काव्यमैफल
निळ्याभोर तळ्यात निळे निळे पाणी
पाण्यावर लाटांच्या छान छान गाणी ।।

lok01बेडुकराव काठावर ऐटीत बसतात
पाण्याच्या लाटांवर एक झोप काढतात
घोरण्याचा आवाज त्यांचा घुमतो कानी
पाण्यावर लाटांच्या छान छान गाणी ।।

इवलिशी चिमणी नाहायला येते
गवताच्या काडीवर टॉवेल टाकते
केसातून पडते तिच्या टप्टप् पाणी
पाण्यावर लाटांच्या छान छान गाणी ।।

झुकलेल्या फांदीवर खारुताई बसते
पाण्याच्या आरशात गंध-पावडर करते
दिवसभर करते ती वेणी आणि फणी
पाण्यावर लाटांच्या छान छान गाणी ।।

एक मुंगी धुणं घेऊन धुवायला आली
साबणाची वडी तिची पाण्यातच गेली
ऐकत नाही रडणे तिचे मुळुमुळु कोणी
पाण्यावर लाटांच्या छान छान गाणी ।।
 बालाजी मदन इंगळे