रिलायन्स इंडस्ट्रीज आणि रिलायन्स फाऊंडेशन्सकडून सोमवारी संयुक्तपणे ‘वंतारा’ प्रकल्पाची घोषणा करण्यात आली. भारतात आणि विदेशातही जखमी झालेले किंवा केलेल्या प्राण्यांवर उपचार करून त्यांना सुरक्षित वातावरणात राहण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी या प्रकल्पाची सुरुवात करण्यात आल्याचं कंपनी व्यवस्थापनाकडून सांगण्यात आलं आहे. अनंत अंबानी यांनी या प्रकल्पाची सुरुवात केल्याचंही कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. या प्रकल्पाविषयी स्वत: अनंत अंबानी यांनी माध्यमांना माहिती दिली आहे.

“माझ्यासाठी पॅशन म्हणून ज्या गोष्टीची सुरुवात मी लहान असताना झाली, ती गोष्ट आता एका मोहिमेच्या स्वरुपात उभी राहिली आहे. दुर्मिळ प्राण्यांचं जतन, उपचार व संवर्धन करण्यावर आम्ही लक्ष केंद्रीत केलं आहे”, अशी माहिती अनंत अंबानी यांनी दिली. गेल्या काही वर्षांमध्ये या प्रकल्पामध्ये जवळपास २०० जखमी हत्तींवर यशस्वीरीत्या उपचार करण्यात आले आहेत. त्याशिवाय हजारो इतर वन्य प्राण्यांवरही उपचार करण्यात आले आहेत.

कोविड काळात हत्तींवर उपचारांना सुरुवात

दरम्यान, कोविड काळातच जखमी हत्तींवर उपचारांना सुरुवात करण्यात आली होती, अशी माहिती अनंत अंबानी यांनी दिली आहे. “आम्ही कोविड काळातच वन्यजीव बचाव केंद्राची उभारणी सुरू केली होती. आम्ही त्यासाठी जवळपास ६०० एकर परिसरात जंगल उभं केलं आहे. आम्ही हत्तींना राहण्यासाठी एका मोठ्या परिसराची उभारणी केली. २००८ साली आम्ही पहिल्या हत्तीला वाचवून त्याच्यावर यशस्वीरीत्या उपचार केले होते”, असं अनंत अंबानी म्हणाले.

“ग्रीन झुओलॉजिकल रेस्क्यु सेंटर २०२०मध्ये सुरू झालं. या केंद्रासाठी आमच्याकडे तब्बल ३ हजार कर्मचारी व अधिकारी काम करत आहेत. त्यातले २० ते ३० तज्ज्ञ आहेत. या सर्व तज्ज्ञांवर शिक्षक किंवा प्राध्यापक पदाची भूमिका सोपवण्यात आली आहे. वेगवेगळ्या विषयांमध्ये आपलं वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलेल्या पदवीधर तरुणांना आम्ही इथे सहभागी करून घेतलं आहे. शिवाय प्राण्यांविषयी प्रचंड आस्था असणारे काही नियमित डॉक्टरही आम्ही आमच्या या टीममध्ये सहभागी करून घेतले आहेत”, असंही ते म्हणाले.