उद्धव यांचा हल्लाबोल ; मुख्यमंत्र्यांनी वीजनिर्मिती केंद्र, तर केंद्राने ‘कोस्टल रोड’ अडविला

मंत्रिमंडळाच्या बैठका आणि राज्य सरकारचा कारभार आधी पारदर्शक करा, असा सणसणीत टोला लगावत करीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईसाठीचे वीजनिर्मिती केंद्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहा महिन्यांहून अधिक काळ अडविले असून किनारपट्टी रस्त्याच्या मंजुऱ्या केंद्र सरकारने रोखल्याचा आरोप केला. मुख्यमंत्र्यांनी वीजनिर्मिती केंद्र कोणासाठी व कशासाठी थांबविले आहे, हे पारदर्शीपणे जाहीर करण्याची मागणी करीत ठाकरे यांनी ‘शिवसेनेला एकदा अंगावर घ्याच, एकदाच निर्णय होऊ दे,’ असे आव्हान दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदीच्या निर्णयावर ‘पाकीटमार’ असे टीकास्त्र सोडत भाजप हा ‘जल्लीकट्टू’ चा बैल असून त्यांना शिवसेना वेसण घालेल, असे स्पष्ट केले.

महापालिका निवडणूक प्रचारासाठी ठाकरे यांनी भांडुपमध्ये घेतलेल्या सभेत पंतप्रधान मोदी यांची खिल्ली उडवीत मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपवर चौफेर हल्ला चढविला. भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष बंगारु लक्ष्मण एक लाख रुपयांची लाच घेताना पकडले जातात आणि आम्हाला पारदर्शीपणा शिकवायला लाज वाटत नाही, असे टीकास्त्र सोडत ठाकरे यांनी पारदर्शीपणा हे थोतांड असल्याचे स्पष्ट केले. मुंबई महापालिकेचा कारभार पारदर्शी असल्याचे भाजपच्याच केंद्र सरकारने आर्थिक पाहणी अहवालात दाखविले असताना राज्यातील भाजप नेत्यांना मात्र ते दिसत नाही, असा उल्लेख करीत ‘इतरांना ब्रह्मज्ञान सांगू नका, आधी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राज्यमंत्री, विरोधी पक्षनेते, लोकायुक्त व पत्रकारांना बोलावून राज्य सरकारचा कारभार पारदर्शी करा, मग भूखंड, चिक्कीचे आरोप होणार नाहीत,’ असा टोला ठाकरे यांनी लगावला. महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीतही प्रसिद्धिमाध्यमांना प्रवेश आहे व कारभार पारदर्शी असल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले.

मध्य वैतरणा हे धरण साडेतीन वर्षांत बांधले, पण परवानगीसाठी १० वर्षे गेली. किनारपट्टी रस्ताही (कोस्टल रोड) महापालिका बांधत असून भाजप सरकार असूनही अजून परवानगी मिळत नाही. मध्य वैतरणा धरणाच्या ठिकाणी मुंबईकरांसाठी वीजनिर्मिती केंद्र सुरू करण्याची महापालिकेची योजना असून मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी माझी चर्चा होऊनही सहा-आठ महिन्यांमध्ये ते अजून मान्यता देत नाहीत. शिवसेनेला कामच करू दिले जात नाही, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.

उद्धव ठाकरे म्हणाले..

  • हिंमत असेल तर विदर्भासह अखंड महाराष्ट्राची शपथ घ्या, शिवसेनेचे नेते घेतील
  • मराठी माणूस इंग्रजीही बोलतो, याचा अभिमान, म्हणून ‘डिड यू नो’ प्रचारमोहीम
  • शिवसेना थापेबाजी करीत नाही, योजना तयार आहेत
  • मोदी पाकीटमार, एटीएमच्या रांगेत श्रीमंत नाही, गोरगरीब मेले
  • शिवसेना कार्यकर्त्यांमुळे यश मिळत असताना ११४ जागा भाजपच्या घशात कशाला घालू?
  • काळा पैसा असेल त्यांनी मत देऊ नका, असे मोदींनी लोकसभेला सांगितले होते का?
  • स्विस बँकेतील पैसा आणण्याचे काय झाले?