समीर नेसरीकर sameernesarikar@gmail.com

भारतीय औषध कंपन्या आज जगाच्या औषधांची (ग्लोबल फार्मसी) गरज भागवत आहेत. कोविडनंतर ‘आरोग्य सेवा आणि ओषधे’ हा वैयक्तिक तसेच सरकारच्या प्राधान्याचा विषय बनला आहे. एकंदरीत या क्षेत्राचे भविष्य उज्ज्वल दिसते. मात्र क्षेत्रनिहाय फंडातील गुंतवणुकीला त्या क्षेत्राची ‘बाजार आवर्तने’ लागू होतात आणि त्यामुळेच डायव्हर्सिफाइड म्युच्युअल फंडांपेक्षा या फंडातील जोखीम जास्त आहे. ज्या गुंतवणूकदारांची अल्पमुदतीतील चढउतार नजरअंदाज करून, दीर्घ कालावधीसाठी थांबण्याची तयारी आहे, त्यांनी या प्रकारच्या फंडांची ‘मात्रा’ योग्य त्या प्रमाणात घ्यावी..

Kandalvan, Kandalvan belt,
ज्वलनशील पदार्थांद्वारे कांदळवनावर घाला, सिडकोकडील २३० हेक्टर कांदळवन पट्टा हस्तांतरीत करण्यास टाळाटाळ कशासाठी ?
light
विश्लेषण: डोळे दिपवणारी रोषणाई प्रदूषणकारक आहे का ?
Loksatta explained Is Apple ReALM better than ChatGPT
ॲपलचे ReALM चॅटजीपीटीपेक्षा सरस? येत्या जूनपासून ‘एआय’ क्षेत्रात धुमाकूळ?
Investment Opportunities in the Capital Goods Sector Top Companies
गुंतवणूक संधीचे क्षेत्र आणि न दिसणारे व्यवसाय: भांडवली वस्तू

करोनाच्या कहरानंतर हे जग आमूलाग्र बदलून गेले. आपल्या जवळच्या व्यक्तीचे आपल्यापाशी नसणे ही जाणीव प्रत्येकालाच अस्वस्थ करून गेली आहे. ज्या बुद्धिमत्तेच्या जोरावर माणूस विश्व जिंकायला निघाला होता त्याला काही काळासाठी एकाच जागी थांबावे लागले. डॉक्टर्स, शास्त्रज्ञांच्या प्रचंड मेहनतीतून शेवटी ‘लस’ निर्माण केली गेली आणि जग हळूहळू मोकळा श्वास घेऊ शकले. आपण या देवदूतांचे जेवढे आभार मानू तेवढे कमीच आहेत. पण या सर्व उलथापालथीत जगभरात एका क्षेत्राचा चेहरामोहरा पूर्णत: बदलून गेला, त्यातल्या उणिवा स्पष्टपणे दिसल्या आणि त्यावर मात करण्याचे प्रयत्न चालू झाले, ते क्षेत्र म्हणजे ‘आरोग्य सेवा – हेल्थकेअर.’ म्युच्युअल फंड व्यवस्थापन कंपन्यांचे ‘आरोग्य सेवा आणि औषधे’ यावर आधारित ‘क्षेत्रनिहाय (सेक्टर) फंड’ आहेत त्यांच्या परताव्याविषयी आणि या क्षेत्राची भारतातील सद्य:स्थिती, याविषयी थोडक्यात जाणून घेऊ या.

‘आरोग्य सेवा आणि औषधे’ या क्षेत्रातील कंपन्यांच्या बाबतीत बोलायचे तर औषध बनवणाऱ्या कंपन्या, रुग्णालये, वैद्यकीय उपकरणे, टेिस्टग लॅब्स, टेली-मेडिसिन, मेडिकल टुरिझम, इन्शुरन्स कंपन्या अशा विविध व्यवसायांतील कंपन्यांचा समावेश या क्षेत्रात होतो. उदाहरणादाखल या कंपन्या म्हणजे, डॉ. रेड्डीज, सन फार्मा, सिप्ला, ल्युपिन, बायोकॉन, अपोलो हॉस्पिटल्स, फोर्टिस हेल्थकेअर, डिविज लॅब अशा अनेक प्रतिथयश नावांचा यात अंतर्भाव होतो. ‘आयबीईएफ’च्या माहितीआधारे, २०२१ च्या आकडेवारीनुसार भारतात ४.७ दशलक्ष लोकांना यातून रोजगार मिळाला आहे. आज आपल्याकडे वैद्यकीय क्षेत्रात पारंगत असणारे मोठे मनुष्यबळ आहे. सन २०२२-२३ च्या केंद्राच्या अंदाजपत्रकात ‘आरोग्य आणि कुटुंब कल्याण’ या मंत्रालयासाठी ८६,२०० कोटी रुपये राखून ठेवले आहेत.

अमेरिका हा भारतासाठी सर्वात मोठा निर्यातप्रधान देश आहे. भारतीय औषध कंपन्या या अमेरिकेतील बाजारहिस्सा वाढवण्यासाठी प्रयत्नशील असतात. अमेरिकेत विकली जाणारी ४० टक्केपेक्षा जास्त जेनेरिक औषधे (वेगवेगळय़ा उत्पादन श्रेणीनुसार) भारतात बनविली जातात. अमेरिकेतील ‘फूड आणि ड्रग अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (एफडीए)’ या औषध नियामक संस्थेच्या मान्यतेनंतरच अमेरिकेत औषध विक्री होऊ शकते. भारताच्या लोकसंख्येचा विचार केला तर आपला दरडोई आरोग्य सेवा आणि औषधांवरचा खर्च प्रगत देशांच्या मानाने (अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, फ्रान्स, इंग्लंड, जपान) खूपच कमी आहे. भारतात आज जेथे जवळजवळ ३५ टक्के लोकसंख्या विशीच्या आतील आहे, तिथे साधारण ४० टक्के माणसे पस्तीस वर्षांवरील आहेत आणि त्यांचे प्रमाण वाढत आहे. भारतात जीवनशैलीनिगडित आजार जसे की, मधुमेह, हृदयविकार, लठ्ठपणा हे ‘मिड करिअर’मध्ये म्हणजे साधारण पस्तिशीतच शरीरात प्रवेश करत आहेत. त्या आजारांवर उपचार दीर्घकालीन असतात, त्यामुळे औषध आणि आरोग्य सेवांवरचा खर्च वाढत जाणार आहे, याचा या क्षेत्रातील कंपन्यांना फायदा होईल. आज या क्षेत्रातील कंपन्या जगातील बहुसंख्य देशांना औषधांचा पुरवठा करतात, एवढा मोठा परीघ असलेला असा हा औषध उद्योग आहे.

कोविडनंतर ‘आरोग्य’ हा वैयक्तिक तसेच सरकारच्या प्राधान्याचा विषय असल्यामुळे टेिस्टग लॅब्स, रुग्णालये, आरोग्य विमा यात येणाऱ्या दहा-पंधरा वर्षांत खूप वाढ अपेक्षित आहे. गेल्या काही वर्षांत औषध कंपन्यांच्या नफ्यात वाढ झाली असल्याकारणाने संशोधन आणि विकास (रिसर्च अँड डेव्हलपमेंट) वरील त्यांचा गुंतवणूक खर्च अधिक वाढण्याची अपेक्षा आहे, त्याचा कंपन्यांना ‘जास्त नफा मिळवून देणाऱ्या’ वेगवेगळय़ा वैशिष्टय़पूर्ण उत्पादनांच्या (स्पेशालिटी प्रॉडक्ट्स) निर्मितीसाठी उपयोग होईल आणि अमेरिकेसारख्या मोठय़ा बाजारपेठेत याचा फायदा होईल. डायग्नोस्टिक कंपन्यांचा विचार केला तर ‘टाटा एमजी १’ने नुकताच ‘बिझिनेस टू कन्झ्युमर’ या पद्धतीने प्रवेश करताना, थायरॉइड, मधुमेह यासारख्या महत्त्वाच्या चाचण्यांचे दर खूपच कमी ठेवले आहेत, त्यामुळे या डायग्नोस्टिक कंपन्यांच्या क्षेत्रात पुढे काय घडामोडी घडतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

हा सर्व क्षेत्राचा आढावा घेतल्यावर यातील फंडांविषयी माहिती निप्पॉन, आयसीआयसीआय, मिरॅ, एसबीआय, डीएसपी, यूटीआय, टाटा, आदित्य बिर्ला, आयडीबीआय या सर्व म्युच्युअल फंड कंपन्यांकडे ‘हेल्थकेअर/फार्मा’ फंड आहेत. जुन्या फंडांच्या वार्षिक वृद्धीदराचा विचार करता, गेल्या १० वर्षांत एप्रिल २०२२ अखेरीस, निप्पॉन इंडिया फार्मा, एसबीआय हेल्थकेअर अपॉच्र्युनिटीज फंड आणि यूटीआय हेल्थकेअर या फंडांनी अनुक्रमे १७.२४ टक्के, १६.११ टक्के, १४.०८ टक्के असा परतावा दिला आहे. भारतीय औषध कंपन्या आज जगाच्या औषधांची (ग्लोबल फार्मसी) गरज भागवत आहेत. सरकारसुद्धा या क्षेत्रात ‘पीएलआय’च्या माध्यमातून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करते आहे. आज कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्डच्या निर्मितीनंतर भारत जगाच्या नकाशात ठळकपणे दिसतोय. सरकारच्या पाठबळामुळे या क्षेत्राचे भविष्य उज्ज्वल दिसते. हे फंड क्षेत्रनिहाय (सेक्टर) असल्याने त्या क्षेत्राची ‘बाजार आवर्तने’ या गुंतवणुकीला लागू होतात आणि त्यामुळेच डायव्हर्सिफाइड म्युच्युअल फंडांपेक्षा या फंडातील जोखीम जास्त आहे. ज्या गुंतवणूकदारांची अल्पमुदतीतील चढउतार नजरअंदाज करून, दीर्घ कालावधीसाठी थांबण्याची तयारी आहे, त्यांनी या प्रकारच्या फंडाचा ‘डोस’ किती प्रमाणात घ्यावा हे आपल्या गुंतवणूक सल्लागाराच्या मदतीने ठरवावे.

या विषयाचा ऊहापोह करताना मन हळूच गतकाळात जाऊन आले. आमच्या घरात अगदी अलीकडेपर्यंत छोटय़ा-मोठय़ा आजारात आमची आजीच आमचा डॉक्टर व्हायची, प्रथमोपचार करायची, कधी तरी कडू औषध द्यायची. आम्ही ती सांगेल ते ऐकायचो, तसेच वागायचो. मी नोकरीला लागल्यावरही तिचा ‘हेल्दी लाइफस्टाइल’चा आग्रह कायम होता. आजी गेली आणि तिचा बटवा आज कपाटातील अडगळीत पडलाय. आजीचे आयुष्य कष्टाचे असले तरी वेगवान नव्हते. याविरुद्ध आजच्या वेगवान आयुष्यात प्रत्येकाचेच मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य, दोन्हीही बिघडत चाललेय. याचीच परिणती म्हणून जीवनशैलीवर आधारित आजार बळावत आहेत. यामुळेच या क्षेत्राचे भविष्य चांगले दिसत जरी असले, तरीही या लेखाचा शेवट करताना ‘सर्वे सन्तु निरामया:’ या प्रार्थनेचे स्मरणही तितकेच गरजेचे आहे.

लेखक मुंबईस्थित गुंतवणूकविषयक अभ्यासक)

(म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजार जोखमींच्या अधीन असते. गुंतवणूक करण्यापूर्वी फंडाचे माहितीपत्रक कृपया सखोल अभ्यासा.)