-मनीष दिगंबर मेस्त्री

आमच्या शाळेची बाग करायची होती. शाळेच्या परिसरात काही नारळाची, केळीची, गुलमोहराची झाडं आहेतच. पण बाईंनी आम्हाला काही नवीन औषधी वनस्पती आणि फुलझाडं नव्याने लावायची आहेत असं सांगितलं; आणि त्याबरोबर असंही सांगितलं की आपल्या शाळेची आपण परसबाग तयार करायची आहे. परसबागेतली भाजी आपण आपल्या रोजच्या पोषण आहारात शिजवून खाणार आहोत. त्यामुळे सगळ्यांनी शाळेची बाग जास्तीत जास्त चांगली कशी होईल यासाठी काळजी घ्यायची आहे. सुरुवातीला बाईंनी काही औषधी वनस्पतींचे उपयोग सांगितले आणि आपल्या बागेत कोणकोणत्या भाज्या लावायच्या आहेत याविषयी सांगितलं. आम्हाला बागेतला भाग गटानुसार वाटून दिला. बाईंनी सांगितलं की, ‘‘जर सगळ्या शाळेची एक बाग झाली तर कोणीच काळजी घेणार नाही. पण जर तुम्हाला तुमची स्वतंत्र जागा वाटून दिली तर प्रत्येक जण आपापल्या झाडांची व्यवस्थित काळजी घेईल.’’ शाळेचा मुख्यमंत्री मीच असल्यामुळे बाईंनी माझ्यावर महत्त्वाची जबाबदारी दिली. सर्व गटांचे काम व्यवस्थितरित्या होत आहे की नाही याच्यावर मी देखरेख करायची होती. बाईंनी मला विचारलं, ‘‘आवडेल ना रे तुला?’’ मी लगेच ‘हो’ म्हणालो. बाईंनी मला विचारलं, ‘‘तू या आधी ज्या शाळेत शिकत होतास तिथे होती का अशी बाग?’’ मी ‘होय’ म्हणालो. शाळेतून घरी येत असताना मला तो प्रसंग आठवला.

मी त्यावेळी पहिली किंवा दुसरीत होतो असेन. मी आमच्या नरडवे गावातील नरडवे कोके वाडी शाळेत शिकत होतो. या शाळेत आम्हाला चव्हाण सर शिकवायचे. चव्हाण सर शिस्तप्रिय शिक्षक होते. ते शिकवायचेही छान. माझ्याकडून ते स्पर्धा परीक्षांची तयारी करून घ्यायचे. गुरुजींनी एकदा एखादे काम नेमून दिले की ते वेळच्या वेळी पूर्ण झालेच पाहिजे. एखादा नियम तयार केला तर तो सगळ्यांनाच लागू असायचा. गुरुजी स्वत: देखील वेळेच्या बाबतीत आणि शिस्तीच्या बाबतीत तसेच वागायचे, त्यामुळे आम्हा मुलांना त्यांची थोडीशी भीती वाटायची. गुरुजींनी आम्हाला शाळेची बाग तयार करायला सांगितली होती. आमचा नरडावे गाव सह्याद्रीच्या पायथ्याशी आहे. गावाभोवती जंगलच आहे. गावातून गड नदी वाहते. गुरुजींनी आम्हाला प्रत्येकाला एक तरी झाड शाळेतल्या बागेत लावायचं असं सांगितलं. काही मित्रांनी आपल्या घराकडे रुजलेलं झाड आणलं तर काही जणांनी घराकडून बिया आणल्या आणि त्या शाळेत रुजत घातल्या. प्रत्येक जण आपापलं झाड कसं चांगलं होईल, लवकर कसं वाढेल आणि त्याला लवकर फळं-फुलं कशी येतील यासाठी रोपांची काळजी घेत होता. त्या शाळेत मुलं कमी होती. त्यामुळे प्रत्येकाला आपापलं झाड जपावं लागणार होतं.

हेही वाचा…बालमैफल : चेरीचॉकोचा साहसी प्रवास

एके दिवशी झाडांना पाणी घालताना घाई गडबडीत माझा पाय चुकून एका रोपावर पडला आणि ते रोप मोडलं. ते रोप माझ्या मित्रानं लावलं होतं आणि तो त्याची फार काळजी घेत होता. मी लगेच तेथून निसटलो. माझा मित्र आपल्या रोपाला पाणी घालण्यासाठी आला आणि त्यानं पाहिलं तर त्याचं रोप तुटलेलं होतं. तो मला विचारू लागला, ‘‘मनीष, माझं झाड कोणी तोडलं?’’ मी मनातून खूप घाबरलेलो. मी जर कबूल केलं असतं तर त्यानं माझं नाव सरांना सांगितलं असतं. मी निष्काळजीपणे वागलो म्हणून सर मला ओरडले असते. मी माझ्या मित्रासोबत खोटं बोललो. मी त्याला सांगितलं ‘मला माहीत नाही’ शाळा सुटल्यावर मी घरी आलो. मी मनातून घाबरलो होतो. खोटं बोललो होतो याचंही मला वाईट वाटलं होतं. मी फिरायला गेलो नाही की खेळायलाही गेलो नाही. आईनं मला विचारलं, ‘‘काय रे काय झालं? गप्प गप्प का आहेस?’’ मी शाळेत घडलेलं सगळं आईला सांगायचो. मी आईला सगळं खरं खरं ते सांगितलं. आई म्हणाली, ‘‘निष्काळजीपणे वागलास ही तुझी चूक आहे. ती तू कबूल कर आणि जे घडलं ते खरं खरं मित्राला आणि गुरुजींना सांग. आपली चूक लपवण्यासाठी खोटं बोलायचं नाही. तू जर आज खोटं बोललास तर तू कायमच खोटंच बोलत राहशील.’’

मी दुसऱ्या दिवशी शाळेत गेलो. सरांनी परिपाठाच्या वेळी सगळ्या मुलांना विचारलं. ‘‘शाळेच्या बागेतलं रोप कोणी तोडलं?’’ मी उभा राहिलो आणि सरांना सगळं खरं खरं सांगितलं. मी माझ्या चुकीची कबुली दिली आणि जमिनीकडे बघत शांत उभा राहिलो. मला वाटलं सर आता माझ्यावर खूप रागावतील. ओरडतील. सरसुद्धा थोडा वेळ शांत राहिले. मग म्हणाले, ‘‘तुझ्याकडून चूक झाली तू ती कबूल केलीस ही चांगली गोष्ट आहे. तू नेहमीच असाच वाग. आपल्याकडून चुका होतात आपण त्या कबूल केल्या पाहिजेत आणि सुधारल्या पाहिजेत. तू जसा तुझ्या झाडाला जपतोस तसं मित्राच्या झाडालाही जपायला हवं होतं. ठीक आहे, आता जे घडलं ते घडलं. आता ते रोप काही जोडता येणार नाही. तोडणं सोपं असतं जोडणं अवघड आहे. मी उद्या येताना तुझ्यासाठी एक रोप आणणार आहे. त्या रोपाची तू लावलेल्या रोपासारखीच काळजी घ्यायची आहेस आणि ते रोप जगवायचं आहे.’’

हेही वाचा…बालमैफल : आगळी रंगपंचमी

सरांनी दुसऱ्या दिवशी येताना माझ्यासाठी एक पेरूचं छोटंसं झाड आणलं. मी ते झाड खूप काळजी घेऊन वाढवलं. आजही ते झाड शाळेच्या बागेत आहे. जेव्हा जेव्हा मी माझ्या गावी जातो तेव्हा शाळेसमोर ते रोप वाऱ्यावर डोलताना बघतो; तेव्हा तेव्हा मला आनंद होतो. गुरुजी म्हणाले ते खरं आहे, ‘‘जी वस्तू आपण जोडू शकत नाही ती तोडायचा अधिकार आपल्याला नाही.’’

इयत्ता पाचवी, जि. प. शाळा कणकवली क्रमांक पाच, ता. कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग

balmaifal@expressindia.com