portfolioछापील माध्यमातील भारतातील सर्वात मोठा समूह असलेली ही कंपनी नियतकालिके, जाहिराती तसेच कार्यक्रम व्यवस्थापनामध्येदेखील कार्यरत आहे. या मिड-कॅप माध्यम क्षेत्रातील कंपनीच्या शेअरवर नजीकच्या काळात चाणाक्ष गुंतवणूकदारांची करडी नजर असायलाच हवी.
av-08
भारतातील सर्वात जास्त वाचक लाभलेला वृत्तपत्र समूह म्हणून ‘जागरण’च्या विविध प्रकाशने आणि प्रसारणांशी बहुतेक सर्वच परिचित असतीलच. गेल्या पाच वर्षांत आíथक कामगिरीत आणि उलाढालीत दुपटीहून वाढ दाखवणाऱ्या या कंपनीने नक्त नफ्यातही अडीच पटीने वाढ करून दाखवली आहे.
१९४२ मध्ये स्थापन झालेल्या दैनिक ‘जागरण’ची देशभरात १२ वृत्तपत्रे असून ती पाच भाषांतून आणि १५ राज्यांतून प्रसिद्ध होतात. वृत्तपत्रे आणि छापील माध्यमातील भारतातील सर्वात मोठा समूह असलेली ही कंपनी नियतकालिके, जाहिराती तसेच कार्यक्रम व्यवस्थापनामध्येदेखील कार्यरत आहे.
आय नेक्स्ट, सिटी प्लस, पंजाबी जागरण, सखी आणि जोश अशी विविध प्रकाशने तसेच राजधानी दिल्लीतून आणि मध्य प्रदेशातील सात शहरांतून हिंदी वृत्तपत्र नई-दुनिया सहा आवृत्त्यांमध्ये प्रसिद्ध करणाऱ्या या कंपनीने नुकतीच १४ इंटरनेट रेडियो स्टेशन असलेली प्लॅनेट रेडिओसिटी डॉट कॉम ही कंपनी ताब्यात घेतली. भारतभरात २० ठिकाणांहून ९१.१एफएम ‘रेडियो सिटी’ चालवणारी ‘म्युझिक ब्रॉडकास्ट प्रायव्हेट लिमिटेड’ तसेच ‘मिड-डे’ आणि ‘इन्किलाब’ ही आघाडीची वृत्तपत्रे प्रसिद्ध करणारी ‘मिड डे मल्टिमीडिया ही या कंपनीची उपकंपनी आहे.
डिसेंबर २०१४ अखेर संपलेल्या तिमाहीसाठी ४२८.४० कोटी रुपयांच्या उलाढालीवर ६१.९ कोटींचा नफा कमावणाऱ्या या मिड-कॅप कंपनीचा वाढीचा वेग येत्या दोन वर्षांत अजून वृद्धिंगत होईल, असे वाटते. छापील माध्यमाखेरीज जाहिरात, रेडियो आणि कार्यक्रमाचे नियोजन करणाऱ्या जागरण प्रकाशनचा शेअर मध्यम ते दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी खरेदी करावा.
stocksandwealth@gmail.com