्हेने काही कळून-आकळून घेण्यास सवडही उरली नाही. या पार्श्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.

शुक्रवारचा बंद भाव :

सेन्सेक्स : ३८,२९७.२९ /

निफ्टी : ११,२०१.८०

जेव्हा करोना विषाणू चीन व आशिया खंडापुरताच सीमित होता, तेव्हा धातू उद्योग, वाहन उद्योग, हॉटेल, पर्यटन उद्योग ही प्रभावित झालेली आपली उद्योग क्षेत्रे होती. पण आता करोना विषाणू हा अमेरिका व युरोप खंडात पसरत असल्याने संगणक व माहिती तंत्रज्ञान क्षेत्रालादेखील त्याची झळ पोहचायला लागली आहे.

येणाऱ्या दिवसात निर्देशांकाला सेन्सेक्सवर ३७,२०० आणि निफ्टीवर ११,००० चा आधार आहे. भविष्यात निर्देशांक हा स्तर राखण्यात यशस्वी ठरल्यास मंदीच्या वातावरणातील तेजीची झुळूक अपेक्षित असून निर्देशांकाचे प्रथम वरचे लक्ष्य सेन्सेक्सवर ३८,७०० आणि निफ्टीवर ११,५०० असे असेल. त्या नंतरचे लक्ष्य हे सेन्सेक्सवर ३९,८०० आणि निफ्टीवर ११,७०० असेल. ही उद्दिष्टे साध्य झाल्यानंतर फिरून मंदीचे आवर्तन सुरू होऊन निर्देशांकांचे खालचे लक्ष्य हे सेन्सेक्सवर ३६,४०० आणि निफ्टीवर १०,८०० असे असेल.

जाहीर झालेले कंपन्यांचे वित्तीय निकाल व त्यांचे विश्लेषण..

*  टाटा एलेक्सी लिमिटेड

या स्तंभातील ६ जानेवारीच्या लेखातील समभाग होता टाटा एलेक्सी लिमिटेड तिमाही निकालाची नियोजित तारीख ही १३ जानेवारी होती. ३ जानेवारीचा बंद भाव ८३८ रुपये होता. निकालानंतरचा महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर ८०० रुपये होता. गुंतवणूकदारांच्या मानसिक तयारीसाठी तिमाही निकालाअगोदर आठ दिवसांचा कालावधी होता. तिमाही वित्तीय निकाल जाहीर झाल्यानंतर, समभागाचा बाजारभाव महत्त्वाच्या केंद्रबिंदू स्तरावर टिकला, तर तिमाही निकाल चांगला, अन्यथा वाईट असे सुचविले गेले होते.

प्रत्यक्ष निकालाअगोदरच्या या विश्लेषणात, जर वित्तीय निकाल उत्कृष्ट असेल तर ८०० रुपयांचा स्तर राखत १,००० रुपयांचे वरचे लक्ष्य सूचित केले होते. टाटा एलेक्सी कंपनीचा प्रत्यक्ष निकाल हा उत्कृष्ट होता. ८०० रुपयांचा स्तर राखत १२ फेब्रुवारीला १,०९८ रुपयांचा उच्चांक नोंदवत आपले वरचे लक्ष्य साध्य केले. ज्या वाचकांकडे टाटा एलेक्सी लिमिटेड कंपनीचा समभाग दीर्घ मुदतीच्या गुंतवणूक धारणेअंतर्गत आहेत त्यांनी ते राखून ठेवले, तर अत्यल्प मुदतीच्या गुंतवणूकदारांना अल्पावधीत १९ टक्क्यांचा परतावा   मिळाला.

हे सर्व तेजीच्या दिवसात ठीक आहे हो! पण सध्या सारख्या ‘रक्तपाता’च्या दिवसात टाटा एलेक्सीचा बाजारभाव महत्त्वाच्या केंद्रबिंदू स्तरावर टिकला का? तर आजही टाटा एलेक्सी लिमिटेड कंपनीचा समभाग ८०० रुपयांचा महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर राखून आहे आणि त्याचा २८ फेब्रुवारीचा बंद बाजार भाव हा ८८२ रुपये आहे.

*  इन्फोसिस टेक्नॉलॉजीज लिमिटेड

या लेखातील दुसरा समभाग होता इन्फोसिस टेक्नॉलॉजीज लिमिटेड. तिमाही निकालाची नियोजित तारीख ही १० जानेवारी होती आणि ३ जानेवारीचा बंद भाव ७४६ रुपये होता. निकालानंतरचा महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर ७२५ रुपये होता. लेखात म्हटल्याप्रमाणे जर निकाल उत्कृष्ट असेल तर ७२५ रुपयांचा महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर राखत प्रथम वरचे लक्ष्य हे ७६० रुपये सूचित केले होते. इन्फोसिसचा प्रत्यक्ष निकाल हा उत्कृष्ट होता. ७२५ रुपयांचा स्तर राखत २९ जानेवारीला ७९२ रुपयांचा उच्चांक नोंदवत त्याने आपले पहिले वरचे लक्ष्य साध्य केले. आताच्या पडझडीच्या दिवसात इन्फोसिसचा समभाग ७२५ रुपयांचा महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर राखून आहे आणि त्याचा २८ फेबुवारीचा बंद भाव हा ७३१ रुपये आहे.

* लेखक भांडवली बाजार विश्लेषक आहेत.

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.