मुंबई : मुंबईतही लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून राजकीय पक्षांच्या उमेदवारांची उमेदवारी अर्ज भरण्याची धावपळ सुरू झाली आहे. कुणी मतदारांसमोर नेमस्त होत तर कुणी देवदर्शन घेत, तर कुणी आई पुढे नतमस्तक होऊन संविधान वाचविण्याची घोषणा करीत मंगळवारी लोकसभा निवडणुकीचा अर्ज भरला. एकूणच मुंबईत शक्तिप्रदर्शन नाट्य सुरू झाले असून वाजतगाजत मिरवणुका काढत उमेदवार आपापले उमेदवारी अर्ज दाखल करीत आहेत. महाविकास आघाडीच्या उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातील उमेदवार वर्षा गायकवाड, महायुतीचे उत्तर मुंबई मतदारसंघातील उमेदावर पियुष गोयल आणि ईशान्य मुंबई मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संजय पाटील यांनी मंगळवारी दुपारी रणरणत्या उन्हात वाजतगाजत स्वपक्षातील नेते मंडळी आणि कार्यकर्त्यांच्या साक्षीने मिरवणुका काढून उमेदवारी अर्ज दाखल केला.
देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून महाराष्ट्रात दोन टप्प्यात मतदार पार पडले आहे. आता तिसऱ्या टप्प्यातील मतदान असलेल्या ठिकाणी प्रचाराचा धडाका सुरू झाला आहे. सभा, मिरवणुका, पदयात्रांनी वेग घेतला आहे. त्यातच आता मुंबईतही राजकीय घडामोडी घडू लागल्या असून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची धावपळ उडू लागली आहे. महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांना उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली असून गायकवाड यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला. उमेदवारी अर्ज भरण्यास जाण्यापूर्वी गायकवाड आई पुढे नतमस्तक झाल्या, वडिल एकनाथ गायकवाड यांच्या प्रतिमेला अभिवादन करून वांद्रे पूर्व येथील गुरुकृपा झुणका भाकर केंद्र, खेरवाडी येथून दुपारी ११ च्या सुमारास निघालेल्या फेरीत सहभागी झाल्या. टप्प्याटप्प्यावर या रॅलीत महाविकास आघाडीचे कार्यकर्ते सहभागी होत होते. काँग्रेसच्या प्रिया दत्त, अस्लम शेख आदी नेते मंडळींसह महाविकास आघाडीतील कार्यकर्ते सहभागी झाले होते. ढोल ताशाच्या गजरात काढण्यात आलेल्या या रॅलीमध्ये ‘हाथ बदलेगा हालात’ अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून टाकला होता.
हेही वाचा >>> मिहीर कोटेच्या यांच्या प्रचार फेरीवर दगडफेक, देवनार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महायुतीने उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून भाजपचे पियुष गोयल यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. वाजतगाजत काढलेल्या मिरवणुकीत सहभागी होत पियुष गोयल मंगळवारी वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले आणि त्यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला. तत्पूर्वी त्यांनी नॅन्सी कॉलनी येथील श्री पुष्टिपती गणेश मंदिरात जाऊन गणपतीचे दर्शन घेतले. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मासळीच्या दुर्गंधीवरून झालेल्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला. गोयल दाम्पत्याने कोळी बांधवांची लाल टोपी परिधान करून कोळी मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न या फेरीच्या माध्यमातून केला. यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, खासदार गोपाळ शेट्टी आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष ॲड. आशिष शेलार, आमदार योगेश सागर आदी नेते मंडळीसह एकनाथ शिंदे, अजित पवार समर्थक, मनसे, रिपब्लिकन पाट्री ऑफ इंडिया आणि भाजपचे कार्यकर्ते सहभागी झाली होते. कार्यकर्त्यांनी ‘मोदी का परिवार’ असे ठळक अक्षरात लिहिलेली टी शर्ट घातले होते. ढोल-ताशाच्या गजरा, महायुतीमधील घटक पक्षांचे झेंडे फडकवत, घोषणाबाजी करीत ही मिरवणूक जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाली.
महाविकास आघाडीने ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय पाटील यांना उमेदवारी दिली असून विक्रोळीमधील टागोर नगर परिसरातून दुपारी वाजतगाजत प्रचारफेरी काढून शक्तिप्रदर्शन केले. टागोर नगरमधील मतदारांना अभिवादन करीत ढोल-ताशाच्या गजरात, घटक पक्षांचे झेंडे फडकवत, घोषणाबाजी करीत प्रचारफेरी मार्गस्थ झाली. काही ठिकाणी इमारतींमधून प्रचारयात्रेवर पुष्पवृष्टी करण्यात येत होती. भांगडा, लेझीम, नाशिक ढोल, कोळी नृत्य, वारकऱ्यांच्या दिंडीचे या प्रचारफेरीच्या निमित्ताने विक्रोळीकरांना दर्शन घडले. शीख आणि मुस्लीम समाजबांधवांचा प्रचारफेरीतील सहभाग लक्षणीय होता. ही प्रचार फेरी टागोर नगरमधील मार्केट, मस्जिद व साई मंदिर परिसरातून पुढे दुपारी १.३० च्या सुमारास फिरोजशह नगर सभागृहातील मतदान केंद्रावर पोहोचली. शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे यांच्याबरोबरच शिवसेना नेते सचिन अहिर, आमदार सुनील राऊत, माजी महापौर दत्ता दळवी, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या राखी जाधव, धनंजय पिसाळ, काँग्रेसचे चरणसिंग सप्रा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे दीपक निकाळजे आदी मंडळी प्रचारफेरीत सहभागी झाली होती. शिवसैनिकांबरोबरच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए), आम आदमी पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पार्टी, नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडियाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. पारिपरिक पोशाखात प्रचारयात्रेत सहभागी झालेल्या मुस्लीम भगिनींनी भगव्या रंगाचे फेटे परिधान केले होते. प्रचारयात्रेत त्या आकर्षण ठरल्या होत्या.
प्रचारफेरीच्या माध्यमातून उमेदवार शक्तिप्रदर्शन करण्यात व्यक्त होते. मात्र वाहतूक कोंडी आणि पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आल्यामुळे नागरिकांना फटका बसला. काही ठिकाणी द्राविडी प्राणायाम करीत नागरिकांना मार्गस्थ व्हावे लागले. तर काही ठिकाणी रेल्वे स्थानक गाठण्यासाठी पायपीट करावी लागली. यामुळे वृद्ध, लहान मुले आणि महिलांना प्रचंड त्रास सोसावा लागला.