श्रीकृष्णाच्या आठ प्रमुख पत्नी होत्या, त्या अष्टभार्या म्हणून ओळखल्या जातात. अष्ट म्हणजे ८ (आठ) आणि भार्या म्हणजे पत्नी. विष्णुपुराणानुसार श्रीकृष्णाच्या आठ प्रमुख राण्यांचा यात समावेश होतो. केवळ इतकेच नाही तर या त्याच्या प्रिय म्हणूनही ओळखल्या जातात. श्रीकृष्णाच्या या प्रिय पत्नी होत्या तरी कोण? हे श्रीकृष्णजन्माचे औचित्य साधून जाणून घेणे रंजक ठरणारे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पहिली भार्या: रुक्मिणी

रुक्मिणी ही विदर्भकन्या होती. तिने श्रीकृष्णाला आपला पती म्हणून वरले. श्रीकृष्ण आणि तिची भेट कशी कुठे झाली यावर अनेक कथा उपलब्ध आहेत. तिने श्रीकृष्णाशीच विवाह करण्याचा निर्धार केला होता. परंतु हे तिच्या भावाला म्हणजेच ‘रुक्मीला’ मान्य नव्हते. म्हणून रुक्मी आणि त्याच्या वडिलांनी एक खोटा बनाव रचला. रुक्मिणीसमोर कृष्ण मथुरेच्या आगीत मारला गेला अशी खोटी आरोळी ठोकली आणि रुक्मिणीचा विवाह शिशुपालाशी करण्याचा घाट घातला. परंतु रुक्मिणीला मनोमन हे माहीत होते; श्रीकृष्ण आहे, हा जगत् पालक आहे, त्याला काहीही झालेले नाही. तिने श्रीकृष्णाला एक गुप्तपत्र लिहिले. यदू वंश कोठे स्थलांतरित झाला हे शोधून काढले. आणि स्वयंवराच्या दिवशी तिला घेवून जाण्याची विनंती श्रीकृष्णाला केली. ज्या दिवशी रुक्मिणीचे स्वयंवर होते, त्या सकाळी ती गौरीच्या मंदिरात गेलेली असताना, मंदिरातून बाहेर पडल्यावर कृष्ण तिची वाट पाहत असल्याचे तिला दिसले. त्याच क्षणी कृष्णाने तिचे हरण केले. इतर राजांच्या लक्षात येताच त्यांनी कृष्णाचा पाठलाग सुरू केला.

बलरामाने त्या सर्वांना थांबवले, परंतु रुक्मीने कृष्णाचा पाठलाग केला, परंतु त्याच्या पदरी अपयश आले. श्रीकृष्णाने रुक्मीचा त्या लढाईत पराभव केला आणि जेव्हा तो रुक्मीला मारणार होता तेव्हा रुक्मिणीने मध्यस्थी केली आणि आपल्या भावाच्या जीवाची याचना केली. या नंतर श्रीकृष्ण आणि रुक्मिणीचा द्वारकेत पोहोचल्यानंतर विवाह झाला.

आणखी वाचा: Krishna Janmashtami 2023: विदर्भ कन्या रुक्मिणीचे हरण कृष्णाने का केले?

राणी जांबवती :

सत्राजित हा यादव वंशातील एक कुलीन राजा होता. ज्याच्याकडे भगवान सूर्याकडून मिळालेले ‘स्यमन्तक’ हे दैवी रत्न होते. कृष्णाने सत्राजितला हे रत्न उग्रसेनाकडे पाठवण्यास सांगितले, जेणेकरुन त्याचे रक्षण करता येईल. मात्र सत्राजित आणि त्याचा भाऊ प्रसेनजीत या दोघांनीही नकार दिला. एके दिवशी प्रसेनजीत दागिना घेऊन शिकारीला गेला असताना त्याच्यावर सिंहाने हल्ला केला आणि त्याला ठार केले, त्या दरम्यान जांबवन याने तो मणी घेतला आणि त्याच्या मुलीला खेळायला दिला. जेव्हा सत्राजितला त्याच्या भावाचा मृत्यू आणि ‘स्यमन्तक’ मणी हरवल्याची बातमी समजली तेव्हा त्याने श्रीकृष्णावर मणी चोरल्याचा आरोप केला. आपल्यावरील झालेला चुकीचा आरोप पुसून टाकण्यासाठी श्रीकृष्ण स्वतः ‘स्यमन्तक’ मण्याच्या शोधात निघाला. त्याला जांबवनाकडे रत्न असल्याचे समजले. पौराणिक कथांच्या संदर्भानुसार त्यांनी रत्नासाठी २८ दिवस संघर्ष केला, श्रीकृष्णाने जांबवानला त्याच्या सामर्थ्याने आणि क्षमतेने प्रभावित केले आणि या काळात श्रीकृष्णच रामाचा अवतार असल्याचे जांबवनाला समजले. त्याच क्षणी जांबवनाने पराभव स्वीकारून ‘स्यमन्तक’ मणी श्रीकृष्णाला परत केला. आणि आपल्या मुलीशी विवाह करण्याची प्रार्थना केली.अशा प्रकारे श्रीकृष्णाने जांबवतीशी म्हणजेच जांबवनाच्या मुलीशी लग्न केले. अशा प्रकारे अस्वल-राजकन्या ‘राणी जांबवती’ झाली.

सत्राजिताची मुलगी राणी सत्यभामा :

श्रीकृष्णाने तो दागिना सत्राजितला परत केला आणि तेव्हा सत्राजितला घडलेल्या घटनेमागील खरी वस्तुस्थिती कळली आणि दागिना परत मिळाल्याने त्याला आनंद झाला. त्याने श्रीकृष्णावर खुनाचा आरोप केला होता, यासाठी त्याची माफी मागितली आणि आपली मुलगी सत्यभामा हिला पत्नी म्हणून स्वीकारण्याची विनंती श्रीकृष्णाला केली. त्यामुळे सत्राजिताची मुलगी सत्यभामा ‘राणी सत्यभामा’ झाली.

आणखी वाचा: एक उत्कट अधुरी प्रेम कथा…. उर्वशी आणि पुरुरवा!

राणी कालिंदी:

सूर्यदेव- कालिंदीची कन्या भगवान श्रीकृष्णाची चौथी अर्धांगी म्हणून प्रसिद्ध आहे. भगवान श्रीकृष्णाशी लग्न करण्याच्या इच्छेने तिने कठोर तपश्चर्या केली. कालिंदी खांडव नावाच्या जंगलात राहत होती. एकदा कृष्ण आणि अर्जुन यमुनेच्या किनाऱ्यावर शिकार करून विश्रांती घेत होते. त्यांना एक तरुण मुलगी तीरावर चालताना दिसली, श्रीकृष्णाने अर्जुनाला ती कोण आहे याची चौकशी करण्यास सांगितले. अर्जुनाने विचारणा केली असता कळले की, हीच यमुना नदी आहे.

कोसलाची राजकुमारी राणी सत्या

रुक्मिणीने श्रीकृष्णाला पती म्हणून निवडले होते. कालिंदीचेही तसेच होते. सत्यभामा आणि जांबवती यांना त्यांच्या वडिलांनी श्रीकृष्णाला त्यांच्यासाठी पती म्हणून निवडले होते, परंतु कोसलाची राजकुमारी राणी सत्यासाठी श्रीकृष्णाला मात्र त्यांची पात्रता सिद्ध करावी लागली. तिचे वडील, कोसलचा राजा नागनजित यांनी घोषित केले होते की, जो कोणीही आपल्या सात उत्कृष्ट बैलांना पाश घालू शकतो तोच तिचा पती होण्यास योग्य आहे. राजांना सिंहाची शिकार कशी करायची आणि घोड्यांची शिकार करायची हे माहीत होते, पण बैलांना वश कसे करावे हे माहीत नव्हते. ज्यांनी हे धाडस केले ते एक-दोन बैल ताब्यात आणू शकले, परंतु सात हे केवळ गुराख्याशिवाय दुसरे कोण करू शकणार नव्हते?. श्रीकृष्णाने रिंगणात प्रवेश केला त्यावेळेस सर्वांनाच आश्चर्य वाटले, त्याने आपल्या शरीरातून आणखी सहा कृष्ण निर्माण केले. या सात कृष्णांनी नागजितच्या सात बैलांना वश केले. हा अशक्य पराक्रम केल्यानंतर, इतर सहा श्याम नाहीसे झाले आणि मागे राहिलेल्या एकाने सत्याला त्याची पाचवी पत्नी म्हणून स्वीकारले.

अवंतीची मित्रविंदा

स्वयंवर हा एक प्राचीन विवाहाचा प्रकार आहे. अवंती येथे अशाच एका समारंभासाठी श्रीकृष्णाला आमंत्रित करण्यात आले होते. त्याचे काळेभोर शरीर, तेजस्वी डोळे, स्मितहास्य यामुळे तो क्षणार्धात अनेकांच्या नजरेत भरला. श्रीकृष्णाचे रूप मोहक होते. तो स्त्रियांची काळजी घेत असे. हे मित्रविंदाने हेरले आणि श्रीकृष्णालाच तिचा पती म्हणून निवडले. परंतु हे काही तिच्या भावांना आवडले नाही. ‘तो राजा नाही, तो गोपाळांमध्ये राहिला आहे. तो जिथे जातो तिथे त्रास होतो. जरासंध त्याचा द्वेष करतो, अशी त्यांची धारणा होती. म्हणून ज्या वेळेस राजकुमारीने श्रीकृष्णाला वरमाला घालण्यासाठी हात वर केला, त्या वेळेस तिच्या भावांनी तिला अडविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना श्रीकृष्णाशी सामना करावा लागला. यात त्यांचाच पराभव झाला आणि मित्रविंदा ही कृष्णाची सहावी पत्नी झाली.

केकयाची भद्रा:

वसुदेवाची बहीण शूतकीर्ती हिने केकय राजाशी विवाह केला होता आणि तिला भद्रा नावाची कन्या होती. आपल्या मुलीने श्रीकृष्णाशी लग्न करावे ही श्रृतकीर्तीची इच्छा होती. केकयाच्या राजाने ते मान्य केले. अशा प्रकारे, भद्रा ही कृष्णाची सातवी पत्नी झाली.

मद्राची लक्ष्मणा:

मद्राच्या बृहत्सेन राजाने धनुर्विद्या स्पर्धेचे आयोजन केले होते, बक्षीस म्हणून त्याची मुलगी लक्ष्मणाचा विवाह आयोजित केला होता. स्पर्धकांना तेलाच्या भांड्यात प्रतिबिंब पाहून छतावरून लटकलेल्या फिरत्या चाकाला चिकटलेल्या माशाचा डोळा भेदावा लागणार होता. ही स्पर्धा श्रीकृष्णासाठी सहज सोप्पी होती. श्रीकृष्णाने आपले लक्ष्य भेदले आणि लक्ष्मणाला आपली पत्नी म्हणून जिंकले.

मराठीतील सर्व ब्लॉग्स बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Main eight wives of lord shri krishna in hindu mythological stories svs