सुधीर जोशी  sudhirjoshi23@gmail.com
गेल्या सप्ताहाच्या सुरुवातीलाच बाजाराला अनेक क्षेत्रांची उत्साही आकडेवारी जाहीर झाली. जुलै महिन्यात निर्मिती क्षेत्राच्या पीएमआय निर्देशांकाची ५५.३ अंकांची नोंद झाली, जी जून महिन्यात ४८.१ होती. हे आकडे औद्योगिक उत्पादनांतील मोठी वाढ दर्शवितात. जुलै महिन्यात निर्यातीत ४८ टक्क्यांची वाढ झाली तसेच जीएसटी संकलनही पुन्हा एक लाख कोटींच्या वर गेले. प्रवासी वाहनांच्या विक्रीत ४७ टक्क्यांची वाढ झाली. रोजगार हमीच्या कामातील मजुरांच्या संख्येतही घट झाली. ज्याचा अर्थ शेतकी व पूरक व्यवसायात रोजगार तयार होत आहे. असे उत्साही संकेत मिळाल्यावर बाजाराची वाटचाल उत्साहाने झाली तर स्टेट बँकेचे निकाल आल्यावर बँक निफ्टीने देखील खूप दिवसांनी तेजीला हातभार लावला. सेन्सेक्सला ५४,००० चे तर निफ्टीला १६,००० चे लक्ष्य पार पाडता आले.

गेले अनेक महिने वाट पाहायला लावणाऱ्या सन फार्माने जूनअखेर तिमाहीत १,४४४ कोटींचा नफा जाहीर केला. निकालाचे बाजाराने वरचे सर्किट लावून स्वागत केले. अमेरिकेतील टाळेबंदी शिथिल झाल्यावर वाढलेल्या मागणीचा कंपनीला फायदा झाला. हा नफा ६३१ कोटींच्या संभाव्य लायेबिलिटसाठी तरतुदींनंतर झाला आहे. कंपनीने गेल्या तिमाहीत १८५ दशलक्ष डॉलर कर्जाची परतफेड केली आहे. त्यामुळे सन फार्माच्या प्रगतीला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे असे म्हणावे लागेल.

डाबरने तिमाही नफ्यात २८ टक्के वाढ जाहीर करून गुंतवणूकदारांच्या अपेक्षा पूर्ण केल्या. कंपनीचा ग्रामीण भागातील पाया मजबूत करण्याच्या प्रयत्नांना यश येत आहे. आधी ६० हजार गावांत पोहोचणारा माल आता ६९ हजार गावात पोहोचू लागला आहे. खाद्य पदार्थाबरोबर आरोग्यनिगा व स्वच्छता क्षेत्रातील उत्पादनांना व आयुर्वेदावर भर देण्याच्या धोरणाला यश मिळत आहे. गेल्या २० वर्षांत दर पाच वर्षांनी दुप्पट भाव होणाऱ्या या कंपनीमध्ये निकालांनंतर आलेली घसरण ही दीर्घ मुदतीसाठी संधी आहे.

ब्रिटानियाने बाजाराच्या अपेक्षांपेक्षा कमसर कामगिरी केली. विक्रीच्या आकडय़ात फारशी वाढ झाली नाही व नफ्याचे प्रमाणही घसरले. करोना टाळेबंदीचे प्रमाण कमी असल्यामुळे ग्राहकांनी खाद्यपदार्थाची साठवण केली नाही व संचित मागणीचाही फायदा मिळाला नाही. पण कच्च्या मालाच्या किंमती मात्र वाढल्या. बाजारपेठेतील नाव मोठे असल्यामुळे ही कंपनी किंमत वाढवू शकेल व ग्रामीण भागातील करोनाचे प्रमाण घटल्यावर पुन्हा मागणी जोर धरेल. ब्रिटानियामध्ये नजीकच्या काळातील घसरणीत गुंतवणुकीची संधी घेता येईल.

अ‍ॅग्रो केमिकल्समधील मोठे नाव असणाऱ्या पी आय इंडस्ट्रीजने इंड-स्विफ्ट लॅबोरेटरीजच्या एपीआय  व्यवसायाचे अधिग्रहण केले. १,५३० कोटी रुपये खर्च करून औषध घटकांच्या बाजारात टाकलेले हे एक नवे धाडसी पाऊल आहे. नव्या व्यवसायाने कंपनीच्या विक्रीत साधारण ८६० कोटींची भर पडेल व कंपनीचा एपीआय व स्पेशालिटी केमिकल्सच्या क्षेत्रात प्रवेश होऊन व्यावसायिक विविधता साधली जाईल. पी आय इंडस्ट्रीजने आतापर्यंत गुंतवणुकीवर उत्तम परतावा दिला आहे. नव्या क्षेत्रातील पदार्पणाने बाजारात आलेली नकारात्मक प्रतिक्रिया ही गुंतवणूक वाढविण्याची संधी आहे.

स्टेट बँकेने जूनअखेर तिमाहीत ६,५०० कोटींचा विक्रमी नफा नोंदवला. बँकेचे व्याजाव्यतिरिक्त उत्पन्न २४ टक्क्यांनी वाढले. बँकेच्या संभाव्य बुडीत कर्जाचे प्रमाण वाढले असले तरी त्यामध्ये मोठय़ा कंपन्यांचा वाटा कमी आहे. खबरदारी म्हणून त्यासाठी तरतूद केली असून अधिक व्याजासह कर्जवसुली होण्याचा व्यवस्थापकांना विश्वास आहे. कमी व्याजदराच्या काळात बँकेच्या नफ्यात वाढ अपेक्षित आहे. सध्याचा बाजारभाव गुंतवणुकीसाठी आकर्षक आहे.

सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी रिझव्‍‌र्ह बँकेचे द्विमासिक पतधोरण जाहीर झाले. अर्थव्यवस्था रुळावर येण्यासाठी मागणी वाढणे आवश्यक आहे. अर्थव्यवस्थेचा वृद्धीदर समाधानकारक राहण्याच्या धोरणाला अनुसरून, रिझव्‍‌र्ह बँकेने व्याजदर स्थिर ठेवले. रिझव्‍‌र्ह बँकेने सद्य आर्थिक वर्षांसाठी जीडीपी वाढीचा कयास पूर्वानुमानानुसार ९.५ टक्के पातळीवर कायम ठेवताना किरकोळ किमतींवर आधारित महागाई दरात वाढीचा अंदाज ५.१ टक्क्यांच्या पूर्वानुमानावरून ५.७ टक्क्यांपर्यंत वाढविला आहे. देशभरात पर्जन्यमानाचे पुनरुज्जीवन आणि खरिपाच्या पेरणीत वाढ होईल आणि ऑक्टोबरनंतर खरिपाचे प्रत्यक्षात कृषी उत्पादन उपलब्ध झाल्यावरसुद्धा महागाई कमी होण्याची आशा नसल्याचे रिझव्‍‌र्ह बँकेने सूचित केले आहे. सध्याची रोकड सुलभता कमी होणे अपेक्षित आहे. जशी रोकड सुलभता कमी होईल तसा त्याचा बाजारावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.

गेल्या सप्ताहाचे वैशिष्टय़ म्हणजे सेन्सेक्स व निफ्टी नवे उच्चांक गाठत असताना काही गुंतवणूकदारांचे पोर्टफोलियो मूल्य मात्र खाली आले. कारण मिडकॅप व स्मॉलकॅप निर्देशांक घसरत होते. बाजारातील वरच्या टप्प्यावर थोडी नफावसुली अपेक्षित असते व अशा वेळी लहान कंपन्यांमधून बाहेर पडणे जरुरीचे असते. कारण तेथे जोखीम जास्त असते. युरोप व चीनमध्ये डेल्टा विषाणूचा धोका वाढला आहे. लसीकरणातील प्रगतीमुळे व आधीच्या अनुभवांमुळे हा धोका गुंतवणूकदारांना भयप्रद वाटत नाही. पण बाजार नव्या उच्चांकावर असताना नवीन खरेदी चोखंदळपणे व थोडी हात राखून करायला हवी. लहान अवधीच्या गुंतवणुकीतील नफा वसूल करायला हवा.