मुंबई : साबण आणि गृहोपयोगी वस्तूंपासून ते गृहनिर्माण क्षेत्रापर्यंत पसरलेल्या १२७ वर्षं जुन्या गोदरेज समूहाच्या संस्थापक कुटुंबीयांमध्ये विभाजन करण्याच्या निर्णयावर बुधवारी शिकामोर्तब केले. गोदरेज कुटुंबाने मंगळवारीच गोदरेज कंपन्यांमधील त्यांच्या भागभांडवलाच्या मालकीची पुन:संरचना जाहीर केली होती. त्याचे समूहातील सूचिबद्ध कंपन्यांच्या समभागांमध्ये गुरुवारच्या व्यवहारात संमिश्र परिणाम दिसून आले.

हेही वाचा >>> नामिबियामध्ये ‘यूपीआय’सारखी प्रणाली विकसित करण्यासाठी एनपीसीआय करारबद्ध

समूहाच्या झालेल्या दुभाजनांत, भांडवली बाजारात सूचिबद्ध गोदरेज इंडस्ट्रीज, गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्स, गोदरेज प्रॉपर्टीज, गोदरेज ऍग्रोव्हेट आणि ॲस्टेक लाइफसायन्सेस या पाच कंपन्यांचा एक विभाग केला गेला आहे, ज्याची मालकी नादिर गोदरेज यांच्याकडे आणि तेच त्याचे अध्यक्ष असतील. या सूचिबद्ध कंपन्यांच्या समभागांवर विभाजनाच्या करारावर वाढ-घटीचे प्रतिक्रिया उमटली.

हेही वाचा >>> निर्मिती क्षेत्राचा वेग मंदावला; एप्रिलमध्ये पीएमआय निर्देशांक घसरून ५८.८ गुणांकावर

गोदरेज इंडस्ट्रीजचा समभाग ७ टक्क्यांहून अधिक घसरला. हा समभाग मुंबई शेअर बाजारात ७.१५ टक्क्यांनी म्हणजेच ६८.६५ रुपयांनी घसरून ८९२ रुपयांवर स्थिरावला. दिवसभरात त्याने ८७३.४५ रुपयांची नीचांकी पातळी गाठली होती. गोदरेज प्रॉपर्टीजचा समभाग दिवसभरात ४.३७ टक्क्यांनी म्हणजेच ११५.७५ रुपयांनी घसरून २५३२.८० रुपयांवर स्थिरावला. ॲस्टेक लाइफसायन्सेसचा समभागदेखील २.९२ टक्क्यांनी घसरून प्रत्येकी १,२५० वर आला. सुरुवातीच्या सत्रात त्याने जवळपास ९ टक्क्यांची झेप घेत १,४०० रुपयांची पातळी गाठली होती. या पडझडीला गोदरेज ॲग्रोव्हेटचा समभाग मात्र अपवाद राहिला. दिवसभरात तो ५.५८ टक्क्यांनी वाढून ५७५.०५ रुपयांवर गेला होता. तथापि दिवसअखेर ३.५८ टक्क्यांनी वाढून ५६४.१५ रुपयांवर बंद झाला. गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्सचा समभाग १.११ टक्क्यांनी वाढून १,२३३ रुपयांवर बंद झाला.