|| श्रीकांत कुवळेकर

गेला पंधरवडा कमॉडिटी बाजाराला फारसा चांगला गेला नाही. तुरीचे दर हमीभावाकडे जाण्याची वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांना बाजाराने सतत निराश केले असतानाच कापसाच्या किमतीने एक वर्षांहून अधिक काळातील नीचांकी पातळी गाठली, तीदेखील उत्पादनात मोठी घट येणे अपेक्षित असताना. फेब्रुवारीअखेर ‘मल्टि कमॉडिटी एक्सचेंज’वर कापसाचा वायदा २०,००० रुपये प्रति गाठींच्याही खाली घसरला होता. अर्थातच हंगामाच्या सुरुवातीला असलेला २४,००० रुपयांचा भाव परत येण्याची वाट बघत आपले उत्पादन राखून ठेवलेल्या शेतकऱ्याच्या चिंतेत भर न पडली तरच नवल.

तेलंगणा, महाराष्ट्र व मध्य प्रदेशमधील काही भाग येथे भाव हमीभाव पातळीपर्यंत आल्यामुळे सरकारी मालकीचे कापूस महामंडळ बाजारात मोठय़ा प्रमाणात हस्तक्षेप करताना दिसत आहे. महामंडळाने आतापर्यंत ११ लाख गाठी कापूस हमीभावाने खरेदी केला असून हाच आकडा पुढील महिन्याभरात १५ लाखांवर जाण्याची शक्यता महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी बोलून दाखवला.

एकीकडे पडत्या किमतीने शेतकऱ्याची ही अवस्था. तर दुसरीकडे व्यापारी आणि कापड गिरण्यादेखील सतत पडत जाणाऱ्या किमतींमुळे कधी नव्हे एवढय़ा संभ्रमावस्थेत सापडले आहेत. चलन बाजारातील चढ-उतारामुळे आणि अमेरिकेमधील मंदीमुळे आयात-निर्यात जवळपास थांबलेली होती. अशातच फेब्रुवारीच्या मध्यावर चीन भारतीय बाजारातून मोठय़ा प्रमाणात कापूस खरेदी करू लागला. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये चैतन्य उसळले आहे. म्हणून किमतीमध्ये ३-४ टक्के सुधारणा झाली. गेल्या दोन-तीन आठवडय़ांमध्ये चीनने पाच ते सहा लाख गाठी कापूस खरेदी केला आहे. नेहमीप्रमाणे चीनच्या खेळीचे कारण शोधणे सुरू झाले आहे. कोणी म्हणतो चीन गेल्या पाच वर्षांमध्ये रिकामे केलेले कापसाचे भांडार परत भरत आहे. तर कोणी म्हणतो अमेरिकेबरोबरच्या व्यापारी तिढा सुटत नसल्यामुळे चीन आपली तातडीची मागणी भारताकडून पुरी करून घेत आहे. प्रत्यक्षात अमेरिकेबरोबरच व्यापार थांबलेला असल्यामुळे चीनमधील कापूस जागतिक किमतीच्या ४-५ टक्के अधिक असल्यामुळे तेथील व्यापाऱ्यांनी स्वस्त झालेला भारतीय कापूस खरेदी केला असावा असे मानावयास हरकत नाही. व्यापारी सूत्रांनुसार चीनने ७८ सेंट प्रति पौंड बाजारभाव चाललेला असताना ३-४ सेन्ट म्हणजेच ३ टक्के अधिकची किंमत देऊन उपलब्ध असलेला भारतीय कापूस खरेदी केला.

या सर्व पार्श्वभूमीवर मुंबईस्थित सुमारे शतकभर जुनी संस्था ‘कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया’ने गेल्या आठवडय़ात आंतरराष्ट्रीय परिषद भरविली होती. अनिश्चितता आणि संभ्रमावस्थेत सापडलेल्या कापूस बाजाराचा चांगलाच प्रतिसाद या परिषदेला मिळाला. त्यामध्ये आंतरराष्ट्रीय कापूस सल्लागार समितीचे उच्च अधिकारी आणि डॉ. केशव क्रांती हे यापूर्वी भारत सरकारमध्ये काम केलेले प्रसिद्ध कृषीशास्त्रज्ञदेखील सहभागी झाले होते. दोन दिवस विविध देशांमधील तज्ज्ञ आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांचे प्रतिनिधी, व्यापारी, दलाल अशा विविध क्षेत्रांतील मंडळींनी कापूस या विषयावरील चर्चासत्रांमध्ये भाग घेतला. यामध्ये अधोरेखित झालेल्या ठळक बाबींचा आपण गोषवारा घेणे येथे उचित ठरेल.

सर्वप्रथम २०१८-१९ मध्ये देशात कापसाचे उत्पादन किती झाले असावे यावर बहुसंख्य जणांनी ३२०-३४० लाख गाठी असे सांगितले. गेल्या वर्षीच्या ३५५ लाख गाठीच्या तुलनेत हे बरेच कमी आहे. कॉटन असोसिएशनने सलग पाचव्यांदा उत्पादनाचा अंदाज घटवून तो ३२८ लाख गाठींवर आणला आहे. हंगाम चालू होण्यापूर्वी हाच अंदाज ३५० लाख गाठी एवढा होता. सरकारी आकडा अजूनही ३५० गाठींच्या आसपास आहे. मात्र महाराष्ट्र आणि गुजरातमधील कडक दुष्काळ आणि त्यामुळे खरीप पिकांवर झालेला विपरीत परिणाम पाहता प्रत्यक्ष उत्पादन ३२० लाख गाठींवर आल्यास आश्चर्य वाटू नये, अशी अवस्था त्या त्या राज्यांमधील व्यापाऱ्यांनी बोलून दाखवली. डॉ. क्रांती यांनीदेखील महाराष्ट्र, गुजरातबरोबरच तेलंगणमध्ये सरासरी ४ किंवा ५ ऐवजी १ ते ३ एवढय़ाच कापूस वेचण्या झाल्यामुळे उत्पादनात मोठी घट वर्तवली गेली असून नक्की आकडय़ाबद्दल एप्रिल किंवा मेच्या सुरुवातीला स्पष्टता येईल.

उत्पादनात एवढी घट असतानाही भाव न वाढण्याची अनेक कारणे आहेत. मुख्य म्हणजे चीन व अमेरिकेच्या व्यापार युद्धात जागतिक बाजारामध्ये भारताच्या हमीभावाखाली गेलेली किंमत आणि त्याचवेळी भारतातील हमीभावामुळे असलेली चढी किंमत यातील फरकामुळे उत्तर आणि दक्षिण भारतातील गिरण्यांनी आयात सुरू केल्यामुळे देशांतर्गत मागणीत घट आली. निर्यात फायदेशीर राहिली नाही. त्याचप्रमाणे भारताचा सर्वात मोठा ग्राहक आणि जगातील सर्वात मोठा कापूस खरेदीदार बांगलादेश आपली गरज भागवण्यासाठी चांगली गुणवत्ता आणि किफायतशीर किंमत मागत असलेल्या ब्राझीलकडे गेला. दुष्काळात १३वा महिना त्याप्रमाणे अमेरिकेमध्ये पुढील हंगामामधील उत्पादनाचे अंदाज प्रसिद्ध होऊ लागले असून ते ५ ते ७ टक्के तरी अधिक असण्याची शक्यता आहे.

अशा अनिश्चिततेच्या परिस्थितीत येऊ  घातलेल्या दोन-तीन महिन्यांमध्ये कापसाचे भाव कसे असतील याचा अंदाज घेऊ. भावातील माफक मंदी किंवा सावध तेजी ज्यात किंमत २०,०००-२१,५०० रुपये प्रति गाठ या कक्षेत राहू शकेल अशी कारणे खालीलप्रमाणे आहेत. अमेरिका आणि ब्राझीलमधील उत्पादन वाढलेले असेल, त्याचप्रमाणे भारतात मोदी सरकार परत येण्याची शक्यता खूप वाढल्यामुळे रुपयामध्ये अजून सुधारणा होऊन कापसाची आयात अधिक स्वस्त होणे शक्य होईल. गुणवत्तेच्या कसोटीवर भारतीय कापसाबद्दल सतत वाढत्या तक्रारींमुळे बांगलादेशने भारतामधून होणाऱ्या आयातीत सतत कपात केल्यामुळे त्यांच्या आयातीत भारताचा वाटा २०१९ मध्ये ४० टक्के एवढा घसरू शकतो, असे ‘बांगलादेश कॉटन असोसिएशन’ने सांगितले आहे. २०१७ मध्ये हा वाटा ५१ टक्के होता, तर २०१८ मध्ये तो ४६ टक्के एवढा घसरला होता. एकंदरीत आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय कापसावरील विश्वास सातत्याने कमी होताना दिसत आहे. तसेच चीनने आपले भांडार भरण्याचा निर्णय पुढील हंगामात ढकलला तर भारताला आपल्या ५० लाख अतिरिक्त गाठी विकण्यासाठी भाव घटवावा लागेल. त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारावर होऊ शकतो. येथे नमूद करणे गरजेचे आहे की, चीनच्या भांडारामध्ये पाच वर्षांपूर्वी सुमारे ७०० लाख गाठी, म्हणजे भारताच्या वार्षिक उत्पादनाच्या दुप्पट एवढा साठा होता. गेल्या पाच वर्षांमध्ये तो देशात लिलावाद्वारे विकल्यामुळे आता तो १६० लाख गाठींवर आल्याचे म्हटले जात आहे.

असे असतानाही या परिषदेमध्ये उपस्थित बहुसंख्य तज्ज्ञांचा कल तेजीकडेच असलेला दिसून आला. तेजी-मंदी सत्रातील चर्चेमध्ये १० पैकी ७ जणांनी कापसाचे भाव तेजीमध्ये प्रवेश करत असल्याचे सांगत असतानाच त्यातील निम्म्या जणांनी ही तेजी जुलैपर्यंत २४,००० रुपये ते अगदी २५,००० रुपये प्रति गाठ एवढी जाण्याचे अंदाज वर्तवले आहेत. याची कारणेही तितकीच महत्त्वाची आहेत. एक तर उत्पादन खरोखरच ३२०-३२५ लाख गाठींवर आले तर देशांतर्गत मागणीचा भाव वर घेऊन जाईल, तर निर्यातदेखील वाढल्यास तेजी अधिक रुंदावेल. दुसऱ्या शक्यतेनुसार अमेरिकेबरोबरच्या वाटाघाटी फिस्कटून चीन आपली मागणी पूर्ण करण्यासाठी भारतीय कापूस बाजारात मोठय़ा प्रमाणात उतरेल तेव्हा किमतीमध्ये उच्चांकी पातळी येईल.

त्याचप्रमाणे बांगलादेश आणि भारतातील कापूस व्यापारी संस्था यांच्यात लवकरच एक करार होणार असून त्याद्वारे उभय बाजूंच्या व्यापाऱ्यांमधील प्रश्न सोडवले जाऊन बांगलादेशातील निर्यातीतील घसरलेला वाटा परत मिळवण्याची संधी मिळेल. याचा परिणाम कापसाच्या किमती वाढण्यावर होईल.

तेजीसाठी सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे येत्या वर्षीचा मोसमी पावसाचा अंदाज. याविषयक काही अंदाज एवढय़ा लवकर वर्तवणे योग्य ठरणार नसले तरी नावाजलेल्या जागतिक हवामान संस्थांच्या म्हणण्यानुसार भारतातील पाऊस अल-निनोच्या मर्यादित प्रभावामुळे कमी, त्याचप्रमाणे उशिराने चालू होण्याची शक्यता असल्यामुळे उशिरा पेरण्या आणि त्यामुळे गुलाबी बोंड अळी आणि इतर कीटकांचा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यामुळे उत्पादनात घट होऊन त्याचा परिणाम भाव वाढण्यात होईल. जरी ही परिस्थिती ऑक्टोबरमध्ये उद्भवू शकते तरी त्याचा बाजारावर परिणाम आधीच दिसल्यामुळे जून महिन्यामध्ये कापसाचे भाव चांगलेच वाढू शकतात. याबद्दलची स्पष्टता एप्रिलअखेपर्यंत येईल.

ksrikant10@gmail.com

(लेखक वस्तू बाजार विश्लेषक)