प्राची मोकाशी
‘‘…माझ्या जीवनात तीन गुरू आणि तीन दैवतं यांना विशेष आणि अढळ स्थान आहे. माझे सर्वोत्तम आणि पहिले गुरू बुद्ध, दुसरे संत कबीर आणि तिसरे महात्मा ज्योतिबा फुले… तसंच माझी तीन दैवतं आहेत- ज्ञान, स्वाभिमान आणि नैतिकता… मित्रांनो, हे उद्गार आहेत देशाच्या राज्यघटनेचे शिल्पकार बाबासाहेब अर्थात भारतरत्न डॉ. भीमराव आंबेडकर यांचे. त्यांनी मुंबई युनिव्हर्सिटीची बी.ए. आणि एम.ए. डिग्री, अमेरिकेच्या कोलंबिया युनिव्हर्सिटीतून एम.ए., पीएच.डी., लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सची एम.एस.सी., डी.एस.सी अर्थात डॉक्टर ऑफ सायन्स, डी. लिट अशा अनेक पदव्या मिळवल्या होत्या. त्यांचं अनेक विषयांवर प्रभुत्व होतं, त्याचबरोबर ते व्हायोलीन, तबलाही वाजवत. पेंटिंगही करत. बाबासाहेब आंबेडकर हे एक उच्चविद्याविभूषित बहुआयामी व्यक्तिमत्त्व होतं.’’ शाळेतील ऑडिटोरियमच्या स्टेजवरून रिया हिरिरीनं बोलत होती.

तिचं भाषण ऐकून प्रेक्षक विद्यार्थ्यांमधून काही आश्चर्याचे उद्गार ऐकू आले. १४ एप्रिलला येणाऱ्या ‘आंबेडकर जयंती’ निमित्त रियाच्या शाळेमध्ये वक्तृत्त्व स्पर्धा आयोजित केली होती. सी.बी.एस.ई. शाळा असल्यामुळे त्यांचं नवीन शैक्षणिक वर्षं नुकतंच सुरू झालं होतं. ‘‘शिक्षण हा समाजाचा आत्मा आहे, असं ते नेहमी म्हणायचे. कोणत्याही समाजाची उन्नती ही त्या समाजातील शिक्षणाच्या प्रगतीवर अवलंबून असते यावर त्यांचा ठाम विश्वास होता. पण ‘स्वातंत्र्य’, ‘समानता’, ‘बंधुभाव’ यांच्यासारख्या मूल्यांचं जी राज्यघटना समर्थन करते त्याचे जनक त्यांच्या लहानपणापासून अनेक वेळा जातीच्या विळख्यात अडकले, हा केवढा मोठा विरोधाभास…’’ रिया सांगत होती. पुढे दोन-तीन मिनिटं तिचं भाषण सुरू राहिलं. स्पर्धेच्या निमित्तानं तिला आंबेडकरांबद्दल बरीच माहिती मिळाली होती.

हेही वाचा : बालमैफल: नवचैतन्याचा पाडवा

‘‘काय विलक्षण व्यक्तिमत्त्व… उपेक्षित समाजातले असूनही मुळात शिक्षण मिळणं, त्यात इतक्या पदव्या कमावणं, देशातच नव्हे तर जगभरात मानसन्मान मिळवणं… सगळं किती अवघड असेल आंबेडकरांना.’’ रियाचं भाषण ऐकल्यानंतर मिहीर तिला म्हणाला. स्पर्धेनंतर घरी जाताना रिया, जान्हवी आणि मिहीर यांच्यामध्ये आंबेडकरांच्या विषयावर भरपूर चर्चा झाली. तिघे सातवीत शिकत होते त्यामुळे विचारांची समज, विषयाची प्रगल्भता त्यांच्यापाशी होती.

‘‘स्पृश्य-अस्पृश्य असा भेद मानणारा तो काळ… अस्पृश्यांना देवळात जायला परवानगी नव्हती. गावातल्या विहिरीतून पाणी काढून पिण्याची मुभा नव्हती…’’ रिया अजूनही भाषणाच्याच मूडमध्ये होती.
‘‘सो अन-ह्युमन.’’ मिहीर उद्गारला.
‘‘पदोपदी अनुभवलेल्या अशा अनेक घटनांमुळे उपेक्षित समाजाला सामर्थ्यवान बनवण्याचा त्यांचा निश्चय दृढ होत गेला.’’ रियानं अधिक माहिती दिली.
तिघे शाळेच्या गेटबाहेर पडणार इतक्यात मिहीरला काहीतरी आठवलं आणि तो पुन्हा शाळेत गेला.
‘‘लायब्ररीचं पुस्तक द्यायचं राहिलं…’’ मिहीर पाच-दहा मिनिटांनी परतल्यावर म्हणाला.
‘‘वाचून झालं होतं का?’’ जान्हवीला मिहीरची वाचनाबद्दलची ‘आस्था’ ठाऊक होती. स्वाभाविकच मिहीरने नकारार्थी मान डोलावली. त्यांचं संभाषण ऐकून रियाला वाचलेलं काहीतरी आठवलं.
‘‘इंग्लंडहून परतताना व्हेनिस ते मुंबई या सहा दिवसांच्या प्रवासादरम्यान आंबेडकरांनी तब्बल आठ हजार पानं वाचून काढली होती.’’
‘‘काय स्पीड आहे! मी तर ऐकलंय त्यांच्या घरी पन्नास हजार वगैरे पुस्तकं होती.’’ जान्हवी म्हणाली.
‘‘होय. त्यांच्या घरातली लायब्ररी जगातल्या सगळ्यांत मोठ्या लायब्ररींपैकी गणली जायची. आंबेडकर रात्री फक्त तीन तास झोपायचे. इतर सगळा वेळ त्यांचा कामात आणि वाचनात जात असे. आणि वाचनसुद्धा कसं? शिस्तबद्ध- नोट्स काढणे, महत्त्वाचे पॉइंट्स टिपून ठेवणे, गरजेचे उतारे हायलाइट करणे… एकदा तर सलग चौसष्ट तास बसून त्यांनी अख्खं पुस्तक वाचून संपवलं होतं.’’
‘‘वॉव. हे अद्भुत आहे.’’ मिहीर म्हणाला.

हेही वाचा : बालमैफल: तोडणं सोपं, जोडणं अवघड

‘‘आणि आपल्या वाचन उदासीनतेचं काय करायचं?’’ जान्हवीनं त्याला चिडवलं. त्यावर मिहीरनं स्वत:चे कान पकडून ‘आपण आता असं पुढे करणार नाही,’ असं सांगण्याचा प्रयत्न केला.
‘‘आपल्याच देशात नव्हे तर जगभरात अनेक लोक आंबेडकरांना त्यांचा ‘आयडॉल’ मानतात. विद्वान, प्रोफेसर, अर्थशास्त्रज्ञ, समाजसुधारक, राजनीतिज्ञ… एकाच व्यक्तिमत्त्वाला कितीतरी पैलू! त्यांना अकरा भाषा येत होत्या. पाली भाषेची तर त्यांनी डिक्शनरी बनवलीय.’’
‘‘भारी… एक विचार मनात आला. आंबेडकर इतक्या जणांचे आयडॉल आहेत. त्यांचं ‘आयडॉलं’ कोण असेल?’’ जान्हवीनं रियाकडे उत्तराच्या अपेक्षेनं पाहिलं.
‘‘आंबेडकर हे एक ‘सेल्फ-मेड’ व्यक्तिमत्त्व होते. पण त्या काळात पी. बाळू म्हणजेच बाळू पाळवणकर हे दलित समाजातून आलेले एक लेफ्ट-आर्म स्पिन बॉलर होते. भारतीय क्रिकेट इतिहासात उपेक्षित समाजातून आलेले पहिले क्रिकेटर. तेव्हा एका मॅचमध्ये पुण्याच्या डेक्कन जिमखान्याच्या उच्चवर्णीयांची टीम ही पूना जिमखान्याच्या ब्रिटिशांच्या टीमला हरवण्यास उत्सुक होती. डेक्कनच्या टीमला ठाऊक होतं की पूना जिमखाना टीमला हरवायचं असेल तर बाळू यांना टीममध्ये घेण्याशिवाय पर्याय नाही. तेव्हा जात-पात विसरून बाळूंचं डेक्कनच्या टीममध्ये सिलेक्शन झालं. ही एक क्रांतिकारक घटना होती. स्वाभाविकच त्यांचा संघर्ष कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुण आंबेडकरांच्या मनावर कोरला गेला. ते त्यांना त्यांचा ‘हिरो’ मानायचे.’’
‘‘आंबेडकर आणि क्रिकेट? अमेझिंग.’’ मिहीर म्हणाला. गप्पांच्या नादात चालता-चलता तिघांना एका वस्तीमध्ये फ्लेक्स लावलेला दिसला. आंबेडकर जयंतीनिमित्त टी-२० क्रिकेट टूर्नामेंट आयोजित केली होती.
‘‘एक पी. बाळंचा तो काळ होता आणि आताचा काळ! कुठल्या-कुठल्या दुर्गम गावांतून येणाऱ्या खेळाडूंचं सिलेक्शन सर्वस्वी त्यांच्या परफॉर्मसवर होतं. इथे प्रांत-जात-वर्ण-धर्म आड येत नाही. याचं केवढं मोठं श्रेय आंबेडकरांना जातं.’’ मिहीरला जाणवलं.

हेही वाचा : बालमैफल : आगळी रंगपंचमी

‘‘खरंय. आंबेडकरांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य उपेक्षितांच्या उद्धारासाठी वेचलं. ‘शिक्षित व्हा, आंदोलन करा, संघटित व्हा’… या नाऱ्याने ते त्यांचं मनोबल वाढवायचे. आणि म्हणूनच कदाचित पंडित नेहरू त्यांना ‘सिम्बॉल ऑफ रीव्होल्ट’ अर्थात ‘क्रांतीचे प्रतीक’ असं संबोधायचे,’’ असं म्हणत रियानं तिच्या बॅगमधून स्पर्धेनंतर मिळालेला टी-शर्ट बाहेर काढला. त्यावर ठळक अक्षरांत आंबेडकरांचे शब्द प्रिंट केले होते ‘आयुष्य मोठे असण्यापेक्षा महान असले पाहिजे…’ त्यांच्या आयुष्याचा मथितार्थ सांगणारे!

mokashiprachi@gmail.com