14 December 2017

News Flash

शारदीय चांदण्यात नांदणे..

‘गेले अनेक आठवडे तुम्ही मला पोस्ट ऑफिसात खेटे घालायला लावताय.

पंकज भोसले | Updated: September 30, 2017 5:22 AM

समजा एखादी व्यक्ती कितीही अतिरूक्ष, अतिनीरस आणि आयुष्याला विटलेली असली, तरी तिन्ही त्रिकाळ चौसष्टपैकी आजूबाजूला घडत असणाऱ्या कुठल्या ना कुठल्या कलेसोबत तिला जगणे भाग असते. जागृत वा अर्धजागृत अशा कोणत्याही अवस्थेत हे अटळच असते. तुम्ही कधीच कलाहीन जगू  शकत नाही. आवड-सवड नसली तरी जगताना प्रत्येकाच्या आजूबाजूला गाणे, सिनेमा, संगीत आणि साहित्याची प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष पाश्र्वभूमी सुरू असतेच. प्रत्येक जण त्याकडे कोणत्या वकुबाने पाहतो, हे त्याच्या कलाआस्वादनाचे रूप ठरवते. पण कला जगण्यासाठी वा कळण्यासाठी असामान्य व्यक्ती असण्याची किंवा विशिष्ट शिक्षणाचीही गरज नसते. रस्त्यावरील जत्रेत प्राणघातक अदाकारी साकारणारे डोंबारीही कलाच जगतात आणि अखंड मेहनत करून टीव्हीवरील नृत्यस्पर्धाच्या कार्यक्रमांमध्ये प्रेक्षकांच्या मतजोगव्यावर जिंकणारे-हरणारे कलाकारही कलेमध्ये रममाण असतात. आपण जे ऐकतो, पाहतो आणि अनुभवतो, आपल्या इतिहासाला जेवढे डोक्यातून लादतो आणि वर्तमानात जे उपभोगतो त्या सर्वावर कुठल्या ना कुठल्या कलेचे अस्तर असते.. अ‍ॅली स्मिथ यांची ‘ऑटम’ वाचल्यानंतर जाणवणारा विचारचाव्यांचा हा जुडगा आहे.

अ‍ॅली स्मिथची सातवी कादंबरी ‘ऑटम’ यंदा बुकरच्या लघुयादीमधील सर्वात छोटय़ा आकाराची आणि लगोलग संपणारी कादंबरी आहे. पण तिच्या रूढ कथानक नसलेल्या या कादंबरीबंधात पात्रांच्या सोप्या प्रवाही संवादाचे फार महत्त्व आहे. येथला एक प्रसंग.. उपमुख्य पात्राच्या आयुष्यातील पोस्ट ऑफिसच्या संवादचित्रांचाच घेतला तरी ते लक्षात येऊ शकेल.

एलिझाबेथ डिमांड हे कादंबरीतील उपमुख्य पात्र. पासपोर्ट कार्यालयामध्ये नव्याने पारपत्र बनवायला पाठविण्यासाठी ती पोस्ट ऑफिसामध्ये जाते. पोस्ट ऑफिसमध्ये आपल्याला कागदपत्रे दाखल करण्याच्या विभागापर्यंत पोहोचण्यासाठी ती पुस्तक वाचत वाट पाहते. कैक तासांनंतरही दोन किंवा तीन माणसांउपर नसलेली रांग पुढे सरकत नाही. तिचे ‘ब्रेव्ह न्यू वर्ल्ड’ कादंबरीचे वाचन सुरूच राहते. दरम्यान, ती जुन्या पुस्तकांच्या दुकानाचा फेरफटका करूनही येते, तरीही तिचा क्रमांक येत नाही. अखेर बऱ्याच कालावधीनंतर तिचा नंबर येतो, तेव्हा तेथील अधिकाऱ्याला एलिझाबेथ सल्ला देते : ‘मी सकाळपासून येथे अडकून पडली आहे. माझे सकाळी वाचायला घेतलेले पुस्तक पूर्ण झाले आहे. तेव्हा येथे वाट पाहत ताटकळत बसणाऱ्यांसाठी एक छोटे ग्रंथालय तयार केले, तर त्यांचे वाट पाहणे वाचनासोबत सुकर होईल.’ यावर जणू खाष्ट कोंकणी थाटात तेथील अधिकारी ‘लायब्ररी बंद झाल्यापासून पोस्ट ऑफिसात लोक सेवा घेण्यासाठी येतच नाही मुळी. ते आपले नुसतेच निवाऱ्याकरिता येथल्या जागांवर पथारी टाकतात,’ असे उत्तर देतो. पुढे एलिझाबेथच्या भरलेल्या फॉर्मवरून आणि त्यात डकविलेल्या फोटोच्या आकारावरून विविध कुरबुरी काढत बसतो.

‘गेले अनेक आठवडे तुम्ही मला पोस्ट ऑफिसात खेटे घालायला लावताय. नक्की या आठवडय़ात काम होईल ना? नाही तर माझ्याकडे न वाचलेल्या अभिजात पुस्तकांचा भरपूर मोठा साठा आहे. पुढल्या वेळेपासून तो संपवता येईल.’ या एलिझाबेथच्या उत्तरावर तो आणखी करवादतो आणि नंतर तिची कागदपत्रे पाहून ‘हे पोस्ट ऑफिस आहे. एखादी कथा-कादंबरी नाही,’ हे तिला बजावतो. त्यावर ‘एलिझाबेथ टेचात त्या अकथनात्मक पोस्ट ऑफिसातून निघून जाते’, असे अ‍ॅली स्मिथ लिहितात आणि या प्रसंगाला गमतीशीर बनवून टाकतात! पोस्ट ऑफिसात प्रदीर्घ काळ चालणारा ताटकळत वाट पाहण्याच्या वरवर साध्या वाटणाऱ्या या प्रकारालाही साहित्य व्यवहाराशी जोडणारा प्रकार हा अ‍ॅली स्मिथ यांच्या लेखनाचा विशेष आहे. त्या विशेषामुळे या कादंबरीची निवड स्पर्धेत झाली असावी.

ही कादंबरी ब्रेग्झिटोत्तर युरोपातील सामूहिक मनाचे प्रतिनिधित्व करणारी कादंबरी आहे, असा तिचा गौरव केला जात असला, तरी सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे ती फक्त युरोपशी संबंधित नाही. जगातल्या कोणत्याही भागातील व्यक्तीला आपल्या भवतालाकडे पाहण्याची नवी दृष्टी देणारी तिची रचना आहे.

यातील प्रमुख पात्रे आहेत डॅनियल ग्लुक हा १०१ वर्षांचा चिरतरुण आणि एलिझाबेथ डिमांड ही ३२ वर्षांची साहित्य शिकविणारी प्राध्यापिका. कादंबरीमध्ये थोडय़ा काळानंतर लक्षात येते, की फार वर्षे आधी डॅनियलच्या वयाच्या पानगळीच्या अवस्थेत म्हणजेच शरद ऋतूत या दोघांची पहिली भेट झालेली असते. आठ वर्षांची असताना एलिझाबेथला शाळेत ‘आमचे शेजारी’ या विषयावर निबंध लिहायला सांगितलेला असतो. जेमतेम सहा आठवडे नव्या घरात राहायला आल्यानंतर एलिझाबेथने या निबंधाच्या मिषाने आपल्याहून ६७ वर्षांनी मोठय़ा डॅनियल ग्लुकला गाठलेले असते. या भेटीनंतर सतत बालसुलभ वयातील वाढत जाणाऱ्या भेटींमध्ये डॅनियल ग्लुक तिला वाचनाची, चित्रकलेची, छायाचित्रांची आणि संगीतज्ञानाची दीक्षा देतोय. युरोपातील पन्नास ते सत्तर वर्षांतील राजकीय, सामाजिक आणि कलेच्या क्षेत्रातील घडामोडींच्या इतिहासाचा त्या निमित्ताने नव्याने आढावा घेतला जातो.

वर सांगितलेल्या गोष्टी या कादंबरीत आलटून पालटून घडत असतात. मृत्युओढीला लागलेला डॅनियल १०१ व्या वर्षी वृद्धाश्रमामध्ये आहे आणि एलिझाबेथ ब्रिटनमधील विद्यापीठामध्ये साहित्य शिकवितानाही विद्यार्थिदशेत राहत होती त्याच भाडय़ाच्या खोलीमध्ये राहात आहे.

कादंबरीत एका प्रकरणात वय वर्षे आठ असतानाची तिची आठवण सुरू होते, तर कधी वय वर्षे १३ असताना ती पोक्त व्यक्तीसारखी कलेकडे पाहू शकते. तिच्या आईला ती डॅनियलने दिलेल्या कलाभानाचे दाखले देताना आई घाबरून जाते. आपल्या मुलीची थोडय़ा काळासाठी देखभाल करणाऱ्या शेजाऱ्याने नक्की तिला कलेच्या नावाने काय काय दाखविले, याची खोदून खोदून चौकशी सुरू होते.

एलिझाबेथ डॅनियलच्या सान्निध्यात आलेल्या बॉब डिलनबद्दल सांगते, आत्महत्या केलेल्या कवयित्री सिल्व्हिया प्लाथबद्दल त्यांची चर्चा होते. पॉलिन बोटीच्या चित्रकला आणि पॉपआर्टवर चर्चा होते. छायाचित्रांचे संदर्भ उलगडून सांगितले जातात. विस्मृतीत गेलेल्या लोकप्रिय कलाकारांची माहिती दिली जाते. हा सारा मोठा ऐवज अत्यंत सहजरीत्या आणण्यासाठी स्मिथ कथानकामध्ये काळांचा अदलाबदल अत्यंत सहज करतात. तृतीयपुरुषी निवेदन प्रथमपुरुषी वाटण्याइतपत इथल्या निवेदनामध्ये सोपेपणा आहे.

ही कादंबरी ब्रिटनमधील ‘फॉरेस्ट गम्प’ आहे. या कादंबरीतील प्रमुख पात्र अमेरिकेतील सर्वच राजकीय, सामाजिक घटनांमध्ये प्रमुख दाखविला आहे. तसेच ‘ऑटम’ कादंबरीमध्ये पूर्णपणे वेगळ्या शैलीमध्ये ५० ते ७० वर्षांचा कलात्मक आणि राजकीय ब्रिटन चितारला आहे. ख्रिस्टिन किलर या ललनेमुळे १९६३ साली ब्रिटनच्या राजकीय पटलावर घडलेले ‘प्रोफ्युमो अफेअर’ वेगळ्या अंगाने येथे समोर येते. तर ब्रिटनने युरोपीय संघामधून बाहेर पडण्याच्या घेतलेल्या निर्णयानंतर समाजमनामध्ये झालेल्या प्रत्यक्ष बदलाचे वर्णन येते. खेडय़ामधील निम्म्या लोकांचा एकमेकांशी हरविलेला संवाद, एकमेकांना तसेच विस्थापित निर्वासितांना तुच्छ नजरेतून पाहण्याची लोकांची मानसिकता, लोकांच्या घरांबाहेर ‘आपल्या घरी निघून जा’ लिहिण्यापासून त्या खाली ‘आम्ही आमच्या घरीच पोहोचलो आहोत’ या भित्तिपत्रयुद्धाची चर्चाही कादंबरीमध्ये आली आहे. त्यामुळे पहिली ‘ब्रेग्झिटोत्तर’ कादंबरी बनण्याचा सन्मानही तिला गेला आहे.

या सगळ्यात एलिझाबेथ आणि डॅनियलचे कलात्मक प्रेमाचे जगणे अनेक चपखल पुस्तकांच्या संदर्भानी संपृक्त झाले आहे. शेक्सपिअरचे द ‘टेम्पेस्ट’, चार्ल्स डिकन्सचे ‘ए  टेल ऑफ टू सिटीज’, अल्डस् हक्स्लेचे ‘ब्रेव्ह न्यू वर्ल्ड’ आणि काफ्काच्या ‘मेटामॉर्फसिस’चे कैक संदर्भ येथे वापरले गेले आहेत.

हवा गेलेल्या फुटबॉलसारखे शरीर झालेल्या डॅनियल आणि म्हाताऱ्याच्या सान्निध्यात तरुण वयात साहित्यभानाची उंची मिळविणारी एलिझाबेथ यांचे संवादी कलाप्रेम विविधांगांनी आपल्या डोक्यामधली विचारचक्रे जागृत करतात. आपल्याभोवती असलेल्या कलेच्या जगण्यात उतरलेल्या घटकांची आपल्याला ओळख करून देतात.

अ‍ॅली स्मिथ यांचे करडे पुस्तकप्रेम दोन वर्षांपूर्वी आलेल्या ‘पब्लिक लायब्ररी’ या वाचनालयांच्या स्थितींवर लिहिलेल्या कथांमधून समोर आले होते. ‘हाऊ टु बी बोथ’ ही त्यांची कादंबरी २०१५ साली बुकरच्या लघुयादीमध्ये दाखल झाली होती.

‘ऑटम’ ही अ‍ॅली स्मिथ यांच्या ऋतुनावांच्या प्रस्तावित चार कादंबरी प्रकल्पातील पहिली कादंबरी असून पुढील कादंबरी ‘विंटर’ पुढील वर्षी प्रकाशित होणार असल्याचे घोषित झाले आहे. ती येईस्तोवर ‘ऑटम’द्वारे इथल्या शारदीय चांदण्यात उत्तमरीत्या नांदण्याचा अनुभव त्याच्या वाचकांना घेता येऊ शकेल.

ऑटम

लेखिका : अ‍ॅली स्मिथ

प्रकाशक : पेंग्विन

पृष्ठे : २७२, किंमत : ४९९ रुपये

 

पंकज भोसले

pankaj.bhosale@expressindia.com

First Published on September 30, 2017 5:22 am

Web Title: autumn novel by ali smith