वीरेंद्र तळेगावकर

बालपणापासून मिळालेले व्यावसायिकतेचे बाळकडू ऐन महाविद्यालयीन जीवनात कुटुंबाची जबाबदारी पेलवायला लावेल हे ध्यानीमनी नसणाऱ्या प्रियांका नितीन चव्हाण यांनी निवडलेला उद्योगाचा मार्ग आणि एकू णच संघर्षमय जीवन प्रवास हा एखाद्या चित्रपट वा कादंबरीचा विषय ठरावा असा आहे.

पूर्वाश्रमीच्या स्मिता कु लकर्णी या मूळच्या डोंबिवलीच्या. आईचं रेल्वे स्थानकाजवळ किरकोळ वस्तू विक्रीचं दुकान. तर वडिलांचं दक्षिण मुंबईत (काळबादेवी) वैद्यकीय विषयातील पुस्तकांचं. मुंबईतील अनेक सरकारी रुग्णालयांना वैद्यकीय विषयावरील पुस्तके , देशी-विदेशी नियतकालिके  त्यांचे हे दालन पुरवत असे. पदवीच्या पहिल्या वर्षांला असतानाच वडिलांचे आजारपण आले आणि मग अर्थात त्यांची डॉक्टर्स लायब्ररी स्मिता यांना सांभाळावी लागली. एके काळी चांगला जम असलेल्या डॉक्टर्स लायब्ररीला नुकसान होऊ लागले. महाविद्यालयीन शिक्षण सांभाळून, डोंबिवलीतून रोज मुंबईला येणे-जाणे होऊ लागले.

धडपडय़ा स्वभावाच्या स्मिता यांनी मग डॉक्टर्स लायब्ररीचा विस्तार करत आणखी काही रुग्णालयांना जोडून घेतले. मुंबईबरोबरच महाराष्ट्रातील अगदी निमशहरी गावातील ते परराज्यातील अजमेर, दिल्लीपर्यंतच्या रुग्णालयात त्या स्वत: जाऊन व्यवहार करत. डॉक्टर्स लायब्ररी नफ्यात येऊ लागली. तिची उलाढालही वाढली. अनेक खासगी रुग्णालयेही जोडली गेली. संयमी, मितभाषी, सेवाव्रत हे उत्तम व्यवसायासाठी आवश्यक वर्तणुकीचे धडे कोळून प्यायलेल्या स्मिता यांच्या ध्येय, निर्णयक्षमता आणि निश्चयी वृत्तीच्या जोरावर डॉक्टर्स लायब्ररी पुन्हा एकदा व्यावसायिकदृष्टय़ा बहरली. आकस्मिकरीत्या शिरकाव झालेल्या व्यवसायाची दोनच वर्षांत भरभराट झाली आणि त्यांच्याकडे डॉक्टर्स लायब्ररीची सारी सूत्रेही आली. पुढच्या दोन वर्षांत स्मिता व नितीन यांचा प्रेम विवाह झाला. इथेही आव्हाने कायम होती. डोंबिवलीत एकाच इमारतीत राहणारे दोघेही घरी न सांगता वयाच्या २३व्या वर्षी विवाहबंधनात अडकले. कु लकर्णी आणि चव्हाण अशा दोन्हीकडच्या कु टुंबांची या लग्नाला संमती नव्हती. परिणामी आर्थिकदृष्टय़ा स्थिरावलेल्या स्मिताचा, विवाहापश्चात प्रियांका बनून पुन्हा शून्यापासून प्रवास सुरू झाला.

नितीन यांच्या मित्राच्या कोणा एकाचा ठाण्यातील फ्लॅटमध्ये भाडेकरू बनून सुरुवातीचे तीन-चार महिने काढले. पुन्हा डोंबिवलीत भाडय़ाने राहू लागले. दरम्यान प्रियांका यांची डॉक्टर्स लायब्ररीची जबाबदारी आणि नितीन यांची नोकरी सुरूच होती. चव्हाण दाम्पत्य आता डोंबिवलीतच हक्काच्या घरात वास्तव्य करू लागले. पुढच्या सहा वर्षांत चव्हाण कु टुंब चौकोनी बनले. दरम्यान, दोहोंच्या आई-वडिलांच्या बाजूने नातेसंबंधातील दुरावा संपला होता. प्रियांका व नितीनविषयीचा अनुक्रमे सासू-सासरे व आई-वडिलांचा रोष कमी झाला होता. प्रियांका यांच्याच सिनेप्रभावी वाक्यानुसार, सारे काही ‘कभी खुशी, कभी गम’मधील अखेरच्या क्षणाप्रमाणे शाहरुख-काजोलसारखे झाले होते!

कु टुंबाचा आधार नसल्याने व आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने प्रियांका व नितीन यांनी अतिरिक्त काम सुरू के ले होते. डॉक्टर्स लायब्ररी प्रियांका सांभाळत असल्या तरी सर्व आर्थिक व्यवहार आणि पैशांचा ओघ हा डॉक्टर्स लायब्ररी आणि वडिलांच्या खात्यात जात होता. मेहनताना मिळे पण त्यापोटी खूप कमी रक्कम येत होती. अशातच बॉम्बे हॉस्पिटलकडून पुस्तकांना प्लास्टिकचे वेष्टन लावून देण्याचे, बाईंडिंगचे काम येऊ लागले. यात पैसे चांगले मिळायचे. मात्र मेहनत खूप होती. मग आहे ते सांभाळून, रात्रीचे दिवस करून दोघांनी ते के ले.

क्लासिकची रुजुवात

एक ट्रेडिंग कं पनी निर्मिती व्यवयासातील कु ठले तरी सुटे भाग स्वीकारत नसल्याचे नितीन यांना कळले. ही उत्पादने आपणच का विकू  नयेत, असा विचार त्यांनी केली. अभियांत्रिकी शिक्षणाची पाश्र्वभूमी असलेल्या नितीन यांनी मग क्लासिक एंटरप्राइजेसची १९९१ मध्ये मुहूर्तमेढ रोवली. मात्र स्वत:जवळ जागा वगैरे नसल्याने प्रियांका यांच्या डॉक्टर लायब्ररीच्या जागेतच, हा आयात-निर्यात व्यवसाय सुरू झाला. तेथील कर्मचारी, उपलब्ध कार्यालयीन साधनसामग्रीचा नव्या कंपनीला हातभार लागला. १९९३ मध्ये सिमेन्सच्या विविध यांत्रिक उत्पादनांचे भारतातील विक्री व सेवाविषयीचे अधिकार क्लासिक एंटरप्राइजेसला मिळाले. यानिमित्ताने व अन्य कं पन्यांसाठी म्हणून दोघांनी सिंगापूर, जर्मनी आदी भ्रमंती के ली. वाढत्या व्यापामुळे नितीन यांनी या दरम्यान नोकरी सोडली. एकातून दुसरे अशी संकटाची मालिका सुरूच होती. प्रियांका यांच्या वडिलांचे व्यवसायातील पुनरागमन आणि दोन पिढय़ांमधील भिन्न व्यावसायिक, व्यवस्थापकीय दृष्टिकोन यामुळे मतभेद होऊ लागले. वडील-मुलगी-जावई असे भेद होतेच, त्याची परिणती म्हणून मनेही दुभंगू लागली. कौटुंबिक नात्यावर व्यावसायिक व्यवहारांनी मात के ली. कार्यालयीन जागा मात्र एकच असल्याने तेथे या मनभेदाच्या दृश्य खुणा दिसू लागल्या. व्यवसाय कु टुंब-नातेवाईकांदरम्यान असला तरी योग्य ते कायदेशीर सोपस्कार आवश्यकच ठरतात – प्रियांका यांचा अनुभवी मंत्र.

अखेर प्रियांका डॉक्टर्स लायब्ररीच्या जबाबदारीतून बाहेर पडल्या आणि पूर्णवेळ क्लासिक इंटरप्राइजेसकरिता वेळ देऊ लागल्या. दोन्ही बाळंतपणात रुग्णालय आणि घर यांचे कार्यालय करणाऱ्या आणि अगदी प्रसूतीपूर्वी-नंतरही कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या प्रियांका यांच्या धाडसी स्वभावाच्या जोरावर पतीच्या व्यवसायाची मुहूर्तमेढ, स्वत:च्या व्यवसायाचा विस्तार, डोंबिवली ते माहीम सांस्कृतिक, भौगोलिक स्थित्यंतर आणि मुलांची त्यांच्या आवडीच्या क्षेत्रातील स्वतंत्र सुरुवात हा प्रवास घडला. काहीशा कडक, स्पष्टवक्त्या वाटणाऱ्या प्रियांका म्हणतात, ‘‘व्यवसायात नोकरीसारखे नसते. एकाच वेळी भिन्न आव्हानांशी लढायचे असते. निर्णयक्षमतेचा कस लागतो. जोखीम तर घ्यायचीच असते.’’

पती – नितीन यांचा स्वभाव काहीसा रोखठोक, एकाचे दोन करण्याचा. प्रियांका यांच्या म्हणण्यानुसार, मात्र व्यवसायात कधी तरी हे टाळावे लागते. तसे म्हटले तर प्रियांका व नितीन यांचे भिन्न स्वभाव त्यांच्या व्यावसायिक यशाला पूरकच ठरले आहेत. चव्हाण कु टुंबीयांचा संघर्षमय प्रवास थांबला असला तरी तो अधिक समाधानी करण्यासाठी प्रियांका क्लासिक एंटरप्राइजेसच्या जबाबदारीनंतर सामाजिक कार्यात झोकू न देणार आहेत. त्यासाठी देहदान हा विषयही त्यांनी निश्चित के ला आहे. देहदानाविषयीचा प्रसार-प्रचार, जनजागृतीसाठी किमान पुढचा दशकभराचा वेळ खर्ची घालायचे त्यांनी ठरविले आहे.

करोना : एक संधी

क्लासिक एंटरप्राइजेसच्या मालकीच्या आज मुख्यालयासह दक्षिण मुंबईत दोन मोक्याच्या जागा आहेत. शिवाय वसईत (जि. पालघर) दोन सुसज्ज व अद्ययावत गोदामे (वेअर हाऊस) आहेत. कं पनी रुग्णालये, उत्पादन निर्मिती प्रकल्प, शीतगृह आदींना लागणारे बर्नर तसेच अन्य सुटे भाग पुरविते. जर्मनी, फ्रान्ससह अनेक युरोपीय देशांतील आघाडीच्या कं पन्यांची उत्पादने देशभरात त्यांच्याकडून वितरित होतात. प्रियांका सांगतात, ‘‘गूगल, अ‍ॅमेझॉनमुळे आज सर्व काही ऑनलाइन मिळत असल्याची मात्रा आमच्या व्यवसायालाही लागू आहे. पूर्वी थेट संपर्क, ओळखीपाळखीतून संबंध यामुळे ग्राहक वर्षोनवर्षे टिकू न राही. आता ते सारे बदलले आहे.’’ परिणामी व्यवसायातील लाभ आता काहीशे टक्क्यांवरून दोन अंकी पातळीवर आले आहेत. मात्र आयुष्याप्रमाणे संकटेही संधी निर्माण करतात. कोविड-१९ काळात हवेतील जंतूंना घालवू शकणारी वातानुकू लित यंत्रे विकसित होत आहेत. अशाच एका बंगळूरुस्थित कं पनीचे उपकरण बाजारात येऊ घातले आहे. त्यासाठीची उत्पादने क्लासिककडून पुरविली जाणार आहेत.

नितीन चव्हाण / प्रियांका चव्हाण    

क्लासिक एंटरप्राइजेस

’ व्यवसाय  :                            वस्तूंची आयात-निर्यात, वितरण

’ कार्यान्वयन  :                      १९९१

’ प्राथमिक गुंतवणूक     :       ५० हजार रुपये

’ सध्याची उलाढाल             :  वार्षिक  २५ कोटी रुपये

’ कर्मचारी संख्या  :               २५

’ संकेतस्थळ : www.classicgroup.in