scorecardresearch

‘जनां’ना धन : तांत्रिक दोष की सायबर गुन्हा; चौकशी सुरू

वरिष्ठ पातळीवरून तांत्रिक दोष झाला, की कोणी जाणीवपूर्वक हा प्रकार केला आहे

महाराष्ट्र ग्रामीण बँक व भारतीय स्टेट बँकेच्या ग्राहकसेवा केंद्रातून आधारकार्ड व अंगठा लावून खात्यावर पसे नसताना अनेक ग्राहकांनी पसे उचलण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर दोन्ही बँकांनी ग्राहकसेवा केंद्रातून आधारकार्डवरचे व्यवहार बंद केले आहेत. वरिष्ठ पातळीवरून तांत्रिक दोष झाला, की कोणी जाणीवपूर्वक हा प्रकार केला आहे, याबाबत चौकशी सुरू झाली आहे. ग्रामीण बँकेचे दोन लाखांपेक्षा जास्त ग्राहक असल्याने नेमके पसे किती आणि कोणी उचलले याचा अंदाज घेतला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

बीड जिल्ह्यातील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या ग्राहकसेवा केंद्र (बीसी) आणि स्टेट बँकेच्या ग्राहकसेवा केंद्र (मिनी बँक) मधून ग्राहकांना आधारकार्ड व अंगठा लावून तत्काळ पसे देण्याची सेवा चालवली जाते. ग्रामीण बँकेची वीस केंद्र कार्यरत आहेत. या केंद्रांत एका ग्राहकाला एका वेळी दहा हजार आणि दिवसभरात वीस हजार रुपये रक्कम काढता येते. मात्र, मंगळवार आणि बुधवार या दोन दिवसांत ग्रामीण बँकेच्या ग्राहकांनी  स्टेट बँकेच्या सेवा केंद्रातून पसे उचलले. जनधन योजनेंतर्गत खात्यावर पसे जमा झाल्याची अफवा पसरल्याने गेवराई तालुक्यात ग्राहकांनी मोठय़ा प्रमाणात गर्दी करून पसे उचलण्यास सुरुवात केल्याने बँक प्रशासनाला संशय आला व त्यांनी याबाबत प्रशासनाला कळवले. ग्रामीण बँकेचे ग्राहकसेवा केंद्र वकरंगी कंपनीमार्फत चालवले जाते. या सर्व ग्राहकसेवा केंद्राच्या व्यवहाराचे ऑनलाइन नियंत्रण हे मुंबईतून केले जाते. व्यवहार झाल्यानंतर प्रत्येक ग्राहकाला त्याच्या भ्रमणध्वनीवर संदेश जातो. मात्र, खात्यावर पसे नसताना अनेक ग्राहकांनी पसे काढल्यानंतर भ्रमणध्वनीवरून व्यवहाराचे संदेशही आले नाहीत आणि बँकेतून कमी झालेला पसा कोणाच्या खात्यामधून गेला याचेही संदेश ग्राहकांना आले नाहीत. यामुळे हा व्यवहार पूर्णपणे संशयाच्या भोवऱ्यात अडकला आहे. तांत्रिक दोषामुळे हा प्रकार झाल्याचा अंदाज व्यक्त करत ग्रामीण बँक व स्टेट बँकेने जिल्ह्यतील ग्राहकसेवा केंद्रातून आधारकार्डवर पसे देण्याची सुविधा बंद केली आहे. तर या प्रकाराची माहिती वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात आली असून यात तांत्रिक दोष आहे की कोणी जाणीवपूर्वक हा प्रकार घडवून आणला आहे. याचीही चौकशी केली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

 

मराठीतील सर्व छत्रपती संभाजीनगर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-09-2016 at 01:07 IST

संबंधित बातम्या