अजय वाळिंबे व्हीएसटी टिलर्स ट्रॅक्टर्सची स्थापना १९६७ मध्ये दक्षिण भारतातील सुप्रसिद्ध व्हीएसटी ग्रुप ऑफ कंपनीजने केली. व्ही.एस. तिरुवेंगदास्वामी मुदलियार हे या समूहाचे संस्थापक होत. सुरुवातीला कंपनी जपानच्या मित्सुबिशी हेवी इंडस्ट्रीज लिमिटेडसह संयुक्त प्रकल्प राबवत होती. सध्याच्या घडीला ही भारतातील पॉवर टिलरची सर्वात मोठी उत्पादक कंपनी आहे. ‘व्हीएसटी शक्ती’ हा भारतातील पॉवर टिलरमध्ये (वॉकिंग ट्रॅक्टर) पाच दशकांपूर्वी सादर केलेला भारताचा पहिल्या क्रमांकाचा ब्रँड आहे. ‘फिल्डट्रॅक’ ब्रँडअंतर्गत युरोपीय महासंघाच्या विविध बाजारपेठांमध्ये नवीनतम ‘ईयू मानकां’ची पूर्तता करणारे ट्रॅक्टरदेखील कंपनीकडून विकले जात आहेत. सुरुवातीला ‘व्हीएसटी मित्सुबिशी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कंपनीने आता ‘व्हीएसटी शक्ती’ या ब्रँडअंतर्गत कृषीपयोगी कॉम्पॅक्ट ट्रॅक्टर्सच्या श्रेणीसह आपली उपस्थिती वाढवली आहे. पॉवर टिलर : प्रख्यात ‘व्हीएसटी शक्ती’ ही पॉवर टिलर विभागातील कंपनीची उत्पादन श्रेणी ही ५५ टक्के बाजार हिश्शासह भारतातील पहिल्या क्रमांकाचा ब्रँड म्हणून नावाजली गेली आहे. कंपनीने पॉवर टिलरचे तीन मॉडेल्स बाजारात आणले आहेत. ट्रॅक्टर : कंपनीचे ‘व्हीएसटी शक्ती’ आणि ‘फिल्ड ट्रॅक ’ ब्रँड्सद्वारे अनुक्रमे देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेसाठी कॉम्पॅक्ट ट्रॅक्टरची अकरा मॉडेल्स प्रचलित आहेत. दोन वर्षांपूर्वी कंपनीने नवीन आठ मॉडेल्ससह उच्च अश्वशक्तीच्या ट्रॅक्टर विभागात प्रवेश केला आहे. कंपनी ऑटोमोटिव्ह तसेच ट्रॅक्टर उद्योगाला क्रँकशाफ्ट्स, एचपी सिलिंडर ब्लॉक्स, कनेक्टिंग रॉड्स, मुख्य कॅमशाफ्ट्स आणि ट्रान्समिशन केसेस इत्यादी घटकांचा पुरवठा करते. कंपनीचे भारतातील कर्नाटकात म्हैसूरमध्ये तसेच मलूर आणि होसूर येथे चार अत्याधुनिक प्रकल्प आहेत. कंपनीने दोन वर्षांपूर्वी प्युबर्ट इंडियासोबत धोरणात्मक युती केली आहे. जेथे खर्च वाढत आहे आणि मजुरांची टंचाई आहे अशा ठिकाणी अल्पभूधारक शेतकऱ्यांना परवडणाऱ्या यांत्रिकीकरणाने कंपनी उपाययोजना राबवीत आहे. कंपनी हाय टॉर्क इंजिन, ९ ३ सिंक्रोमेश गिअरबॉक्स, १२५० किलो हायड्रॉलिक, मिड पीटीओ आणि रिव्हर्स पीटीओ यासारख्या नवीनतम तांत्रिक वैशिष्टय़ांसह ३० एचपी ट्रॅक्टरची नवीन प्रीमियम आवृत्ती बाजारपेठेत आणत आहे. आर्थिक वर्ष २०२१-२२ साठी कंपनीने ८५४ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ९९.३ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत तो केवळ नऊ टक्क्यांनी अधिक असला तरीही मार्च २०२२ अखेर संपलेल्या शेवटच्या तिमाहीत कंपनीने २१८.४ कोटी रुपयांच्या उलाढालीवर २२.१ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे तो गेल्या वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत ७१ टक्क्यांनी अधिक आहे. कंपनीचे जून २०२२ अखेर संपलेल्या तिमाहीचे निकाल लवकरच जाहीर होतील. मात्र यंदाचा अपेक्षित पाऊस तसेच कंपनीने बाजारपेठेत आणलेली नवीन उत्पादने आणि टिलर्स बाजारपेठेतील ६० टक्क्यांहून अधिक बाजार हिस्सा यांचा एकत्रित परिणाम कंपनीच्या कामकाजावर होऊन, त्या परिणामी कंपनी उत्तम कामगिरी करून दाखवेल अशी आशा आहे. कुठलेही कर्ज नसलेल्या व्हीएसटी ट्रॅक्टरचा शेअर सध्या २,५०० रुपयांच्या आसपास उपलब्ध आहे. एक मध्यमकालीन गुंतवणूक म्हणून व्हीएसटी ट्रॅक्टरचा तुमच्या पोर्टफोलियोसाठी जरूर विचार करावा. बाजारातील अनिश्चितता पाहता हा शेअर सुचविलेल्या किमतीपेक्षा कमी भावात मिळू शकतो, म्हणून प्रत्येक मंदीत तसेच टप्प्याटप्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.