आजकालच्या तरुण पिढीची सगळ्यात मोठी व्यथा म्हणजे दर महिन्याला कमावलेले पैसे पुरत नाहीत किंवा पैसे नक्की खर्च करायचे असतात त्यावेळेला खात्याला शिल्लक राहत नाहीत. या लेखातून याबद्दल आपण नेमके काय उपाय करू शकतो याचा अंदाज घेऊया.

कोणत्याही दर महिन्याला फिक्स उत्पन्न कमावणाऱ्या माणसाला महिनाअखेरीस पैशाची जुळवाजुळव करावीच लागते, मात्र अलीकडील काळात एकंदरीत सणासुदीला आणि ऑनलाइन पोर्टलवर ऑफर वगैरे सुरू झाल्या की खर्च हाताबाहेर जातात अशी तक्रार होताना दिसते. दिवाळीपासून सुरू झालेला हा सिलसिला अगदी नवीन वर्ष सुरू होण्याच्या सेलिब्रेशनपर्यंत सुरूच राहतो.

switching your exercise routine have several benefits
काही ठराविक महिन्यानंतर व्यायामामध्ये बदल करणे आवश्यक आहे? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
tax harvesting in marathi
Money Mantra: टॅक्स हार्वेस्टिंग म्हणजे काय? त्याचा वापर कसा कराल? केव्हा टाळाल?
digit robot collapse after working 20 hours
२० तास काम करून Robot देखील थकून जमिनीवर कोसळला! ‘या’ व्हायरल व्हिडीओची होत आहे चर्चा…
Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर

२५% चे गणित

तुमच्या एकूण उत्पन्नाच्या २५% पैसे दर महिन्याला एका वेगळ्या अकाउंटला ट्रान्सफर करा व यातून सगळ्या गुंतवणुकीचे हप्ते जातील याची व्यवस्था करा. हे कसे करता येईल ? तुमचे नियमित सेव्हिंग अकाउंट ज्या बँकेत आहे त्याच बँकेत तुम्ही दुसरे अकाउंट उघडा व त्यातून इन्शुरन्सचा हप्ता, म्युच्युअल फंडातील गुंतवणूक, रिकरिंग डिपॉझिट म्हणजेच RD अशा सगळ्या गुंतवणुकीचे हप्ते जातील अशी सोय करा. यातून काय साध्य होईल ? तुमच्या नियमित सेव्हिंग अकाउंट मध्ये जे पैसे उरतील त्यातूनच तुम्हाला खर्च भागवायचे आहेत असे तुमचे टार्गेट सेट होईल.

यूपीआय व्यवहार फायद्याचे

खिशामध्ये रोख पैसे असले की ते खर्च करताना आपल्याला खर्च कसा होतो अंदाज राहत नाही. पैसे खर्च केले की पुन्हा एटीएमने पैसे काढले जातात. यूपीआय माध्यमातून पैसे खर्च केल्यावर आपल्याला दरवेळी पैसे खर्च करताना आज दिवसभरात आपण किती वेळा पैसे खर्च केले आहेत ? ही जाणीव होते. ही गोष्ट पूर्णपणे मानसिक आहे, पण याचा उपयोग होतो यावर विश्वास ठेवा. महिना संपल्यावर बँकेचे जे खाते यूपीआयशी लिंक केले असेल त्यातील खर्च कुठे झाले ? याचा अंदाज घ्या. त्यामुळे तुमचे अनावश्यक खर्च किती होतात याचा तुम्हालाच अंदाज येईल.

रिकामा वेळ म्हणजे शॉपिंगचा छंद नाही

शनिवार-रविवारी कुटुंबासमवेत फिरायला जाताना तो वेळ मनोरंजन किंवा आनंद लुटण्याचा आहे हे लक्षात ठेवा. तरुण पिढीमध्ये शनिवार-रविवारी मॉलमध्ये जाऊन किंवा बाजारपेठेत जाऊन अनावश्यक वस्तूंची खरेदी करायची नवी क्रेझ आलेली दिसते, त्यापासून सावध राहण्याची गरज आहे. कपडे, इमिटेशन ज्वेलरी, गृहपयोगी वस्तू, सौंदर्य प्रसाधने, लहान मुलांसाठी खेळणी अशा आधीच घरात असलेल्या वस्तू खरोखर गरज नसताना परत विकत घेतल्या जातात व यामध्ये खूप पैसे खर्च होतात.

ऑनलाइन गेमिंगचे धोके ओळखा

सोशल मीडियावर जाहिरात बघून किंवा मित्रमंडळींच्या ओळखीतून ऑनलाइन गेम्स विषयी माहिती मिळवून अनेक तरुणांनी कष्टाने कमावलेला पैसा वाया घालवला आहे. अशा माध्यमातून पैसे कमावणे नैतिकदृष्ट्या योग्य किंवा अयोग्य ही चर्चा बाजूला ठेवू, पण अशी बेभरवशाची खर्चाची सवय व्यसनामध्ये परावर्तित होऊ शकते.

तुमच्या बजेटची तुमच्या कुटुंबाला माहिती असूद्या

घरातील सदस्य सतत काही ना काही वस्तूंची मागणी करतात व त्यांच्या प्रेमाखातर ती वस्तू विकत घेण्याकडे लोकांचा कल दिसतो. खरोखरच विशेषतः ज्यांच्या घरात लहान मुले आहेत त्यांना मनावर ताबा ठेवणे कठीण होऊन बसते आणि मग महिन्याच्या शेवटी अगदी स्वतःच्या औषध पाण्यासाठी सुद्धा पैसे शिल्लक राहत नाहीत अशी वेळ येते. आपल्याला दर महिन्याला किती पैसे मिळतात व आपण त्यातून किती पैसे खर्च करू शकतो ? हे तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन सांगा. त्याने तुमच्यावरील मानसिक ताण कमी होईल.

मोबाईल मधील शॉपिंग ॲप पासून सावध रहा

ट्रेनमधील प्रवासात, रिकाम्या वेळेत मोबाईलवरील ऑनलाइन ई-कॉमर्स अँप वर कुठल्या ऑफर सुरू आहेत? हे बघण्याचा काही जणांना छंद असतो व नेमकं एखाद्या दिवशी एखादं प्रॉडक्ट डिस्काउंट किंवा ऑफरमध्ये दिसलं तर मोह होतो म्हणून खरेदी केली जाते. किमान सहा महिने घरातल्या रोजच्या वापरातल्या वस्तू वगळता ऑनलाइन काहीही विकत घेणार नाही असा निश्चय केला तरीही ती एक चांगली सुरुवात ठरेल.

ईएमआय वर नक्की काय विकत घ्यावे?

अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य या आपल्या अत्यावश्यक गरजा आहेत, पण आजकाल उपलब्ध असलेल्या ईकॉमर्स आणि बँकांच्या क्रेडिट कार्डवर मिळणाऱ्या ई.एम.आय. सवलतीमुळे घरातील उपकरणे दर ठराविक वर्षांनी बदलण्याची काही कुटुंबांमध्ये सवय लागली आहे. आपल्या घरातील वस्तू जुन्या आहेत म्हणून त्या बदलायच्या ? का त्या खराब झाल्या आहेत म्हणून बदलायच्या ? याचा विचार करणे आवश्यक आहे.

उत्पन्नावर पहिला अधिकार कोणाचा ?

प्रत्येक कुटुंबात खर्च करण्यासाठी सगळेच पुढे सरसावतात. त्यामध्ये आपला इन्शुरन्सचा हप्ता आणि आपले दर महिन्याचे सेव्हिंग झाल्याशिवाय किती महत्त्वाची गरज वाटली तरीही खर्च करायचा नाही हा मनाचा निर्धार तरुणांनी करायला हवा.

ज्यांच्याकडे दर महिन्याला फिक्स उत्पन्न येत नाही यांच्यासाठी हे सर्वाधिक महत्त्वाचे आहे. कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने फ्रीलान्स पद्धतीने काम करणाऱ्या किंवा स्वतःचा व्यवसाय असणाऱ्या सर्वांनी हे लक्षात ठेवायला हवे.