Premium

तुळजाभवानीचा सोन्याचा प्राचीन मुकूट गायब! अनेक दुर्मिळ दागिन्यांच्या वजनात कमालीची तफावत; दोषी व्यक्ती ठरविण्यासाठी स्वतंत्र समिती

ळजाभवानी देवीच्या खजिन्यात असलेल्या शेकडो वर्षे जुन्या दुर्मिळ दागिन्यांच्या वजनात कमालीची तफावत आढळून आली आहे.

tulja bhavani ancient gold crown
(संग्रहित छायाचित्र)

छत्रपती संभाजीनगर : तुळजाभवानी देवीचा एक किलो वजनाचा प्राचीन सोन्याचा मुकूट गायब असल्याचे दागिने तपासणी समितीस दिसून आले असून, तसा अहवाल त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे. केवळ मुकूटच नाही, तर तुळजाभवानी देवीच्या खजिन्यात असलेल्या शेकडो वर्षे जुन्या दुर्मिळ दागिन्यांच्या वजनात कमालीची तफावत आढळून आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तुळजाभवानी देवीच्या नित्योपचारासाठीच वापरण्यात येणारे सोन्या-चांदीचे दागिने, हिरे, मोती, माणिक, पाचू असे अनेक अलंकार मंदिराच्या तिजोरीतून गायब असल्याचेही उघडकीस आले आहे. तुळजाभवानी मंदिरातील प्राचीन दागदागिन्यांची तपासणी करण्यासाठी १६ सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने दोन महिन्यांपूर्वी अहवाल सादर केला आहे. तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी तुळजाभवानी देवीच्या तिजोरीतील सोने-चांदी आणि प्राचीन अलंकाराची तपासणी करण्यासाठी १६ सदस्यांची समिती स्थापन केली होती. उमरगा येथील उपविभागीय अधिकारी गणेश पवार यांच्या अध्यक्षतेखालील या समितीने मंदिर प्रशासनातील अधिकारी, पुजारी मंडळाचे प्रतिनिधी आणि महंतांचा सहभाग होता. या समितीने सादर केलेल्या अहवालातून तुळजाभवानी मंदिरातून वेगवेगळय़ा सात डब्यांमधील शेकडो वर्षांचा इतिहास असलेले अनेक दुर्मिळ आणि मौल्यवान दागदागिने गायब असल्याचे समोर आले आहे. 

हेही वाचा >>> बिगरआदिवासींना संरक्षण; खरे आदिवासी वाऱ्यावर! विशेष भरती मोहीम कागदावरच

तुळजाभवानी देवीचे मौल्यवान दुर्मिळ दागिने एकूण सात डब्यांत ठेवण्यात आलेले आहेत. या दागिन्यांचे वय ३०० वर्षांपासून ते ९०० वर्षांपर्यंत जुने आहे. डबा क्र. १ हा विशेषप्रसंगी वापरला जातो. शारदीय व शाकंभरी नवरात्रौत्सव, संक्रांत, रथसप्तमी,  गुढीपाडवा, अक्षय तृतीया, शिवजयंती अशा महत्त्वाच्या दिवशी या डब्यातील दागदागिन्यांचा साज तुळजाभवानी देवीला केला जातो. या डब्यात एकूण २७ प्राचीन अलंकार आहेत. त्यांपैकी चार अलंकार गायब असल्याचे समितीच्या अहवालात म्हटले आहे. शिवाय अनेक अलंकाराच्या वजनात कमालीची तफावत नोंदविण्यात आली आहे.

डबा क्र. ६ मधील अलंकार नित्योपचारासाठी वापरले जातात. १९७६ पर्यंत डबा क्र ३ मधील अलंकार नित्योपचार पूजेसाठी वापरले जात होते. मात्र दागिन्यांची सतत दुरुस्ती करावी लागत असल्याने डबा क्र. ३ बंद करून डबा क्र. ६ हा १९७६ पासून नित्योपचारासाठी वापरला जात आहे. त्यातील साखळीसह १२ पदरांच्या ११ पुतळय़ा असलेले मंगळसूत्र व चांदीचा खडाव हे अलंकार गहाळ झाले आहेत.

सन १९७६ पर्यंत नित्योपचारासाठी वापरण्यात आलेल्या डबा क्र. ३ मध्ये ८२६ ग्रॅम वजनाचा सोन्याचा मूळ मुकुट गहाळ असल्याचा संशय समितीने व्यक्त केला आहे. तुळजाभवानी देवीच्या जुन्या फोटोंमध्ये असलेला मुकुट आणि डबा क्र. ३ मध्ये सध्या आढळून आलेला मुकुट यात फरक आहे. त्यामुळे तुळजाभवानी देवीचा सोन्याचा प्राचीन मुकुट बदलून त्या ठिकाणी दुसरा मुकुट ठेवला असल्याची नोंद समितीने त्यांच्या अहवालात केली आहे. त्याचबरोबर या डब्यातील एकूण १६ अलंकारांपैकी मंगळसूत्र, नेत्रजडावी, माणिकमोती हे तीन दुर्मिळ आणि मौल्यवान अलंकार गहाळ झाले आहेत. 

एक किलो २६८ ग्रॅम वजनाची २८९ सोन्यांच्या पुतळय़ाची तीन पदरी शिवकालीन माळ तत्काळ दुरुस्त करण्याची शिफारस समितीने केली आहे. डबा क्र. ५ मधील एकूण १० अलंकारांपैकी एक अलंकार गायब, तर अन्य अलंकाराच्या वजनात तफावत असल्याचे स्पष्टपणे नोंदविण्यात आले आहे. डबा क्र. ७ मधील एकूण ३२ दुर्मिळ अलंकारांपैकी तुळजाभवानी देवीचा चांदीचा पुरातन मुकुट गायब असल्याचे आढळून आले आहे. तर अन्य ३१ अलंकारांच्या वजनातही लक्षवेधी तफावत असल्याचे समितीने अहवालात नमूद केले आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री, विधी व न्याय विभाग, धर्मादाय आयुक्त यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला जात असल्याचे पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे यांनी  सांगितले.

दागिने तपासणी समितीने सादर केलेल्या अहवालामध्ये अनेक अनागोंदी असल्याचे समोर आल्यानंतर या प्रकरणात दोषी कोण हे ठरविण्यासाठी एक स्वतंत्र समिती काम करते आहे. त्या समितीचा अहवालही एक-दोन दिवसांत येईल. त्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया हाती घ्यायची का, यावर निर्णय घेतला जाईल.

– सचिन ओम्बासे, जिल्हाधिकारी, धाराशिव

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Tulja bhavani ancient gold crown goes missing zws

First published on: 06-12-2023 at 03:43 IST

आजचा ई-पेपर : छत्रपती संभाजीनगर

वाचा