जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

गणेशोत्सवाच्या शेवटच्या दोन दिवसांत १२ वाजेपर्यंत वाद्य वाजविण्याची परवानगी देण्याचे आदेश तातडीने द्यावेत, अन्यथा गणेश विसर्जन मिरवणूक काढणार नाही, असा इशारा गणेश महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. खासदार चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वाखाली भेटलेल्या शिष्टमंडळाने १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक व वाद्य वाजविण्याची परवानगी द्यावी व यावर घातलेल्या र्निबधास जे अधिकारी जबाबदार आहेत, त्यांच्यावर कारवाई करावी, असे निवेदन बुधवारी दिले.

शहरातील ११०० ते १२०० गणेश मंडळे गणेश महासंघाशी संलग्नित आहेत. ग्रामीण भागात दीड हजारांहून अधिक मंडळांनी गणेश विसर्जनाची तयारी केली आहे. मोठय़ा मेहनतीने सामाजिक संदेश व प्रबोधनाचे देखावे करत आरास केला जातो. रात्री १० वाजेपर्यंतची मर्यादा योग्य नाही. १२ वाजेपर्यंतची परवानगी देण्यात यावी. गणेशभक्तांची नाराजी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचवावी, असे निवेदन देण्यात आले. दरम्यान, गणेश विसर्जनाच्या तयारीसाठी पोलिसांनी जय्यत तयारी केली असून शहरात संचलनही केले.