‘‘आर्यन काय हे.. अजून नाश्ता आणि दुधाला हातही लावला नाहीस? थंड झालं ना सगळं.’’ आर्यनची आई त्याच्या शेजारी येऊन बसली तरी त्याचे लक्षच नव्हते. तो खिडकीतून काहीतरी बघत म्हणाला, ‘‘आई.. बघ  सगळेजण शाळेत गेले गं.. आता थोडय़ा वेळाने आमची मॅच सुरू होईल. तशी आमची टीम भारी आहे. पण माझ्याऐवजी जयला आता कॅप्टन केलंय. बघू आता तो कसं काय मॅनेज करतो. सगळे जण तिथे सॉलिड धम्माल करणार आणि मी मात्र या पायामुळे इथे असा पडून राहणार.’’ प्लॅस्टरमधल्या पायाकडे बोट दाखवत आर्यन पुटपुटला तेव्हा कुठे आईला त्याच्या तंद्रीचा उलगडा झाला. गेल्या आठवडय़ात कबड्डीची प्रॅक्टिस संपवून सायकलवरून घरी येताना तो रस्त्यावरच्या खड्डय़ात धडपडला होता. त्यात त्याचा पाय फ्रॅक्चर झाला. डॉक्टरनी प्लॅस्टर घालून त्याला दीड महिना पूर्ण विश्रांती घ्यायला सांगितले होते. आजच्या मॅचमध्ये खेळता येणार नाही म्हणून सकाळपासून त्याचा मूड बिघडला होता.

‘‘शी!.. मला ना आता काहीच करावंसं वाटत नाही. मागच्या वर्षी मी मस्त खेळलो. म्हणून यावर्षी मला कॅप्टनशिप मिळाली, तर हे फ्रॅक्चर! मे महिन्यात मित्रांबरोबर ट्रेकला जाणार होतो तर नेमका ताप आला. माझ्याच बाबतीत हे असं का होतं गं आई? मला ना कधी कधी वाटतं की मी खूप अनलकी आहे.’’ आईच्या मांडीवर डोकं टेकत तो म्हणाला.

‘‘असं काही नसतं रे बाळा.’’ त्याच्या केसातून हात फिरवत आई समजावू लागली. आता तुझा पाय फॅ्रक्चर झालाय म्हणून फक्त दीड महिनाच तुला खेळता येणार नाहीये. हे कबूल, की तुला या मॅचमध्ये खेळता येणार नाही, पण मॅच काय पुढच्या वर्षीपण असेलच की. आणि एकदा का हे प्लॅस्टर काढले की तुला कबड्डी, क्रिकेट, व्हॉलीबॉल काय हवे ते खेळता येईल. तुला मरिअप्पन थंगवेलूची हकिकत माहितेय?’’

‘‘अं.. कुणीतरी प्लेयरच आहे ना?’’ आर्यन म्हणाला.

‘‘बरोब्बर! यावर्षीच्या रिओ पॅरा- ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या उंच उडी स्पर्धेत टी-४२ विभागात भारताला सुवर्णपदक मिळवून देणारा तोच तो अपंग खेळाडू मरिअप्पन थंगवेलू.’’ – इति आई.

‘‘हो.. आता आठवले, पण त्याची काय गोष्ट?’’ – आर्यन सावरून बसला.

‘‘अरे.. किती बिकट परिस्थितीत त्याचे बालपण गेलेय. तामिळनाडूतल्या छोटय़ाशा गावात चार भावंडांसोबत अत्यंत गरिबीत त्याचे बालपण गेले. वडिलांचे घराकडे लक्ष नव्हते. आई बिचारी कुठे मोलमजुरी करून आणि  भाजी वगैरे विकून आपल्या मुलाबाळांचे पोट भरत होती. त्यांना शिकवीत होती. एक दिवस दारू पिऊन बस चालवणाऱ्या ड्रायव्हरच्या चुकीमुळे मरिअप्पनला अपघात झाला. तेव्हापासून त्याचा उजवा पाय गुडघ्याखाली कायमचा निकामी झाला. लुळा पडला. तेव्हा त्याचे वय किती होते माहितेय? फक्त पाच वर्षांचा होता तेव्हा तो! घरच्या गरिबीमुळे चांगल्यातले चांगले उपचारही करता आले नाहीत. पण झाल्या प्रकाराने तो घरात रडत-कुढत बसला नाही. त्या अधू पायाने तो नियमित शाळेत जायचा. त्याने शिक्षणही छानपैकी पूर्ण केले. पण आजूबाजूच्या धडधाकट-  म्हणजे काहीही व्यंग नसलेल्या मुलांबरोबर तो हौसेने व्हॉलीबॉलही खेळायचा. त्याची चपळाई हेरून, त्याचे उडय़ा मारण्याचे कसब पाहून त्याच्या क्रीडाशिक्षकांनी त्याला अ‍ॅथलेटिक्स आणि त्यातही उंच उडी प्रकाराकडे वळवले. त्यासाठी त्याच्याकडून खूप सराव करून घेतला. मग काय विचारता.. शाळेपासून पार राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धात त्याने भाग घेतला. अनेक बक्षिसे मिळवली. आणि.. या सर्व यशाचा परमोच्च बिंदू म्हणजे यावर्षी त्याला रिओ येथे झालेल्या पॅरा-ऑलिम्पिक स्पर्धेत मिळालेले सुवर्णपदक. उंच उडी स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारा तो पहिला भारतीय ठरलाय. त्याच्या या जिद्दीमुळे त्याचे नाव चमकलेच, पण आपल्या भारताचे नावही त्याने रोशन केले. सुवर्णपदकाबरोबरच त्याच्यावर पंतप्रधानांपासून सर्व भारतीयांनी अभिनंदन व कौतुकाचा वर्षांव तर केलाच; शिवाय लाखो नाही तर करोडो रुपयांच्या बक्षिसांचाही त्याच्यावर वर्षांव झाला. मरिअप्पनचे आणखी कौतुक म्हणजे ज्या शाळेने त्याच्या खेळाला, त्याच्यातील गुणांना सतत प्रोत्साहन दिले त्या शाळेला त्याने आपल्या बक्षिसाच्या रकमेतून कृतज्ञ भावनेने देणगी दिली. म्हणजेच काय, तर तो यशाने पटकन हुरळून गेला नाहीच, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे आपल्यावरच्या संकटाने तो खचून गेला नाही. स्वत:ला अनलकी समजून तो घरात कुढतच बसला असता तर आज हे यश त्याला मिळाले असते का, सांग पाहू?’’

‘‘आणि अरे.. फक्त मरिअप्पनच नाही, तर आपल्या देवेंद्र झांझरिआ, वरुणसिंग भाटी आणि दीपा मलिक या शारीरिक व्यंग असलेल्या खेळाडूंनीही यावर्षीच्या पॅरा-ऑलिम्पिकमध्ये पदके कमावून जगभर भारताचे नाव झळकवले आहे. जन्मत: किंवा आजारामुळे किंवा अपघाताने शारीरिक अपंगत्व आलेली अनेक माणसे आपण आपल्या आजूबाजूला बघत असतो. पण आपल्या अपंगपणासाठी, अधूपणासाठी रडत न बसता उलट त्याकडे दुर्लक्ष करून त्याच्यावर मात करत हे सगळेजण धडधाकट माणसांसारखेच कला, खेळ किंवा अनेक सामाजिक, आर्थिक क्षेत्रात हिरीरीने सहभागी झालले दिसतात. यशस्वी झालेले दिसतात. तुला माहितेय का.. त्यांच्या या उत्साहाला, कर्तृत्वाला प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांच्या धडपडीची दखल घेण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने जाहीर केल्याप्रमाणे सर्व जगभर

३ डिसेंबर हा ‘जागतिक अपंग दिन’ म्हणून पाळला जातो.’’

‘‘खरंच आई, किती ग्रेट आहेत ना हे सगळेजण!’’ – आर्यन भारावून म्हणाला.

‘‘तेच तर म्हणतेय मी.’’  आता काय गोष्टीनेच पोट भरणार आहे का तुमचं कॅप्टन? चल, नाश्ता आणि दूध पुन्हा गरम करून आणते.’’  आर्यनचा बदललेला मूड पाहून आईही खूश झाली.

अलकनंदा पाध्ये – alaknanda263@yahoo.com