‘मंदिरात जाताना पूजेसाठी सर्वोत्तम वस्तू आपण घेऊन जातो. त्याविषयी कुठलीच तडजोड नसते.’ हाच भाव प्रत्येकाने आपल्या कामाप्रति ठेवला तर मंदी, बाजारपेठेतील स्पर्धा, व्यावसायिक अडीअडचणी अशा कोणत्याही संकटावर सहजपणे मात करता येईल. आपलं काम बोलेल.. सर्वोत्तम कामाचा ध्यास पॅटको प्रिसिजन कम्पोनन्ट्सला आज वार्षिक ७० कोटींच्या उलाढालीपर्यंत घेऊन गेला आहे. गुणवत्तेच्या बळावर कंपनीला जगभरातून यांत्रिकी सुटे भाग वा तत्सम घटकांच्या निर्मितीच्या ऑर्डर मिळत आहेत. यामागे पॅटकोचे प्रवर्तक रवींद्र पाटील यांची कामावरील निष्ठा आहे.

असे काम करायचे की तेच सर्व काही बोलेल.. उद्योगातील यशाचे रहस्य रवींद्र पाटील हा दाखला देऊन उलगडतात. पाटील हे मूळचे कोल्हापूरच्या मानगावचे. त्यांचे आई-वडील म्हणजे शिक्षण वर्तुळात नावाजलेले व्यक्तिमत्त्व. पश्चिम महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे मोलाचे योगदान होते. वडील डी. ए. पाटील हे प्राचार्य तर आई शिक्षिका होती. गावात त्यांच्याविषयी आदरयुक्त दरारा होता. रवींद्र पाटील यांनी अभियांत्रिकी शिक्षणाची वाट पकडली. मनात उद्योगाचे स्वप्न होते. पण, शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नातेवाईकांनी नोकरीचा आग्रह धरला. मुंबई-पुण्यात नोकरीचा शोध सुरू झाला. कमवायचे आणि त्यातून उद्योगासाठी भांडवल जमवायचे, असा निश्चय करत ते कामाला लागले. मुंबईत खासगी कंपनीत अभियंता म्हणून नोकरी मिळाली. यांत्रिकी कामातून बरेच काही शिकायला मिळाले. नवीन शिकण्याचा ध्यास त्यांच्या सहकाऱ्यांना अस्वस्थ करायचा. मुंबई महापालिकेत काम करतानाही तसाच अनुभव आला. ही संस्कृती स्वभावाला मानवणारी नव्हती. यामुळे नोकरीचा राजीनामा देऊन त्यांनी पुन्हा आपले गाव गाठले. वडिलांशी चर्चा करून कोल्हापूर येथील औद्योगिक वसाहतीत १९८९ मध्ये शिरोली येथे भूखंड घेतला. कंपनी उभारण्यासाठी सहा लाखांचे भांडवल लागणार होते. पण त्यांच्या हाती केवळ अडीच लाख रुपये होते. उर्वरित रक्कम जमवायचा प्रश्न होता. यावेळी काही नातेवाईक, मित्र मंडळींनी मदतीचा हात पुढे केला. हे भांडवल अन् सोबतीला चार कामगार या बळावर काम सुरू झाले.

Chillar Party, Chillar Party Celebration Twelfth Anniversary, Special Children Film Screening , Chillar Party with Special Children Film Screening, Special Children Film Screening in Kolhapur, Kolhapur news, children special film Kolhapur, Kolhapur news, Chillar Party news, marathi news,
चिल्लर पार्टीचा बारावा वर्धापन दिन दुर्गम वाड्यावस्त्यांतील मुलांसोबत
Centers Discrimination about onion export Know what is Farmers Association Onion Growers Allegation
कांदा निर्यातीबाबत केंद्राचा दुजाभाव? जाणून घ्या, शेतकरी संघटना, कांदा उत्पादकांचा आरोप
Nashik District Consumer Forum,
नाशिक जिल्हा ग्राहक मंचातील दोन कर्मचारी लाच घेताना जाळ्यात, ५०० रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले
Salary of West Vidarbha Higher Education Department employees finally deposited
पश्चिम विदर्भातील उच्च शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन अखेर जमा; ‘लोकसत्ता’च्या वृत्तानंतर प्रक्रियेला वेग

यांत्रिकी हा आवडीचा विषय. बाजारपेठेतील गरजांचा अभ्यास केल्यावर प्रत्येक ग्राहकाची गरज वेगळी असल्याचे लक्षात आले. त्यांना अपेक्षित डिझाइननुसार वस्तू, सुटे भाग, घटक (कम्पोनंन्ट्स) करून देण्याचे काम सुरू झाले. त्यात कोणतीही तडजोड त्यांना मान्य नव्हती. ‘बाजारपेठ कुठलीही असो, कामं भरपूर आहेत. तुम्ही एखाद्याकडे काम मागितले की, जे काम आजवर कोणी करू शकले नाही, असं काम तो तुमच्याकडे देतो. हे काम करून दाखवं नाहीतर कामाचं विचारू नको अशी इथली रीत आहे..’ बाजारपेठेतील ही आव्हाने पेलत कंपनीने अल्पावधीत वाहन, इलेक्ट्रिक, सेन्सर्स, ऑटोमेशन आदींशी निगडित मागणीनुसार उत्पादने तयार करण्यास सुरुवात केली.

प्रारंभीच्या दहा वर्षांत दोन, तीन वेळा मंदीला तोंड द्यावे लागले. १९९७ च्या आर्थिक मंदीत बडय़ा वाहन उद्योगाने काम बंद केले. कामगारांचे पगार, भांडवलासाठीची उसनवार असे सर्व मिळून त्यांच्या डोक्यावर ५० लाखांचे कर्ज होते. अनेक कामे बंद झाली. पुढे काय करायचे, हा प्रश्न सतावत असतांना काही मित्रांच्या सांगण्यावरून त्यांनी नाशिकची वाट पकडली. हा निर्णय त्यांच्या उद्योगाला नवीन कलाटणी देणारा ठरला.

प्रत्येक चुकीने धडे दिले!

अडीच, तीन दशकातील हा प्रवास सोपा नव्हता. उद्योगाशी निगडित परवाने मिळवताना शासनदरबारी अडचणी आल्या. त्याला आपण टाळू शकत नाही. आपलं काम नेटाने करावे, कागदपत्रांची पूर्तता असेल तर उशिराने का होईना काम होते यावर पाटील यांचा विश्वास. प्रत्यक्ष कामातील अडचणी वेगळ्याच होत्या. उत्पादनासाठी नियमित गरजेपेक्षा कच्चा माल २५ टक्के अधिक प्रमाणात ठेवला जातो. जेणेकरून कधीही मागणी आली तर ते काही काम वेळेत करता येईल. काही प्रयोग फसले. काही व्यवहारात कोटय़वधींचा फटका सहन करावा लागला. पण प्रत्येक चुकीने काही नवीन शिकवले. मध्यंतरी इटली येथून पॅटकोने साडेचार कोटींचे यंत्र घेतले. मात्र हे यंत्र खरेदी करताना ग्राहकांच्या गरजेनुसार अपेक्षित काम मिळेल की नाही, याची पडताळणी न मात्र केलीच नाही. यंत्रसामग्री नाशिकला आली आणि ग्राहकाने हात वर केले. यामुळे आजही साडेचार कोटीचे हे यंत्र कंपनीत पडून आहे. अमेरिकेतील कंपनीला विशिष्ट रचनेचे काही सुटे भाग बनवून देण्यात आले होते. फेरतपासणीत त्यात काही त्रुटी आढळली. ते नाकारण्याआधी त्याची पॅटकोने तपासणी करावी, असे त्या कंपनीने सुचविले. पॅटकोचे पथक तपासणी करण्यासाठी तयार झाले. मात्र कर्मचाऱ्यांना व्हिसा मिळण्यास विलंब झाल्याने अखेरीस खुद्द पाटील यांना अमेरिका गाठावी लागली. सर्व सुटे भाग त्यांनी सलग १४ ते १५ तास अखंड काम करत तपासले. अखेर हा विषय कौशल्यपूर्वक सोडविला. उद्योग व्यवसायात अडचणी कधीही येऊ शकतात. प्रामाणिकपणे काम केल्यास तोडगा सापडतो.

सहा लाखाच्या भांडवलावर कोल्हापूरात पॅटकोची मुहूर्तमेढ रोवली गेली. आज कंपनीच्या वार्षिक उलाढालीने ७० कोटींचा टप्पा गाठला आहे. कारखान्यात २०० जणांना रोजगार उपलब्ध झाला. जागतिक स्तरावर पॅटकोला सिद्ध करण्यासाठी पाटील यांना इथेच थांबायचे नाही. ऑटोमेशननंतर ‘ट्रान्समिशन’ क्षेत्रात कंपनी विस्तार करणार आहे.

४० कामगारांसह स्थलांतर

कोल्हापूरमध्ये सुरू असलेली कंपनी बंद करून ती नाशिकला यंत्रसामग्री, ४० कामगार, कुटुंबातील सदस्यांसोबत स्थलांतरित करणे आव्हान होते. हे आव्हान नव्या संधीचे दार उघडेल, ही अपेक्षा होती. कुटुंबातील ज्येष्ठांनी हा धोका पत्करू नको, पुन्हा ठेच बसली की माघारी यावे लागेल, याची जाणीव करून दिली. मात्र पत्नी किरण यांचा पाठिंबा, मित्रांवरील विश्वास, कामाप्रति श्रद्धा यावर भिस्त ठेवत पाटील नाशिकमध्ये आले. अंबड औद्योगिक वसाहतीत भाडेतत्त्वावर भूखंड घेतला. तिथे ४० कामगारांसोबत कामाला सुरुवात झाली. या काळात शामराव विठ्ठल सहकारी (एसव्हीसी) बँकेने आर्थिक साहाय्य केले. प्रत्यक्ष कामात काही विचित्र अनुभव आले. एका कंपनीने ऑर्डर दिली. पण त्यामागे ५० टक्के सवलत, ‘लेबर चार्ज’मध्ये काही रक्कम कपात करण्याची मागणी केली. आपलं काम जर चोख असेल तर सवलत का? त्यामुळे हे काम त्यांनी नाकारले. सहा महिन्यात फारशी कामे मिळाली नाहीत. जागेचे भाडे, कर्मचाऱ्यांचे पगार, कच्च्या मालाचे पैसे सारे थकलेले होते. याच दरम्यान एक ‘कम्पोनन्ट’ जो स्थानिक पातळीवर कोणाला जमला नाही, तो तयार करण्यास एका कंपनीने सांगितले. एक-दीड वर्षांच्या मेहनतीनंतर कंपनीला अपेक्षित कम्पोनन्ट तयार झाला. यानंतर पॅटकोला आजवर कामासाठी फारसे प्रयत्न करावे लागले नाहीत. या एका कामामुळे देश-विदेशातील कंपन्यांशी ते जोडले गेले. सध्या इटली, अमेरिका, चीन, स्वीडन, जर्मनी येथील कंपन्यांबरोबर पॅटकोचे करार आहेत. त्यांच्या मागणीनुसार आवश्यक त्या सुटय़ा भागांची पूर्तता केली जाते. देशपातळीवरील अनेक नामांकित कंपन्याशी पॅटको जोडली गेली आहे. कंपनी चारचाकी वाहनांचे सुटे भाग,कनेक्टर्स, थ्रो टेल शाफ्ट्स, डिझेल फ्युएल इंजेक्शन आदींची निर्मिती करते.

 रवींद्र पाटील (पॅटको प्रीसिजन कम्पोनन्ट्स प्रा. लि.)

  • उत्पादन : ग्राहकांच्या मागणीनुसार यंत्र डिझाइन आणि सुटे भाग (कम्पोनन्ट) करून देणे. यामध्ये वाहन, इलेक्ट्रिकल, सेन्सर्स, ऑटोमेशनशी संबंधित ‘थ्रो टेल शाफ्ट्स’, ‘डिझेल फ्युइल इंजेक्शन’, चारचाकी वाहनांचे सुटे भाग, ‘कनेक्टर्स’ इ.

* मूळ गुंतवणूक  :  ६ लाख रु.

* गुंतवणूकदार : स्वत: आणि नातेवाईक,मित्रमंडळींकडून साहाय्य.

* कर्जदार वित्तीय संस्था :  कर्नाटक बँक, सिडबी

* सध्याची उलाढाल : ७० कोटी रु.

* सरकारी योजनेचा फायदा : ‘व्हॅट’अंतर्गत डीआयसी अनुदान, ‘लिंक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर’मध्ये सहभाग.

* संकेत स्थळ : http://www.patcoprecision.net

चारुशीला कुलकर्णी

* लेखिका ‘लोकसत्ता’च्या नाशिक प्रतिनिधी charushila.kulkarni@expressindia.com

आपणासही या सदरासाठी नवउद्योजकाची शिफारस, सूचना ई-मेल :  arthmanas@expressindia.com वर कळविता येईल.