बोलणी अर्धवट सोडून उद्धव गोवा, उत्तर प्रदेश प्रचार दौऱ्यावर

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत जास्तीत जास्त जागा मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या भाजपला हरतऱ्हेने खेळवत ठेवण्याचे प्रयत्न शिवसेनेने आरंभले आहे. युतीची बोलणी सुरू असतानाच, एकीकडे इच्छुक उमेदवारांच्या भेटीगाठी सुरू करणाऱ्या सेनेने आता ही चर्चा जास्तीत जास्त वेळ लांबणीवर टाकून भाजपला तंगवण्याची रणनीती आखली आहे. गोवा आणि उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीत पक्षाचा प्रचार करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पक्षाचे महत्त्वाचे नेते तेथे दौऱ्यावर जाणार आहे. त्यामुळे पालिकेतील युतीची चर्चा पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर सध्या मुंबईमध्ये वातावरण तापू लागले आहे. निवडणुकीसाठी इच्छुक शिवसैनिक ‘मातोश्री’चे उंबरठे झिजवू लागले आहेत. पक्षात अंतर्गत बंडाळी माजू नये याची काळची शिवसेना पक्षप्रमुख जातीने घेत आहेत. एकाच इच्छुकाला उमेदवारी मिळणार असल्याने त्याची निवड होताच, इतर इच्छुकांनी पक्षाच्या उमेदवाराच्या विजयासाठी काम करावे, असे आवाहन उद्धव ठाकरे स्वत: इच्छुक उमेदवारांना करत आहेत.  शिवसेनेचे मंत्री, नेते, उपनेत्यांवर अवलंबून न राहता भाजपच्या प्रत्येक हालचालींवर उद्धव ठाकरे हे स्वत:च लक्ष ठेवून आहेत.

गोवा आणि उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकांची जबाबदारी शिवसेनेतील काही मंडळींवर सोपविण्यात आली आहे. मात्र तरीही उद्धव ठाकरे यांनी गोवा आणि उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने काही उमेदवार रिंगणात उतरविले आहेत. गोवा आणि उत्तर प्रदेशमध्ये दौऱ्यावर जाऊन भाजपचे लक्ष विचलित करण्याची खेळी त्यामागे आखण्यात आली आहे. गोवा आणि उत्तर प्रदेशच्या दौऱ्याबाबत शिवसेनेमध्ये प्रचंड गुप्तता पाळण्यात आली आहे. आपल्यासोबत कोणत्या नेत्यांना घेऊन जायचे याबाबतही गुप्तता पाळण्यात आली आहे. काही निवडक नेत्यांना सुरुवातीला गोवा दौऱ्यावर घेऊन जाण्यात येणार आहे. गोव्यामधील राजकीय परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर उद्धव ठाकरे तेथील काही महत्त्वाच्या व्यक्तींच्या भेटीगाठी घेणार आहेत.

उत्तर प्रदेशमधील बदललेल्या राजकीय परिस्थितीत उमेदवारांना बळ देण्यासाठी उद्धव ठाकरे तेथे जाणार आहेत. शिवसेनेतील काही नेत्यांना गोवा, उत्तर प्रदेशच्या दौऱ्याची कुणकुण लागली असून पालिका निवडणुकीच्या जागावाटपाची चर्चा वाऱ्यावर सोडून पक्षप्रमुख दौऱ्यावर जाणार समजल्याने ते संभ्रमात आहेत. आपल्यावर कोणती जबाबदारी टाकण्यात येते याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.