होय, नवलकथाच ही..  कधीतरी लहानपणी आवडलेले एखादे पुस्तक पुढे मोठ्ठे होते- किती मोठे? अख्ख्या ग्रंथसंग्रहाएवढे! मग या संग्रहात आणखी ‘प्रकरणां’ची भर वाचकच घालत राहातो.. या कथेत कुणाची, कुणाशी नाती जुळतील याला जसा धरबंध नाही, तसेच काळ कधी कोणता असावा यालाही बंधने नाहीत. पुस्तकांचे इलाखे उद्ध्वस्त होतात, पुन्हा वसू लागतात.. पुस्तकप्रेम खासगी न राहाता त्याच्या चळवळी होतात..  त्या चळवळींच्या गावातच भेटते अरबी कथांची सम्राज्ञी शहरझाद .. पुस्तकांतून तिचाच वास.. वेळोवेळी तिचाच ध्यास.. दर रात्री एक गोष्ट सांगून जिवंतपणा कायम ठेवणारी ‘ती’- अखेर प्रेमात पाडणारी ..तपशील बदलतील, पण ही नवलकथाच..

जुन्या पुस्तकांच्या दुकानात स्वतला तोलत छतापर्यंत गेलेले पुस्तकांचे मनोरे.. फुटपाथवर पसरलेल्या पुस्तकांच्या चळती शहरातल्या वातानुकूल दुकानांत शेल्फवर डौलाने विसावलेल्या पुस्तकांच्या ओळी व नेटवर डॉट कॉम कंपन्यांच्या साइट पाहताना एखाद्या फॅशन शोमधल्या तरुणीच्या सराईतपणाने येणारी व थोडेसेच अंतरंग हलकेच दाखवणारी पुस्तके हे सारे पाहिले की ‘आपण नवीन काय लिहिणार?’ असा वैराग्यपूर्ण विचार मनाता येतो. तिसऱ्या दर्जाचे काही लिहिण्यापेक्षा प्रथम दर्जाचे वाचावे, हा उमलत्या वयात मिळालेला सल्ला मी आजपर्यंत प्रमाण मानला आहे .  ‘खरे तर आपाल्याला काही लिहावयाचे असते, पण साधारण तसे आधीच कुणीतरी लिहिलेले असते..’ हेसुद्धा, वॉल्टर बेंजामिन या तत्त्वज्ञ व ग्रंथ संग्राहकाने आधीच म्हटले आहे! ‘अन्पॅकिंग ऑफ माय लायब्ररी’ या त्याच्या गाजलेल्या निबंधात तो म्हणतो, ‘‘लेखक पुस्तक लिहितो कारण बाजारातले कोणतेही पुस्तक त्याला पसंत नसते. याचा अर्थ संपूर्ण नवीन असे काही त्याला लिहायचे असते असे नाही; पण एकंदरच उपलब्ध  असलेल्या पुस्तकांच्या मुखपृष्ठापासून ते वाक्यरचनेपर्यंत त्या पुस्तकांचे (त्याच्याशी) काहीतरी बिनसलेले असते. ..  संपूर्णपणे नवीन अशी गोष्ट केवळ मूर्खच करू शकतो. वाचताना आपणच पुस्तकातल्या वाक्यांच्या मदतीने आपल्या भावनांची, विचारांची व संदर्भासहित फेररचना करता ते वाचले की एक नवीनच पुस्तक वाचकाच्या मनात जन्म घेते, जे त्याचे स्वतचे असते.’’

कोणी का लिहिलेले असेना, एखादे पुस्तक हे अखेर काय असते? इतर अनेक संदर्भ त्यामागे लपलेले असतात. ते माहीत नसतील तर ते पुस्तक वाचकाला भिडणार नाही. ‘टु किल अ मॉकिंगबर्ड’सारख्या कादंबरीचा पुरेपूर आस्वाद घ्यायचा असेल तर अमेरिकेच्या दक्षिण भागातल्या लहान गावापर्यंत झिरपलेल्या वर्णद्वेषी वातावरणाशी आपला परिचय हवा. परदेशातल्या जेम्स किंवा हॅरीला गोनीदांची ‘भ्रमणगाथा’ इंग्रजीत आली तरी भिडणे अवघडच आहे. किंवा मग, ही पुस्तकेच आपल्याला तो परिचय करून देणार आहेत आणि कधीतरी भिडणार आहेत, यावर विश्वास हवा. तो विश्वास सार्थ करण्यासाठी पुन्हा पुस्तकेच वाचायला हवीत. ‘रिपोर्ट टु ग्रेको’ हे ग्रीक कादंबरीकार निकोस कझान्झाकीस याचे शेवटचे पुस्तक. केवळ एका मताने त्याचे ‘नोबेल’ हुकले. कझान्झाकीस लिहितो, ‘‘माझी सारी पंचेंद्रिये व बुद्धिमत्तेचे शस्त्र हाताशी धरून मी एक रिपोर्ट वा अहवाल बनवला आहे व तो मला ग्रेकोला सादर करायचा आहे.’’  एल् ग्रेको हा चारशे वर्षांपूर्वीचा चित्रकार. कझान्झाकीस हाही एल् ग्रेकोप्रमाणे मूळचा क्रीट या भूमध्यसागरी बेटावरचा. त्यामुळे हा ग्रेकोच आपल्याला चांगले समजून घेईल, असे आयुष्यभर भ्रमंती केलेल्या कझान्झाकीसला अखेर वाटले.

जगातले सर्व साहित्य हे एक प्रकारचे ‘अहवाल’ आहेत. अगदी बालकवींची कवितादेखील अनुभवाच्या अज्ञात प्रदेशाचा अहवाल आहे. वाचणारा ते सारे अहवाल एकमेकांशी ताडून पाहत काहीतरी अर्थपूर्ण शोधत असतो आणि या शोधामध्ये लौकिकापलीकडची नाती तयार होतात. लौकिकापलीकडची म्हणजे कशी?

२१ डिसेंबर १९०९ रोजी १८ वर्षांच्या अनंता कान्हेरेने कलेक्टर जॅक्सनला गोळी घातली. कलेक्टर जॅक्सन लोकप्रिय होता. जनतेशी तो मराठीतून संवाद साधे. संस्कृत भाषेचा तो जाणकार होता. तो स्वतच ‘गेल्या जन्मी मी पंडित होतो’ असे म्हणे. त्याच्या या कौशल्याचा व ज्ञानाचा उपयोग त्याने क्रांतिकारकांची माहिती काढण्यासाठी केला असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. विशेषत बाबाराव सावरकरांना कैद करण्यासाठी व त्यांना दिलेल्या अपमानस्पाद वागणुकीसाठी त्याला जबाबदार धरले गेले. पण जॅक्सन मारला गेल्याची हळहळ नाशिकच्या जनतेला वाटली. या जॅक्सनचा खासगी ग्रंथसंग्रह एशियाटिक सोसायटीच्या वाचनालयात आहे. दुर्गाबाई भागवतांच्या वाचनात तो संग्रह होता. त्यासंबंधी आस्थेचे उद्गार दुर्गाबाईंनी काढलेले आहेत. त्या लिहितात, ‘‘तो ग्रंथसंग्रह वाचून माझे व कलेक्टर जॅक्सन यांचे काही अतूट नाते निर्माण झाले आहे.’’ (.. दुर्गाबाई आता नाहीत म्हणून; नाहीतर कालपरवाच फुलपँटीत आलेल्या एखाद्या पोराने देशद्रोह म्हणून आरडाओरड करायला सुरुवात केली असती!)

ग्रंथसंग्रह म्हणजे एकच अखंड पुस्तक असते.. अनेक भागांत विभागलेले. एक पुस्तक म्हणजे फक्त एक प्रकरण. ग्रंथसंग्रह करणारा माणूस एक एक ग्रंथ गोळा करता करता, कधीच न संपाणारे पुस्तक लिहीत असतो व त्यांची एकमेकांशी सांगड घालता घालता, मानवी जीवनाच्या संभाव्य अर्थाचा प्रदेश निर्माण करत असतो. आसावरी काकडे यांनी ‘निर्मितीच्या पातळीवरचे वाचन’ या आपल्या वाचनविषयक निबंधात वाचनाच्या वेगवेगळ्या पैलूंवर प्रकाश टाकताना लिहिले, ‘‘आपल्याला एकरेषीय विचार करायची सवय असते. आपल्या विचाराचा केंद्रिबदू सतत बदलून नव्याने विचार करता यायला हवा. परिघावरचा कोणताही िबदू केंद्रस्थानी येऊ शकतो, हे समजून घेतले तर केंद्र व परीघ ही साचेबद्ध फारकत राहणार नाही’’

हे निर्मितीच्या पातळीवरचे वाचकच पुढे पुस्तकांना तारतात. अमेरिकेचे इराक युद्ध भरात होते.  ५ मार्च २००७ रोजी बगदाद शहरामधल्या अल्-मुतानबी स्ट्रीट येथे शहाबंदर कॉफी हाउसच्या बाहेर कारबॉम्बचा स्फोट झाला. ३० जण मरण पावले. शंभरपेक्षा जास्त माणसे जखमी झाली. अल्-मुतानबी स्ट्रीट हा रस्ता पुस्तकांच्या दुकानांसाठी गेली चारशे वर्षे प्रसिद्ध आहे.. ‘इजिप्शियन लिहितो, लेबानीज प्रकाशित करतो व इराकी वाचतो’ असे म्हटले जाते, ते उगाच नव्हे!  लेखक-वाचक अशा ग्रंथप्रेमींचे शंभर वष्रे जुने शहाबंदर कॉफी हाउस या स्फोटाने पूर्ण उद्ध्वस्त झाले. ब्यू बोसोली या सॅनफ्रान्सिस्कोमधल्या अमेरिकेच्या इराकी आक्रमणाला विरोध असणाऱ्या जुन्या कवी-पुस्तक दुकानदाराला याचा अतिशय राग आला व त्यातून ‘अल् मुतानबी स्ट्रीट स्टार्ट्स हिअर’ अशी साहित्यिक चळवळ उभी राहिली. ती आजही चालू आहे. नंतर बगदाद महानगरपालिकेची वक्रदृष्टी या रस्त्याकडे वळली. बुलडोझर आले..  काही पाडापाडी झाली.. त्यातून, ‘मी इराकी- मी वाचतो’ असे आंदोलन उभे राहिले. ‘अल् मुतानबी स्ट्रीट स्टार्टस् हिअर’ या चळवळीत हिरिरीने भाग घेणाऱ्या डिफॉरेस्ट या छापखान्याच्या मालकाने म्हटले, ‘लिहिलेल्या शब्दाची ताकद कधी नाहीशी होणार नाही’ कुणाला वाटेल, त्याचा छापखान्याचा व्यवसाय असल्याने तो तसे म्हणत असेल. असेल; पण ते खोटे नाही.  कवितेच्या ओळी गात फासावर गेलेल्या क्रांतिकाराकांची, सैनिकांची उदाहरणे देशोदेशी आहेत; पण स्वतच्याच शब्दांना बळी पडल्याचे बोलके उदाहरण ज्याचे नाव बगदादमधल्या त्या रस्त्याला दिले आहे त्या तय्यब अल् मुतानबी याचेच आहे. हा कवी इसवीसन ९१५ मध्ये जन्मला आणि अवघी ५० वर्षे जगला. त्याचे एका सरदाराशी वैर आले. त्या सरदाराबरोबर द्वंद्वाचा प्रसंग आला असता अल् मुतानबी पळून जाता होता. पण त्याच्या नोकराने, आपल्या मालकानेच लिहिलेल्या शौर्यकवितोच्या ओळी त्याला ऐकवल्या. स्वतच लिहिलेल्या शब्दांची बेडी अल्-मुतानबीच्या पायात पडली. तय्यब अल्-मुतानबी परत फिरला व द्वंद्वात मारला गेला. उद्ध्वस्त झालेला अल् मुतानबी रस्ता सावरायला काही काळ गेला. पुढे इराकी पंतप्रधानांनीच त्याचे उद्घाटन केले. आज परत तेथे गजबज आहे. शहाबंदर कॉफी हाउस पुन्हा फुलले आहे.

आता रात्र होत आली आहे.. अल्-मुतानबी स्ट्रीट सुना आहे. त्यावरच्या साऱ्या पुस्तकांनी शहरजादेचे रूप घेतले आहे. ती कालच्यासारखीच अत्यंत मोकळी असणार आहे.. तैग्रिस नदीकाठच्या तिच्या पुतळ्यासारखी. अंगावर ती कसलाही बुरखा वागवत नाही. तिची पाíशयन कांती रात्री दिव्याच्या प्रकाशात सोनेरी भासते आणि काही वेळातच ती कालची अपुरी कहाणी पुढे सांगायला सुरुवात करणार आहे. तिने किती कहाण्या सांगितल्या ते मोजणे मी आता सोडून दिले आहे. ती ज्या कहाण्या सांगते त्यांवर तिचा अचल विश्वास आहे. त्या कहाण्यांनीच माझी उत्सुकता तेवत ठेवली आहे व तिला जगवले आहे. ज्या क्षणी माझे कुतूहल संपेल त्या क्षणी माझ्यासाठी शहरझादचे मरण अटळ आहे. पण ती वेळ येणार नाही; कारण कथेच्या एखाद्या वाक्यातूनच नव्हे तर एखाद्या शब्दातूनही पुढची कथा निर्माण करण्याचे तिचे कौशल्य अतुलनीय आहे. तिच्या कथा खोटय़ा आहेत की खरेच होऊन गेल्या, याच्याशीही मला आता काही कर्तव्य नाही. कारण ‘खरे’ म्हणजे काय, ते मला माहीत नाही. तिच्या कथांनी माझ्या हृदयात खळबळ माजवली. अज्ञात प्रदेशांची व माणसांची ओढ लावली आणि आता माझे तिच्यावर प्रेम आहे.

रवींद्र कुलकर्णी
 kravindrar@gmail.com