पीटीआय, नवी दिल्ली

टीव्हीएस होल्डिंग्ज लिमिटेडने मुख्यत: मोबाइल फोन खरेदी आणि घरखरेदीसाठी वित्तपुरवठा करणाऱ्या ‘होम क्रेडिट इंडिया फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड’मधील ८०.७४ टक्के हिस्सेदारी संपादित केली असून, सुमारे ६८६ कोटी रुपयांना हा व्यवहार पार पडणार असल्याचे टीव्हीएस होल्डिंग्सने शुक्रवारी सांगितले. तिने नेदरलँड्सस्थित होम क्रेडिट इंडिया बीव्ही आणि चेक प्रजासत्ताकस्थित होम क्रेडिट इंटरनॅशनल एएस या प्रवर्तक कंपन्यांकडून हा हिस्सा खरेदी केला आहे.

टीव्हीएस होल्डिंग्जने ८०.७४ टक्के अशी बहुतांश हिस्सेदारी सुमारे ५५४ कोटी रुपयांना खरेदी केली आहे. तर उर्वरित १९.२६ टक्के भागभांडवल प्रेमजी इन्व्हेस्ट आणि इतर कंपन्यांकडून खरेदी केले जाणार आहे. या माध्यमातून टीव्हीएस होल्डिंग्जला होम क्रेडिट इंडिया फायनान्सचे सुमारे ८८.०९ कोटी समभाग मिळणार आहेत. तर प्रेमजी इन्व्हेस्ट ११ टक्के हिस्सेदारीसह दुसरी सर्वात मोठी भागीदार असेल, अशी माहिती टीव्हीएस होल्डिंग्सचे व्यवस्थापकीय संचालक सुदर्शन वेणू यांनी दिली.

हेही वाचा >>>Gold-Silver Price on 10 May 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ग्राहकांना धक्का! सोनं-चांदी महागलं, १० ग्रॅमचा भाव आता…

होम क्रेडिट इंडिया फायनान्स वैयक्तिक कर्ज श्रेणीमधील अग्रगण्य कंपनी आहे. ३१ मार्च २०२४ अखेर कंपनीच्या एकूण व्यवस्थापनाखालील मालमत्ता ५,५३५ कोटी रुपयांची होती. कंपनीमध्ये ३,८०० कर्मचारी कार्यरत असून व्यवसाय ६२५ शहरांमध्ये पसरलेला आहे. कंपनीची वर्ष २०२२-२३ मध्ये १,७२० कोटी रुपयांची उलाढाल झाली.