‘आपण मर्त्य आहोत’ ही माणसाच्या जीवनातील सर्वात महत्त्वाची वस्तुस्थिती आहे, असे प्रतिपादन करणारे हे पुस्तक नश्वरतेची ही जाणीव जगण्याला अर्थ देते आणि त्यातून जन्मलेली नैतिकता या अर्थालाच पुढे दिशा दाखवते ती कशी, हेही सांगते..

अद्वैत उदय शुक्ल

‘आणि जीविता, लाभ हाच का

तुझ्या संगतीं राहुनियां?

असेंच जाणें असे सदा का

कालौघावर वाहुनियां?’

कोविड-१९ महामारीच्या काळात आजूबाजूला चालू असलेले मृत्यूचे थैमान पाहून, गोविंदाग्रजांच्या वरील ओळी आठवल्या आणि प्रश्न पडला की, मी कालपर्यंत जी धडपड करीत होतो, जे मी रोज जगत होतो, त्याला मी मेल्यानंतर काय अर्थ असेल? सतत वर जाणारा मृतांचा आकडा पाहून, मी आपल्या अस्तित्वाचा विचार करू लागलो. आपण आज आहोत, उद्या नाही, तरीही जगात काय फरक पडेल? असेच काळासोबत आपणही एक दिवस नष्ट होऊन जाऊ, हा विचार खूपच भीतीदायक होता. कदाचित असा विचारही कित्येक जणांनी करून झाला असेल आजपर्यंत! असा विचार करत असताना त्यापासून परावृत्त होण्याकरिता मी नेटफ्लिक्सवर ‘द गुड प्लेस’ ही वेबमालिका पाहायला सुरुवात केली, त्यात टॉड मे या लेखकाच्या ‘डेथ’ या पुस्तकाचा संदर्भ आला आणि नव-अस्तित्ववादाच्या तत्त्वज्ञानाचे हे पुस्तक हाती घेतले.

टॉड मे हे गेल्या ३० वर्षांपासून ‘तत्त्वज्ञान’ या विषयाचे अध्यापन करत आहेत. ‘डेथ’ हे पुस्तक म्हणजे नव-अस्तित्ववादावरील एक प्रबंध आहे. ‘आपण मर्त्य आहोत’ ही माणसाच्या जीवनातील सर्वात महत्त्वाची वस्तुस्थिती आहे, असे मे म्हणतात. लुडविग विटगेन्स्टाइन म्हणतो तसे- ‘मृत्यू ही काही आपल्या आयुष्यातील घटना नाही’ हे जरी खरे असले तरीही, मृत्यू हीच सर्वात मोठी वस्तुस्थिती आहे हेही तितकेच खरे! कारण मनुष्य सोडून बाकी प्राण्यांना मृत्यू तेव्हाच कळतो, जेव्हा तो त्यांच्या जवळ येतो. याउलट, माणसाच्या आयुष्यात जेव्हापासून त्याला मृत्यू म्हणजे काय हे समजते, तेव्हापासून शेवटपर्यंत तो या वस्तुस्थितीसोबत जगत असतो. मनुष्य सतत कधी ना कधी स्वत:च्या मृत्यूबद्दल विचार करतच असतो. आपल्यानंतर या ‘मी’चे काय होते, हा प्रश्न त्याला सतावत असतो. असेच काहीसे जपानी लेखक हारुकी मुराकामीदेखील सांगतो; तो म्हणतो- ‘मृत्यू हा जगण्याच्या विरुद्धार्थी नसून, तो जगण्याचाच भाग आहे!’

टॉड मे यांच्या मते, माणूस याच कारणामुळे धर्म, पुनर्जन्म, मरणोत्तर आयुष्य, संसारचक्र अशा संकल्पनांमध्ये विश्वास ठेवू लागतो. कारण अशा संकल्पना माणसाला मृत्यूच्या वस्तुस्थितीपलीकडे असणाऱ्या अस्तित्वाच्या जाणिवेने धीर देतात. मृत्यूनंतर केवळ शरीर मरते, आत्मा म्हणजेच ‘मी’चे अस्तित्व उरते, ही संकल्पना मृत्यूच्या वस्तुस्थितीने तयार केलेल्या पोकळीला भरण्यास मदत करते. थोडक्यात, माझे अस्तित्व मृत्यूमुळे लगेच संपणार नाही ही आशा माणसाला मिळते. याचाच अर्थ, माणूस मृत्यूला घाबरत असतो. मृत्यू हा शाप आहे अशी त्याची धारणा असते, आणि म्हणून चिरंजीवी होण्याची तो स्वप्ने पाहू लागतो. इथे टॉड मे यांचा दृष्टिकोन थोडा अज्ञेयवादी वाटतो खरा; परंतु इथेच ते त्यांच्या तत्त्वज्ञानाचा पहिला पैलू उलगडून दाखवतात. ते सांगतात की, मर्त्य असणे अथवा नश्वरता हा शाप नसून वरदानच म्हणायला हवे.  नश्वरता  (मोर्टालिटी) ही अस्तित्ववादाला (एक्झिस्टेन्शिअ‍ॅलिझम) जन्म देते.

टॉड मे यांचा अस्तित्ववाद ज्याँ-पॉल सात्र्च्या अस्तित्ववादापेक्षा थोडा वेगळा म्हणावा लागेल. मे म्हणतात, नश्वरतेमुळे माणसाला त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांचे महत्त्व कळते. त्यामुळे मे यांचा अस्तित्ववाद सकारात्मक अस्तित्ववाद वाटतो. मृत्यू माणसाच्या विचारांना झपाटून टाकतो. आपण उद्या मरू शकतो या भीतीने अथवा माहितीने मात्र तो खऱ्या अर्थाने जगू लागतो. मर्त्यपणाच्या जाणिवेने माणूस अस्तित्वाचे महत्त्व समजू लागतो. ‘जग फिरणे’, ‘एखादी गोष्ट एकदा तरी करून पाहणे’, ‘आयुष्यात काही तरी ध्येय असणे’ या गोष्टी अस्तित्वाच्या जाणिवेतूनच जन्म घेतात.  याउलट, जर एखादा व्यक्ती अमर असेल तर त्याच्या आयुष्यात असणाऱ्या गोष्टींना महत्त्व राहत नाही. म्हणजेच, जेव्हा एखादी गोष्ट करून पाहायला काल-मर्यादा असते, तेव्हा तिचे महत्त्व जाणवते; पण जेव्हा तीच गोष्ट अमर्याद काळापर्यंत मिळते तेव्हा तिचे महत्त्व राहत नाही. तसेच काहीसे चिरंजीवी माणसाचे होऊ शकते. कारण त्याला प्रत्येक गोष्ट करून पाहण्याकरिता बराच काळ मिळतो. नश्वर असल्यामुळे ‘मी कोण आहे?’, ‘काय करत आहे?’ किंवा ‘कोणासोबत राहत आहे?’ या सर्व गोष्टींना महत्त्व येते. चिरंजीवी माणूस मात्र या गोष्टींना तितके महत्त्व देऊ शकत नाही, कारण त्याच्यासाठी काळ अमर्याद आहे. जर सारासारविचार केला तर शेवटी हेच जाणवते की, नश्वरता हेच खरे वरदान आहे. आपले आयुष्य मर्यादित आहे म्हणून माणूस आज दु:ख विसरून पुढे जातो. परंतु अमर असणाऱ्या माणसाला असे करता येणार नाही; कारण त्याच्या आयुष्यात काळ अमर्यादित असेल आणि त्यामुळे त्याच्या पुढे राहिलेल्या आयुष्यात सकारात्मकता राहणार नाही.

टॉड मे इथे एक विचित्र उदाहरण देतात. ते सांगतात, मर्त्य माणसाला त्याच्या मुलाच्या मृत्यूनंतर होणारे दु:ख, एखादवेळेस तो पचवू शकतो, कारण त्याला माहिती असते की उद्या मीदेखील मरणार आहे. याउलट समजा ज्याच्या मुलाचा मृत्यू झाला तो जर चिरंजीवी असेल, तर त्याला त्याचे चिरंजीवी असणे हे नक्कीच शाप वाटेल. समजायला आधी काहीसे कठीण वाटेल, पण त्या स्थितीत जाऊन विचार केला तर नश्वरता आणि अस्तित्ववाद हळूहळू कळू लागतो.

टॉड मे यांनी दिलेले हे उदाहरण वाचून, रघुपती सहाय ऊर्फ फिराक गोरखपुरी यांचा एक किस्सा आणि एक शेर आठवला. फिराक यांचा मुलगा नववीत असताना, सतत नापास झाल्याने व बरोबरच्यांच्या हिणवण्यामुळे त्याने आत्महत्या केली होती. फिराक यांनीच लिहिलेल्या या पुढील ओळी :

‘मौत का भी इलाज हो शायद।

जिंदगी का कोई इलाज नहीं।’

टॉड मे यांच्या मते, नश्वरता आपल्या अस्तित्वाचे अशा प्रकारे महत्त्व पटवून देते. मर्त्य असणेच अस्तित्ववादाला जन्म देते. पुढे हाच अस्तित्ववाद याच पार्श्वभूमीवर नैतिकतेला जन्म देतो. मे यांच्या मते, नश्वरता जगण्याला अर्थ देते आणि नैतिकता या अर्थालाच पुढे दिशा दाखवते. आनंद आणि वेदना यांवर आधारित उपयुक्ततावादावर मे यांनी टीका केली आहे. ते म्हणतात, आनंद आणि वेदना यांवर आयुष्य आधारलेले नसून, ते केवळ आयुष्याचा एक भाग आहेत. आनंद आणि वेदना यांचे थोडय़ा काळाकरिताच महत्त्व असते, ती आपल्या आयुष्यातील फक्त काही विरामचिन्हे असतात. थॉमस नेगलच्या तत्त्वज्ञानाचा आधार घेतल्यास हे लक्षात येते की, जर आपण आयुष्याच्या अनुभवात आनंद म्हणजे धन (+) आणि वेदना/दु:ख म्हणजे ऋण (-) असे गृहीत धरले आणि नंतर दोघांना काढून टाकले, तरी मागे बाकी शून्य राहत नाही, उरते ते धनच (+)!  कारण या साऱ्यामागे जो ‘अनुभव’ उरतो, तोच सर्वात सकारात्मक असतो. अस्तित्ववादाचे खरे मूल्य म्हणजे अनुभव घेणे.

पुढे टॉड मे म्हणतात, मृत्यूची भीती आणि चिरंजीवी होणे हे दोन्ही आपले वैरी होतात आणि जेव्हा हे समजते तेव्हा माणसासमोर उभा राहतो मोठा पेच. कारण मृत्यू म्हणजे साऱ्याचा शेवट आणि चिरंजीवी होणे म्हणजे कसलाच शेवट न होणे! मृत्यूमुळे आपली ध्येये, आपली स्वप्ने संपतात आणि अमर होण्यामुळे मात्र माणसाच्या जीवनात निरसता येते. मे यांच्या मते, हा पेच प्रत्येक व्यक्ती कळत अथवा नकळत सोबत घेऊन जगत असतो. हा पेच कसा सोडवायचा आणि स्व-जीवनाला कसा अर्थ द्यायचा, यातूनच माणूस जगण्यातला अर्थ शोधू लागतो.

लेखक इथे आयुष्याला महागडय़ा घडय़ाळाची उपमा देतो आणि सांगतो, जर घडय़ाळ घातले तर ते तुटू शकते किंवा हरवू शकते, म्हणून घडय़ाळ कायम कपाटात ठेवण्यात काय अर्थ आहे? जेव्हा माणसाला कळते की कपाटात ठेवूनही घडय़ाळ बंद पडू शकते, तेव्हा तो ते वापरू लागतो. तसेच आयुष्याचे आहे; मृत्यू हे अंतिम सत्य मानून जेव्हा माणूस या सत्यासोबत जगायला शिकतो, तेव्हा तो आयुष्याला अर्थ देतो. तेव्हा तो भविष्याची पर्वा न करता राहायला शिकतो. जेव्हा मृत्यू हेच अंतिम सत्य हे माणसाला कळते, तेव्हा तो त्याचे आयुष्य मृत्यू ही वस्तुस्थिती सोबत घेऊन सुखाने जगू शकतो.

टॉड मे यांना या पेचाचे उत्तर मार्कस ऑरेलियसच्या तितिक्षावादात (स्टॉइसिझम) व ताओच्या तत्त्वज्ञानात (ताओइझम) सापडले. भारतीय वाचकांना ते चार्वाकाच्या अनुभववादासारखे वाटेल. चार्वाकवाद हादेखील पुनर्जन्मावर विश्वास ठेवत नाही, मृत्यू म्हणजेच मोक्ष मानतो; अनुभवाला महत्त्व देतो आणि बुद्धिप्रामाण्यवादाचा पुरस्कार करतो. कदाचित अन्य काहींना तो अर्थ दुसऱ्या एखाद्या तत्त्वज्ञानात सापडू शकेल. पण टॉड मे यांच्या मते, हा अर्थ कळणेच खूप महत्त्वाचे आहे. शेवटी ते म्हणतात, जो मृत्यू ही वस्तुस्थिती मानून तो अटळ आहे हे समजू शकतो, तो खरा अस्तित्ववादी; आयुष्य खऱ्या अर्थाने जगू शकतो.

कदाचित हा नश्वरवाद, अस्तित्ववाद आणि नैतिकता पूर्णपणे कळाल्यानंतर आपणही ‘आनंद’ सिनेमातील राजेश खन्नाप्रमाणे म्हणू शकू- ‘बाबू मोशाय, जिंदगी लंबी नही, बडी होनी चाहिये!’

advaitshukla411@gmail.com