मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ महाराष्ट्रने (महाबँक) मार्चअखेर संपलेल्या तिमाहीत कर्ज वितरणात १६.३१ टक्क्यांची वाढ नोंदविली असून, ते २.०३ लाख कोटी रुपयांवर पोहोचले असल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले.

पुण्यात मुख्यालय असलेल्या महाबँकेने याबाबत शुक्रवारी भांडवली बाजाराला माहिती दिली. त्यानुसार, बँकेचे कर्ज वितरण मार्च २०२३ अखेर १.७५ लाख कोटी रुपये होते. सरलेल्या आर्थिक वर्षाच्या अखेरीस ते २.०३ लाख कोटी रुपयांवर पोहोचले. बँकेच्या एकूण ठेवींमध्ये १५.६३ टक्के वाढ होऊन, त्या २.७० लाख कोटी रुपयांवर पोहोचल्या आहेत. मार्च २०२३ अखेरीस बँकेच्या एकूण ठेवी २.३४ लाख कोटी रुपये होत्या.

हेही वाचा >>>१९ वर्षीय तरुणी ठरली जगातील सर्वात तरुण अब्जाधीश, किती आहे संपत्ती? भारतात हा मान कुणाला मिळाला, हे ही पाहा

एकूण ठेवींमध्ये चालू खाते आणि बचत खात्यांचे प्रमाण ५३.३९ टक्क्यांवरून ५२.३७ टक्क्यांवर घसरले आहे. कर्ज आणि ठेवींचे गुणोत्तर सुधारून मार्चअखेरीस ७५.२३ टक्क्यांवर पोहोचले आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ते ७४.८७ टक्के होते. बँकेचा एकूण व्यवसाय मार्च २०२४ अखेरीस ४.७४ लाख कोटी रुपये आहे. गेल्या वर्षातील याच कालावधीच्या तुलनेत त्यात १५.९३ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे, असे बँकेने म्हटले आहे.