एकदा काय झालं, आमच्या शेजारच्या काकांनी कुत्र्याचं एक काळंकुळकुळीत पिल्लू घरी आणलं. घरातल्या इतरांनी त्याला पाहून डोक्याला हात लावला. ‘आम्हाला कामं कमी आहेत म्हणून याची भर घातली आहे का,’ असं घरातले सगळे म्हणू लागले. काकांनी मात्र सगळ्यांच्या बोलण्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं. काळंकुळकुळीत गोड पिल्लू घरभर नाचू लागलं. इकडेतिकडे शिशू करू लागलं. त्याच्यासाठी एक टोपली आणली आणि त्यात एक मऊ कापड घातलं. त्याला दोन बाजूंनी दोर बांधून एक झोपाळ्यासारखा पाळणा केला. त्याला पाळण्यात घालून त्याचं बारसं करता येईल अशी काकूंची इच्छा होती. पिल्लाचा पाळणा तयार झाला आणि काकूंनी पिल्लाला पाळण्यात ठेवलं. सगळे टाळ्या वाजवू लागले, पण पिल्लाने घाबरून पाळण्यातून उडी मारली आणि तो थेट पलंगाखाली जाऊन लपला. पुढे कामाच्या व्यापात पिल्लाचं बारसं करायला सगळे विसरले.

पिल्लू भराभर वाढत होतं. कोणी त्याला काळू म्हणायचं तर कोणी ब्लॅकी म्हणून हाक मारायचं. पिल्लू तसं स्वभावाने खूप आनंदी, त्यामुळे त्याचं रीतसर बारसं झालं नाही याचं त्याला फारसं वाईट वाटलं नाही. कुठल्याही नावाने हाक मारली तरी ते बागडत यायचंच. दिवसभर हुंदडायला त्याच्या घराबाहेर बाग होती. खायप्यायचीही चंगळ होती. येणारे-जाणारे त्याला प्रेमाने बिस्किटं द्यायचे. त्यामुळे त्याचं बारसं झालं नव्हतं याचं त्याला काही सोयरसुतक नव्हतं.

हेही वाचा…बालमैफल : जलसाक्षरता

मे महिना लागला. उन्हाळ्याची सुट्टी घालवायला आलेल्या पाहुण्यांबरोबर काळू ऊर्फ ब्लॅकीशी खेळायला लहान मुलंही आली. मुलंच ती, सुट्टीत क्रिकेट खेळणारच. काकांचं काळंकुळकुळीत पिल्लूही मुलांबरोबर क्रिकेट खेळायला लागलं. मुलांनी बॅटने बॉल उडवला की पिल्लूही त्यांच्याबरोबर फिल्डिंग करायचा. एकदा तर त्याने चक्क कॅच पकडला. मुलं खूश होऊन ओरडली, ‘‘अरे वा! काय कॅच पकडला आहे! याला इंडियाच्या क्रिकेट टीममध्ये घेतलं पाहिजे.’’ क्रिकेट टीममध्ये घ्यायचं म्हणून त्याचं त्या दिवसापासून नाव ‘टिमो’ पडलं.
मे महिना होता म्हणून आंब्याचं आइस्क्रीम वगैरे करून मुलांनी एकदाचं पिल्लाचं बारसं करून ‘टिमो’ नाव ठेवलं.
त्या दिवसापासून काळू ऊर्फ ब्लॅकीचा ‘टिमो’ झाला.

टिमो भराभर वाढत होता. तसं एकट्याने खूप बागडायचा. पण का कोण जाणे, टिमोला दगड माती विटा खूप आवडू लागल्या. सारखा एखादा दगड तोंडात धरून घराभोवती पळत राहायचा. त्याच्या तोंडात दगड दिसला की काका त्याला ‘‘ए दगड्या, टाक तो दगड. दात पडतील,’’ म्हणून रागवायचे. दगड तोंडात असला की टिमो एका वेगळ्याच धुंदीत असायचा. त्या वेळी त्याला कुठल्याही नावाने हाक मारली तरी ऐकू यायचं नाही. पण त्याचं दगड्या नाव मागे पडलं.

हेही वाचा…सुखाचे हॅशटॅग: गोष्ट छोटीशी, पण महत्त्वाची!

सारखं सारखं दगड-मातीत तोंड घालून टिमो लागला शिंकायला. इतका शिंकला इतका शिंकला की त्या दिवसापासून काका त्याला प्रेमाने शिंको म्हणायला लागले. शिंको नाव ऐकून आजोबा- काकांचे वडील म्हणाले, ‘अरे वा ऽऽ! याला रशियन जनरलचं ‘टिमोशिंको नाव दिलंत की तुम्ही! लगेच काका म्हणालेच, ‘‘बाबा, त्या जनरलचं नाव टिमोशेंको आहे.’’

आजोबा काही कमी नव्हते. तेही लगेच म्हणाले, ‘‘आपण रोमाला रोम, पारीला पॅरिस म्हणतो की नाही मराठीत, तसंच शेंकोला शिंको म्हणू. काका हे ऐकून गप्प झाले. काळू ऊर्फ ब्लॅकी ऊर्फ टिमो ऊर्फ टिमोशिंको आता वाढत वाढत मस्त चकचकीत काळ्या रंगाचा मोठा, सुंदर, जनरलसारखा दिसणारा कुत्रा झाला होता. पण भोळा-भाबडा खेळकर तसाच होता.

हेही वाचा…बालमैफल: क्रांतीचे प्रतीक

टिमोशिंको मोठा झाल्यामुळे त्याला दगड-धोंडे आवडेनासे झाले. तो तोंडात वीट घेऊन पळू लागला. सतत तोंडात वीट धरून त्याचे दोन दात खरंच पडले. पण टिमोशिंकोला तोंडात वीट धरायचं व्यसनच जडलं.

वर्ष लोटलं. पुन्हा मे महिना आला. काकांकडे तेच पाहुणे आले. त्यांच्याबरोबर त्यांची मुलंही आली. टिमोशिंको मुलांना बघून खूश झाला आणि वीट तोंडात घेऊन आनंद व्यक्त करायला पळत सुटला.

हेही वाचा…बालमैफल: नवचैतन्याचा पाडवा

मुलं त्याला पाहून ‘ए ‘विटोबा’’ म्हणून ओरडू लागली. त्या दिवशी आइस्क्रीम, भेळ वगैरे करून मुलांनी टिमोशिंकोचं पुन्हा एकदा बारसं करून ‘विटोबा’ नाव ठेवलं. त्या दिवसापासून काळू ऊर्फ ब्लॅकी ऊर्फ टिमो ऊर्फ टिमोशिंको ऊर्फ विटोबा असं लांबलचक नाव झालं.

हेही वाचा…बालमैफल: तोडणं सोपं, जोडणं अवघड

काका ते ऐकून म्हणाले, ‘‘एवढं लांबलचक नाव नको बुआ. आपण याला टिमोच म्हणू. त्यातून तो सर्वांचाच लाडका असल्यामुळे ज्याला जे नाव आवडेल त्या नावाने तो हाक मारेल. हे ऐकून वाकडी मान करत टिमो म्हणाला, ‘‘नावात काय आहे?’’

vidyadengle@gmail.com