26 May 2020

News Flash

किल्ला

‘‘त्या रंग्या दूधवाल्याला आपल्या जागेवरून त्याची सायकल काढायला सांगितली का?’’

‘‘आपली विटा-मातीची पोती आणली आहेत.’’ आशीष पोत्यांच्या दोऱ्या सोडत म्हणाला. त्याने हळूहळू विटा काढायला सुरुवात केली.

‘‘त्या रंग्या दूधवाल्याला आपल्या जागेवरून त्याची सायकल काढायला सांगितली का?’’ सुजयने एक एक पायरी सोडत, झटपट जिना उतरत विचारलं. त्याच्या एका हातामध्ये पाण्याची बादली होती आणि एका हातामध्ये खराटा.
‘‘होय! सांगितलंय! तू हळू उतर.’’ नीलेश जरा ओरडतच सुजयला म्हणाला. आशीष आणि अपूर्वा नीलेशच्या शेजारीच उभे होते. कालच सहामाहीचा शेवटचा पेपर संपला होता. दिवाळीची सुट्टी लागली होती. त्यामुळे सक्काळी-सक्काळी पटापट आपापलं आवरून चाळीबाहेरील पटांगणात सगळे जमले होते.
‘‘आपली विटा-मातीची पोती आणली आहेत.’’ आशीष पोत्यांच्या दोऱ्या सोडत म्हणाला. त्याने हळूहळू विटा काढायला सुरुवात केली.
‘‘सुरुवात करायच्या आधी एकदा जागा धुऊन घेऊ या. फक्त पाणी जपून वापरायचंय.’’ – अपूर्वाच्या सूचना.
‘‘आशीष, या वर्षी कुठला किल्ला? गेल्या वर्षी जंजिरा एकदम झक्कास जमला होता.’’ नीलेशने थोडं पाणी घालून जागा खराटय़ाने साफ करत विचारलं. दरवर्षी या चौघांचा दिवाळीतला हा आवडीचा छंद होता- किल्ला बनवणे! आशीष या किल्ला-टीमचा मास्टर माइंड होता. त्यांचा किल्ला इतका छान बनायचा की त्यांची अख्खी चाळच नव्हे, तर आजूबाजूच्या चाळीतले लोकदेखील तो पहायला यायचे. त्यात यंदाचं वर्ष फारच स्पेशल होतं. त्यांच्या चाळीला १०० र्वष पूर्ण झाली होती. त्यामुळे यंदाची दिवाळीही चाळीमध्ये जोरात साजरी होणार होती.
‘‘यावर्षी एक सोडून दोन किल्ले बनवायचे. पन्हाळगड, मधे पावनखिंड आणि विशाळगड. काय म्हणता?’’
‘‘म्हणजे बाजीप्रभू देशपांडे? भन्नाट आयडिया आहे!’’- नीलेश.
‘‘बाजीप्रभू एकदम सॉल्लिड होते नं? त्यांनी शिवाजी महाराजांना वचन दिल होतं, की महाराज पन्हाळगडावरून विशाळगडावर सुखरूप पोहोचल्यावर, तोफांचा तीन वेळा आवाज ऐकू येईपर्यंत ते खिंड लढवत राहतील. आणि मी कुठेतरी वाचलंय, की त्यांचं शिर त्यांच्या धडापासून वेगळं झाल्यावरसुद्धा त्यांचं धड लढत राहिलं.’’ सुजय म्हणाला.
‘‘म्हणूनच महाराजांनी घोडखिंडीचं नाव बदलून पावनखिंड असं ठेवलं, बाजीप्रभूंच्या शौर्याची आठवण म्हणून. त्यांच्या रक्ताने पावन झालेली खिंड.’’ आशीषची माहिती.
‘‘म्हणजे दोन किल्लय़ांना जोडणारी खिंडही बनवायला हवी आपल्याला.’’ सुजयने सूचना दिली.
‘‘यावर्षी हाच देखावा ठेवू या. सिद्धी जौहरविरुद्ध लढताना बाजीप्रभू, मावळे, घोडे आणि विशाळगडावर पोहोचलेले शिवाजी महाराज.’’- आशीष.
‘‘पण आपलं दरवर्षीचं सामान पुरेल का दोन्ही किल्लय़ांना?’’ सुजयने शंका उपस्थित केली.
‘‘वाटलं तर आणू अजून. डोंट वरी.’’ अपूर्वा आश्वस्त करत म्हणाली.
‘‘चला. लागू या मग कामाला.’’ आशीष हातात विटा घेत म्हणाला. आशीषने पन्हाळगड बनवायला घेतला तर नीलेश विशाळगड बनवण्याच्या तयारीला लागला. दगड, विटा आणि माती एकावर एक रचून किल्लय़ाचा भक्कम पाया तयार होतो. अपूर्वा दोघांना लागेल तशी मदत करत होती. त्या दरम्यान सुजयने लाल माती कालवायला घेतली. ती छान मळून नंतर किल्लय़ांवर लेपायची होती. लाल माती लावल्यावर किल्ला अजूनच उठून दिसतो.
दुपारच्या जेवणापर्यंत किल्लय़ांचा मूळ आकार तयार झाला. सगळ्यांच्या घरनं जेवणासाठी आयांच्या हाका आल्यावर सगळे आपापल्या घरी पळाले आणि जेवणं उरकून पुन्हा पटांगणात जमा झाले.
‘‘अजून भरपूर काम राहिलंय.’’ सुजय जांभई देत म्हणाला.
‘‘बुरुज, तटबंदी बनवायची आहेत. किल्ला लढवायचाय आपल्याला.’’ आशीष सुजयच्या डोक्यावर टपली मारत म्हणाला. संध्याकाळपर्यंत किल्ला जवळ जवळ तयार झाला होता. माती लावल्यावर तर तो अजूनच आकर्षक दिसू लागला. दोन गडांना जोडणारी खिंड तयार झाली. तटबंदी, बुरुज तयार झाले.
‘‘आता हे पक्कं वाळू दे. देखाव्याचं उद्या बघू या.’’ आशीष म्हणाला.
इतक्यात तिथे वैभवदादा आला. चाळीत त्याचं लायटिंग, व्हिडीओ शूटिंग वगैरेचं दुकान होतं. तो जरा घाईतच होता, पण मुलांना किल्ला बनवताना पाहून थांबला.
‘‘काय रे पोरांनो? यावर्षी कुठला किल्ला?’’
‘‘पावनखिंड.’’ अपूर्वा उत्साहात म्हणाली.
‘‘भन्नाट. छान जमतंय.’’ वैभवदादा दोन्ही किल्लय़ांकडे पाहात म्हणाला. त्याला एकदम काहीतरी सुचलं.
‘‘तुम्ही दिव्यांची माळही लावणार आहात नं?’’
‘‘आम्ही पणत्या लावतो किल्लय़ाभोवती.’’ अपूर्वा म्हणाली.
‘‘त्या लावाच. पण लायटिंगही करा. अजून छान दिसतील किल्ले.’’
‘‘कसं?’’ सुजयने कुतूहलाने विचारलं. बाकीचेही ऐकायला लागले.
‘‘बारीक दिव्यांची माळ दोन्ही किल्लय़ांच्या भोवती लावू या आणि त्याच बरोबर फोकस लाईटही! संध्याकाळी एकदम मस्त दिसेल. मी करून देतो. काय म्हणता?’’
‘‘कल्पना उत्तम आहे. पण खर्च?’’ नीलेशने शंका व्यक्त केली.
‘‘पैसे मागितले का मी?’’
‘‘पण लायटिंगसाठी कनेक्शन कुठून आणणार?’’ – सुजय.
‘‘सानेकाकांच्या खिडकीतून घेऊ. ते त्यांची बॅटरीवरची बाईकही इथेच चार्ज करतात. मी बोलून घेतो. फिकर नॉट.’’ कुणी पुढे काही म्हणायच्या आतच वैभवदादा तिथून नाहीसा झाला होता. मुलं मात्र भलतीच खूश झाली..

दुसऱ्या दिवशी किल्ला बनवण्याच्या पुढच्या तयारीसाठी सगळे पुन्हा जमले. ‘‘छान वाळलीये माती. आणि कुठे भेगाही नाही पडल्या.’’ नीलेश किल्लय़ांना अलगद हात लावत म्हणाला.
‘‘दिसतंय पण मस्त.’’ – अपूर्वा
‘‘मावळ्यांची काय परिस्थिती?’’आशीष.
‘‘मला वाटतं, जास्त मावळे लागतील या देखाव्यासाठी.’’ – सुजय.
‘‘सिद्धी जौहर आणि त्याचे सैनिकपण लागतील नं?’’ – आशीष.
‘‘अरेच्चा! मावळ्यांचा डबा घरीच राहिला. आलोच.’’ सुजय डबा आणायला घरी पळाला.
‘‘मीही घरून थोडी मेथी, गहू आणि मोहरीचे दाणे घेऊन येते. पेरायचे आहेत नं? तीन-चार दिवसांत त्यांचं हिरवं शेत उगवलं की किल्ले अजून छान दिसतील,’’ असं म्हणत अपूर्वाही घरी पळाली.
‘‘खिंडीच्या बाजूनेही थोडे धान्य पेरू म्हणजे जंगलाचा फील येईल.’’ नीलेशने सुचवलं.
‘‘आणि हो! रोज न विसरता पाणी मारायचंय किल्लय़ांवर.’’ आशिषची सूचना.
थोडय़ा वेळातच सुजय मावळ्यांचा डबा आणि अपूर्वा कागदाच्या पुरचुंडय़ांमधून आईने दिलेलं धान्य घेऊन आली.
‘‘घोडय़ावर बसलेले शिवाजी महाराज आणि मावळे आहेत. मावळे पुरतील असं वाटतंय. बाजीप्रभूंचं काय करायचं?’’ आशिष डब्बा बघत म्हणाला.
‘‘कार्डबोर्ड कटआऊट चालेल?’’ अपूर्वाने विचारलं.
‘‘धावेल.’’ आशीष म्हणाला.
‘‘पण शिवाजी महाराज तर मेण्यात बसून गेले होते नं?’’ नीलेश कुरकुरला.
‘‘आपल्याकडे कुठंय मेणा? आपण घोडय़ावरचेच महाराज ठेवू.’’- इति आशीष.
संध्याकाळपर्यंत डाव्या हातात ढाल धरलेल्या आणि उजव्या हाताने तलवार उगारलेल्या बाजीप्रभूंचा कटआऊट तयार होता. खिंडीच्या मधोमध त्यांना उभं केलं. बाजूला थोडे मावळे उभे केले. घोडे ठेवले. घोडय़ावर बसलेले शिवाजी महाराज आणि अजून काही मावळे विशाळगडावर ठेवले. दोन्ही गडांवर तोफा ठेवल्या. सिद्धी जौहरचाही कटआऊट बनवून बाजीप्रभूंच्या समोर उभा केला. तसंच सिद्धी जौहरच्या काही सैनिकांचेही कटआऊट बनवून खिंडीत ठिकठिकाणी उभे केले. हिंदवी स्वराज्याचा झेंडा विशाळगडावर फडकवला.
एव्हाना वैभवदादाही त्याचं लायटिंगचं साहित्य घेऊन आला होता. सानेकाकांकडून कनेक्शन घेऊन त्याने किल्लय़ांभोवती दिव्यांच्या माळा लावल्या. फोकस लाइट लावले. एका लाइटने त्याने पन्हाळगडवर फोकस दिला, एकाने बाजीप्रभू, सिद्धी जौहरवर तर एकाने विशाळगडावर पोहोचलेल्या शिवाजी महाराजांवर. मुलांनी मिळून पणत्या लावल्या. किल्ले आता अगदी आकर्षक दिसू लागले होते.
‘‘तीन-चार दिवसांत हे शेत उगवलं की अजून सुरेख दिसतील आपले किल्ले.’’ अपूर्वा आनंदाने म्हणाली. सगळ्यांनी तिला दुजोरा दिला.

वसुबारसेच्या दिवशी सगळ्यांच्या घरासमोरच्या पॅसेजमध्ये आकाशकंदील आणि माळा लागल्या होत्या. त्यामुळे चाळ अगदी नटल्यासारखी दिसत होती. विशेष म्हणजे १०० वर्षे पूर्ण झाल्यामुळे, यंदा सगळ्यांचे आकाशकंदीलही एकसारखे होते. पटांगणाच्या मध्यभागी मोठ्ठाली संस्कार भारती रांगोळी काढण्यात आली होती.
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी चौघे ‘किल्लेदार’ किल्लय़ांची रोषणाई ‘ऑन’ करून किल्ला न्याहाळत, जवळच्या पायऱ्यांवर शांत बसले होते. किल्लय़ांवरच्या पणत्याही सुरेख तेवत होत्या.
‘‘उद्या धनत्रयोदशी. म्हणजे दिवाळी सुरू.’’ सुजय म्हणाला.
‘‘किल्ला मस्त दिसतोय नं? शेतही छान उगवलंय.’’ अपूर्वा कौतुकाने म्हणाली.
‘‘हो नं. आपण करतो दरवर्षी हौसेने किल्ला, पण दिवाळी संपल्यानंतर तो मोडताना फार वाईट वाटतं.’’ आशीष उदास होऊन म्हणाला.
‘‘किल्लय़ाचं काय घेऊन बसलायस? आता अख्खी चाळ पाडणार आहेत आपली, तेव्हा काय वाटेल?’’ नीलेशने जाणीव करून दिली.
‘‘होय रे! शाळेचं हे र्वष संपलं की जाणार आपण इथून.’’ – अपूर्वा.
‘‘आता दोन-तीन र्वष दुसरीकडे मुक्काम.’’ – आशीष.
‘‘मग दिवाळीला किल्ला कसा बनवायचा? आपल्या शाळाही वेगळ्या, त्यामुळे दररोज भेटणंही होणार नाही.’’
– नीलेश.
‘‘आपण दिवाळीत कुणाच्या तरी घरी भेटून किल्ला बनवत जाऊ या की!’’ आशीषने शक्यता वर्तवली.
‘‘आपल्याला साधं किल्ला पाडताना इतकं वाईट वाटतंय. मोठय़ांनी चाळ पाडायचं का ठरवलं असेल?’’ अपूर्वा रडवेल्या सुरात म्हणाली.
‘‘मोठय़ांची गणितं त्यांनाच ठाऊक.’’
– इति सुजय.
‘‘आपण पुन्हा इथे येऊ तेव्हा आपली ही जागा तरी असेल का? तेव्हाही याच उत्साहाने बनवू का आपण किल्ला?’’ नीलेशने अगदी वर्मावर बोट ठेवलं.
‘‘तोपर्यंत तर आपण दहावीत गेलेलो असू. अभ्यासाच्या गडबडीत वेळ तरी देता येईल का आपल्याला?’’ आशीषच्या या बोलण्यावर थोडा वेळ सगळेच शांत झाले.
‘‘पुढचं पुढे रे! आत्ता का विचार करतोय आपण त्याचा?’’ सुजय हात उडवत म्हणाला.
‘‘बरोबर आहे! आत्ता तर एकत्र आहोत नं आपण सगळे? मग ही दिवाळी तरी छान एन्जॉय करू या की! हॅप्पी दिवाळी.’’ अपूर्वा जोरात म्हणाली.
‘‘येस२२२२. हॅप्पी दिवाळी.’’ बाकीचे कोरसमध्ये म्हणाले..

– प्राची मोकाशी
mokashiprachi@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 8, 2015 1:20 am

Web Title: child story on fort
Next Stories
1 डोकॅलिटी
2 आर्ट गॅलरी
3 रांगोळी ठसा
Just Now!
X