श्रीकृष्ण हा पूर्णावतार आहे. महाभारताच्या युद्ध भूमीवरचे कृष्णाचे विराट रूप त्याची महती विशद करते. श्रीकृष्ण हा सर्वश्रेष्ठ योद्धा, तत्त्ववेत्ता होता, ही त्याची भूमिका प्रसिद्ध असली तरी निःसंशय कृष्णाची दुसरी ओळख ही राधेचा कृष्ण तर सुदाम्याचा सखा म्हणूनही आहे. एका बाजूला योद्धा, तत्त्ववेत्ता तर दुसऱ्या बाजूला प्रेमळ सखा, प्रियकर कृष्ण. या कृष्ण सख्याचे वेड केवळ राधेलाच लागले असे नाही तर त्या पलीकडे संपूर्ण विश्वच त्याच्या प्रेमात होते आणि आहे. अनेक स्त्रियांनी त्याला मनोमन आपला स्वामी, पती मानले होते. किंबहुना श्रीकृष्णाने रुक्मिणी, सत्यभामा, जांबवती, मित्रविंदा, कालिंदी, लक्ष्मणा, भद्रा आणि नागनजीती या आपल्या प्रमुख आठ पत्नींशिवाय; नरकासुराच्या तावडीतून सोडविलेल्या १६ सहस्र राजकुमारींची सुटका केल्यानंतर त्यांच्याशी विवाह करून त्यांना समाजात मानाचे स्थान मिळवून दिले होते, असे मानले जाते. असे असले तरी श्रीकृष्णाच्या हृदयाचा ठोका चुकविणारी रुक्मिणी ही मात्र त्याची पहिली भार्या ठरली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रुक्मिणीने कृष्णाला श्रीकृष्ण केले. त्याच रुक्मिणीशी कृष्णाचा झालेला विवाह हा साधा सुधा नव्हता. एखाद्या चित्रपटाच्या नायकाने भर मंडपातून नायिकेचे हरण करावे, तसा हा प्रसंग! कृष्णाला ‘राधेचा कृष्ण’ म्हणून ओळखले जाते म्हणूनच अनेकांना प्रश्न पडतो, राधा असताना कृष्णाने रुक्मिणीशी विवाह का केला? …तर अनेकांना रुक्मिणी कोण हेच माहीत नसते. कृष्ण महाराष्ट्रात येवून पंढरपुरी विठ्ठल झाला. युगे अठ्ठावीस जो विटेवर उभा आहे. परंतु तो जिच्या मागे आला, त्या रखुमाईचा मात्र जगाला विसर पडला. तीच विठ्ठलाची रखुमाई, कृष्णाची रुक्मिणी आहे.

महानुभाव पंथांच्या साती ग्रंथांमध्ये कवी नरेंद्रांच्या ‘रुक्मिणीस्वयंवर’ या ग्रंथांचा समावेश होतो. यावरूनच महाराष्ट्र मनावरील रुक्मिणीस्वयंवर कथेची पकड लक्षात येते. रुक्मिणीस्वयंवरावर मराठीत जवळपास पंचवीसपेक्षा अधिक आख्यानकाव्य उपलब्ध आहेत.

अधिक वाचा : एक उत्कट अधुरी प्रेम कथा…. उर्वशी आणि पुरुरवा!

रुक्मिणीचे आणि महाराष्ट्राचे अतूट नाते

रुक्मिणीची ओळख ही विदर्भ कन्या म्हणून आहे. ती विदर्भ राज्यातील ‘कुंडीनापुरा’ म्हणजेच आजचे कौंडण्यपूर या शहराची होती म्हणून तिला वैदर्भी असेही म्हटले जाते. तिचे वडील राजा भीष्मका होते. त्यांची ही कन्या अतिशय सुंदर होती. इतकेच नाही तर पाच भावांमधील एक बहीण म्हणून विशेष लाडकी होती. असे असले तरी तिच्या पाच शक्तिशाली भावांनी, विशेषत: रुक्मी याने तिच्या लग्नाद्वारे एक शक्तिशाली राजकीय युती घडवून आणण्याचा घाट घातला होता. रुक्मीला त्याची बहीण ‘रुक्मिणी’ आणि चेदीचा राजपुत्र शिशुपाल यांचा विवाह व्हावा असे वाटत होते. परंतु रुक्मिणी मात्र या विवाहाला तयार नव्हती, तिने आधीच कृष्णाला आपला पती म्हणून वरले होते.

कृष्ण आणि रुक्मिणीची पहिली भेट

कृष्ण आणि रुक्मिणीची पहिली भेट मथुरेत झाली. रुक्मिणीचा भाऊ रुक्मी आणि बलराम यांच्यातील मुष्टियुद्धादरम्यान ही नजरानजर झाली होती. काळ्या सावळ्या श्रीहरीला प्रथम दर्शनी पाहताच रुक्मिणी त्याच्या प्रेमात पडली, हे झाले रुक्मिणीचे.

सावळा हरी हा विश्वाचा कर्ताधर्ता असला तरी रुक्मिणी सुद्धा साक्षात पद्माच. तिच्या सौंदर्याच्या एका नजर कटाक्षात जगत पालनकर्ता हरवून गेला. श्री कृष्ण आणि रुक्मिणी यांच्यातील प्रणय लीला बहरत असताना. बलरामाविरुद्धच्या मुष्टियुद्धात आलेल्या अपयशामुळे रुक्मीने या यादव बंधूना कायमचे आपले शत्रू मानले.

अधिक वाचा : श्रावण विशेष : शिवशंकराची प्रेमाची व्याख्या!

रुक्मीणीचे स्वयंवर

रुक्मिणीचे स्वयंवर आयोजित करण्यात आले होते. या स्वयंवरात फक्त शिशुपाल विजयी होईल अशी खातरजमा रुक्मीने केली होती. श्रीकृष्णाला या स्वयंवराच्या आमंत्रणातून वगळण्यात आले होते, हे रुक्मिणीला कळताच तिने फक्त कृष्णाशी लग्न करण्याचा किंवा स्वतःला संपविण्याचा संकल्प केला. अशाप्रकारे कृष्ण आणि रुक्मिणीच्या प्रत्यक्ष प्रेमकथेला सुरुवात झाली.

तिने कृष्णाला एक गुप्तपत्र लिहिले. त्यामध्ये, कृष्णावरील तिचे प्रेम कोणत्याही अनिश्चित अटींशिवाय स्पष्ट केले होते. आणि येथून तिला घेवून जाण्याची विनंती केली होती. रुक्मिणीचे हे धाडस नक्कीच तिचे वेगळेपण सिद्ध करणारे होते. तिने कृष्णला साद घातली होती. तिने पुढाकार घेतला होता. या धाडसी निर्णयाला कृष्णाने प्रतिसाद दिला नसता तर ते विरळच ठरले असते.

स्वयंवराच्या दिवशी रुक्मिणी सकाळी कात्यायनी देवीच्या मंदिरात दर्शनासाठी गेली होती. हीच संधी साधून कृष्णाने तिचे हरण केले, कृष्णाला अडविण्याचा रुक्मीने सर्वार्थाने प्रयत्न केला. परंतु यादव सैन्यासमोर त्याला हार पत्करावी लागली.
कृष्ण आणि रुक्मिणी द्वारकेत परतल्यावर त्यांचा विवाह मोठ्या थाटात पार पडला. याच वेळी पौराणिक संदर्भानुसार श्रीकृष्णाने रुक्मिणी ही लक्ष्मीचा अवतार असल्याचे जाहीर केले. लक्ष्मी म्हणजे साक्षात श्री, लक्ष्मीलाच श्री असे संबोधतात.
कृष्ण आणि रुक्मिणी यांच्या विवाहानंतर कृष्ण हा श्रीकृष्ण म्हणून ओळखला जाऊ लागला. पुढे कामदेवाने ‘प्रद्युम्न’ नावाने श्रीकृष्ण आणि रुक्मिणीच्या पोटी जन्म घेतला.

अधिक वाचा : तृतीयपंथीयांचे संदर्भ सांगणाऱ्या पौराणिक कथा !

रुक्मिणी वेगळी का?

पौराणिक कथांनुसार श्रीकृष्णाच्या आठ पत्नींमध्ये नेहमीच कृष्णाची प्रिय कोण यावरून कलह होताना दिसतो. या सर्वात सत्यभामा नेहमीच वर्चस्व सिद्ध करण्यात अग्रेसर असायची. एकदा नारद मुनींनी सत्यभामाला कृष्णाच्या वजनाचे दागिने देण्याचे आवाहन केले. त्याप्रमाणे तराजूच्या एका भागावर कृष्ण आणि दुसऱ्या भागावर सत्यभामेने आपले दागिने ठेवण्यास सुरुवात केली. महालातले सगळे दागिने संपले तरी कृष्णाइतके वजन काही भरत नव्हते, शेवटी सुभद्रेने हार मानून रुक्मिणीची मदत घेतली, रुक्मिणीने केवळ तुळशीपत्र आणून सुभद्रेच्या दागिन्यांवर ठेवले. त्यामुळे वजन काटा अचानक वर गेला. रुक्मिणी ही कृष्णाला त्यांच्या अंतरंगातून ओळखत होती, रुक्मिणी ही श्रीकृष्णाची केवळ राणीच नव्हे तर उत्कट भक्तही होती त्यामुळेच ती वेगळी ठरते.

रुक्मिणी स्वयंवर ही काही कोण्या विकारवश माणसाच्या विवाहाची कथा नव्हे, तर ती प्रत्यक्ष जगदीश्वराच्या विवाहाची कथा आहे. या कथेतून रुक्मिणीच्या भक्तीची प्रचिती येते. त्यामुळेच ही कथा भक्ती परंपरेत महत्त्वाची ठरते.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Krishna and rukminis love story in mahabharata svs