मुंबई: महिंद्रा मनुलाइफ म्युच्युअल फंडाने समभाग, कर्जरोखे, सोने/चांदी ईटीएफ अशा वेगवेगळ्या मालमत्ता वर्गांमध्ये गुंतवणूक विभागू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी नवीन ‘मल्टी ॲसेट ॲलोकेशन फंड’ दाखल केला आहे. नवीन योजनेचा प्रारंभिक गुंतवणूक कालावधी (एनएफओ) २० फेब्रुवारीपासून सुरू झाला असून, तो ५ मार्च रोजी बंद होईल. नंतर १५ मार्च २०२४ पासून योजना निरंतर विक्री आणि पुनर्खरेदीसाठी खुली होईल.

बाजारातील बदलत्या परिस्थितीच्या आधारावर निधी व्यवस्थापकांद्वारे या योजनेतून विविध मालमत्तांनुरूप गुंतवणूक विभागणी नियमितपणे संतुलित केली जाईल. वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओचे उद्दिष्ट स्थिर उत्पन्न, समभागांतील उच्च वाढीची क्षमता आणि कर्जरोख्यांमुळे गुंतवणूकदारांना इंडेक्सेशनच्या फायद्यासह दीर्घकाळात भांडवली नफा कर आकारणीने कमी करदायीत्वाची संधीही मिळेल.

हेही वाचा >>>देशभरातील संकटातील २०० हत्तींचं रिलायन्सनं केलं पुनर्वसन; अनंत अंबानींनी केली ६०० एकरमधील ‘वंतारा’ प्रकल्पाची घोषणा

बाजार नेहमीच आव्हाने तसेच संधी सादर करत असतात आणि मालमत्ता वर्गांमधील वैविध्यता हा जोखीम टाळून संधीचा सर्वोत्तम लाभ मिळवण्याचा एक आदर्श मार्ग आहे. त्यामुळे मल्टी-ॲसेट अलोकेशन फंड ही अशी योजना आहे जी प्रत्येक गुंतवणूकदाराच्या पोर्टफोलिओमध्ये असायला हवी, असे महिंद्र मनुलाइफ इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंटचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अँथनी हेरेडिया म्हणाले. या योजनेत एसआयपी आणि एकरकमी अशी दोन्ही प्रकारे गुंतवणूक केली जाऊ शकते.