पुणे : नवनव्या मानकांच्या पालनावर नियामकांचा भर आणि करांचा वाढत असलेला भार यामुळे दुचाकीच्या किमती महागल्या असून, करोनापूर्व विक्रीची पातळी अद्यापही दुचाकी बाजारपेठेला न गाठता येण्यामागे हे प्रमुख कारण आहे, अशी टीका बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी शुक्रवारी केली.

देशात मागील काही काळात दुचाकीच्या किमती वाढल्या असून, सामान्य ग्राहकांसाठी त्या महागड्या बनल्या आहेत. या पार्श्वभूमीवर बोलताना राजीव बजाज म्हणाले की, नियामकांकडून सातत्याने नवीन मानके आणली जात आहेत. सुरुवातीला बीएस-६ मानके आणण्यात आली. यामुळे दुचाकीचा उत्पादन खर्च वाढला. याचा फायदा प्रदूषण कमी होण्यात झाला असला तरी दुचाकी महागल्या. याचबरोबर १२५ सीसीपेक्षा जास्त इंजिन क्षमता असलेल्या दुचाकींनी ॲण्टी-ब्रेक लॉकिंग सिस्टिम (एबीएस) बंधनकारक आहे. यामुळेही उत्पादन खर्चात वाढ होऊन किंमत वाढली. या सर्व कारणांमुळे दुचाकींची विक्री अद्याप करोनापूर्व पातळीवर गेलेली नाही, असे ते म्हणाले.

हेही वाचा >>> टीबीओ टेकची प्रत्येकी ८७५ ते ९२० रुपयांना भागविक्री

दुचाकीवर २८ टक्के वस्तू व सेवा कर (जीएसटी) आकारला जातो. हा खूपच जास्त कर असल्याने ग्राहकांना अधिक किंमत मोजावी लागते. ग्राहकांना परवडणाऱ्या दरात दुचाकी द्यावयाची झाल्यास त्यावरील कर कमी करायला हवा. सरकारने दुचाकीवरील जीएसटी १८ ते २० टक्क्यांवर आणावा. यामुळे किमती कमी होऊन दुचाकी ग्राहकांच्या खिशाला परवडणाऱ्या किमतीत मिळतील, असे बजाज यांनी स्पष्ट केले.

भारतात दुचाकीवर २८ टक्के जीएसटी आहे. आशियातील इतर देशांचा विचार करता दुचाकीवर ८ ते १४ टक्क्यांपर्यत कर आकारला जातो. यातच नियामकांच्या नवीन मानकांमुळे दुचाकींचा उत्पादन खर्च आणि पर्यायाने किमती वाढल्या आहेत.

– राजीव बजाज, व्यवस्थापकीय संचालक, बजाज ऑटो