छत्रपती संभाजीनगर: मुलीने प्रेमविवाह केलेल्या तरुणाच्या मामाला व त्यांच्या मुलाला दुचाकीवरून जाताना पाठीमागून जीपची धडक देत उडवले. त्यानंतर जीप माघारी फिरवून जखमी मुलास चिरडून ठार केल्याची घटना शेंदुरवादा ते सावखेडा मार्गावर गुरुवारी घडली. प्रथम दर्शनी अपघात भासवण्याचा प्रयत्न केल्यानंतर जखमी मामाने दिलेल्या फिर्यादीनंतर वाळूज पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा रात्री ८.३० च्या सुमारास नोंद झाला आहे. ऑनर किलिंग सारख्या प्रकाराने वाळूज, गंगापूर तालुक्यात खळबळ उडाली.

या घटनेत पवन मोरे (वय २६) याचा मृत्यू झाला. शिवराम मोरे हे जखमी झाले. गंगापूर तालुक्यातील वझर येथील रहिवासी असलेले शिवराम मोरे यांच्या फिर्यादीनुसार ते स्वतः व मुलगा पवन हे दोघे शेंदुरवादाहून दुचाकीवर बसून गावाकडे गुरूवारी दुपारी जात होते.काही अंतरावर जात असतांनाच पाठीमागून भरधाव आलेल्या (एम.एच.२० ई वाय ०६४५)  जीप चालकाने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. त्यात दुचाकीवरील शिवराम मोरे हे जोरात बाजुला फेकल्या गेले. मात्र त्यांचा मुलगा पवन हा गंभीर जखमी झाल्याने जागेवरच कोसळला. धडक देणाऱ्या चालकाने वळण घेऊन जीप आणत पवनला अक्षरशः चिरडून टाकले. त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. धडक देणारे आणि दुचाकीवरील बाप-लेक हे परस्परांचे नातेवाईक आहेत. मृत पवनचे येत्या ४ एप्रिल रोजी नियोजित लग्न ठरलेले होते. शेतकरी तथा ऊसतोड मुकादम असलेले शिवराम मोरे यांचा चितेगाव येथील भाचा विशाल नवले याने धूपखेडा (ता. पैठण) येथील सचिन वाघचौरे यांच्या मुलीशी प्रेमविवाह केला होता. त्या रागातून सचिन याने इतरांच्या संगणमताने दुचाकीला धडक देऊन मुलाला चिरडून मारल्याचे शिवराम मोरे यांनी जबाबात सांगितले.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The maternal uncle of a young man whom a girl had married and his son was hit by a jeep while riding a bike amy
First published on: 29-03-2024 at 01:35 IST