सध्याच्या जीवशैलीत मोबाइल हा प्रत्येकाच्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. मोबाइलवर अवलंबून राहण्याचं प्रमाण खूप वाढलं आहे. यामुळेच मोबाइल एक मिनिटही जवळ नसला तरी अनेकजण बेचैन होतात. त्यात तो नेहमी चार्ज असावा याचीही काळजी घेतली जाते. सार्वजनिक चार्जिंग स्टेशन्स म्हणजेच विमानतळ, ट्रेन, हॉटेल अशा ठिकाणी अनेकदा लोक मोबाइल चार्ज करताना आढळतात. पण जर तुम्हालाही सार्वजनिक ठिकाणांवर आपला मोबाइल चार्ज करण्याची सवय असेल तर सावधान व्हा. कारण या सवयीमुळे तुम्ही सायबर हल्ला ओढावून घेऊ शकता. देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) ग्राहकांना सार्वजनिक ठिकाणी मोबाइल चार्ज न करण्याचा इशारा दिला आहे.

एसबीआयने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडीओ ट्विट केला आहे. या ट्विटमध्ये त्यांनी लिहिलं आहे की, “जर तुम्ही तुमचा फोन चार्जिग स्टेशनवर चार्ज करत असाल तर यापुढे दोन वेळा विचार करा. तुमच्या मोबाइलमध्ये व्हायरस टाकून मोबाइल हॅक केला जाऊ शकतो. अशा पद्धतीने मोबाइलमधून तुमचा डेटा आणि पासवर्ड चोरला जाऊ शकतो”.

एसबीआयने लोकांना सल्ला दिला आहे की, सार्वजनिक ठिकाणांवर आपला मोबाइल चार्ज करु नका. हॅकर्स ‘ज्यूस जँकिंग’च्या माध्यमातून मोबाइलमधील महत्त्वाची माहिती चोरी करत बँक खातं रिकामं करु शकतात.

ज्यूस जँकिंग काय प्रकार आहे –
ज्यूस जँकिंग एक सायबर हल्ला आहे. यामध्ये चार्जिंग पोर्टमध्ये गुप्तपणे एक इलेक्ट्रिक डिव्हाइस बसवण्यात आलेला असतो. एखाद्या व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणी मोबाइल चार्जिंगला लावला तर डिव्हाइसच्या मदतीने मोबाइलमध्ये व्हायरल घुसवला जातो. ज्यामुळे युजरचा डेटा चोरणं सहज शक्य होतं.

अशावेळी काय करायचं ?
एसबीआयने हा धोका टाळण्यासाठी काही सूचना दिल्या आहेत, ज्याच्या माध्यमातून आपण ज्यूस जॅकिंगपासून बचाव केला जाऊ शकतो. एसबीआयने सांगितलं आहे की, सार्वजनिक ठिकाणी मोबाइल चार्ज करायचा असल्यास चार्जिंग स्टेशनच्या मागे जाऊन तिथे कोणतं इलेक्ट्रिक डिव्हाइस लागलं नाही आहे ना याची खात्री करुन घ्या. तसंच शक्य असल्यास स्वत:चं चार्जिग केबल वापरा. ओळखीच्या दुकानदाराकडून खरेदी करण्यात आलेली पोर्टेबल बॅटरी वापरा. अशा पद्धतीने सायबर हल्ल्यापासून वाचलं जाऊ शकतं.