Money Mantra स्वत:चे घर असणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते व सध्या सर्व बँका, हाऊसिंग फायनान्स कंपन्या गृह कर्ज (होम लोन ) प्राधान्याने देत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना होम लोन आता अगदी सहजपणे मिळत आहे. मात्र असे होम लोन घेताना बहुतेकांना यातील बारकावे माहीत असतातच असे नाही. आज आपण होम लोन घेताना होम सेव्हर लोन ही काय सुविधा आहे व तिचा नेमका काय फायदा होतो हे पाहू.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एसबीआय, आयडीबीआय, आयसीआयसीआय, अ‍ॅक्सिस , बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी यासारख्या व अन्य प्रमुख बँका होम लोन देताना ही सुविधा देतात. या योजने अंतर्गत होम लोन घेतले असता कर्जदार त्याच्याकडे तात्पुरत्या कालावधीसाठी उपलब्ध असलेली शिल्लक आपल्या कर्ज खात्यात जमा करू शकतो व त्यातील संपूर्ण किंवा काही रक्कम हवी तेव्हा परत काढू शकतो. जितक्या कालावधीसाठी जेवढी रक्कम कर्ज खात्यात जमा असेल तेवढ्या कालावधीसाठी तेवढी रक्कम कर्जावरील व्याज आकारणी करताना एकूण शिल्लक कर्ज रकमेतून कमी केली जाते. त्यामुळे कर्ज खात्यावरील व्याज आपण कमी करू शकतो कसे ते पुढील उदाहरणावरून लक्षात येईल.

हेही वाचा…Money Mantra – प्रश्न तुमचे, उत्तरे तज्ज्ञांची- क्रिटिकल केअर इन्शुरन्स पॉलिसी म्हणजे काय?

सामंत यांनी रु.७५ लाखांचे १५ वर्षे मुदतीचे होम लोन घेतले असून त्यासाठी ९% व्याजदर असून त्यानुसार येणारा इएमआय रु.७६ हजार ७० इतका आहे. त्यांनी होम सेव्हर लोन ही सुविधा घेतली आहे. त्यामुळे त्यांना हे कर्ज ओव्हरड्राफ्ट स्वरुपात दिले जाईल व सामंत यांना या महिन्यात शेतमालाच्या विक्रीतून रु.१० लाख मिळाले आहेत. मात्र ही रक्कम त्यांना पुढील तीन महिन्यानंतर लागणार आहे आणि त्यांनी ही रक्कम आपल्या होम सेव्हर लोन खात्यात जमा केली आहे. त्यामुळे पुढील तीन महिने त्यांच्या होम लोन खात्यावर होणारी व्याज आकारणी कर्ज खात्यावरील शिल्लक वजा रु.१० लाख इतक्या रकमेवर होईल.(सामंत रु.७६ हजार ७० चा इएमआय नियमित व स्वतंत्र भरत असल्याचे गृहीत धरून) जर इएमआय स्वतंत्र भरला नाही आणि रु.१० लाखांतून परस्पर वळता केला तर हप्ता वजा जाता रु.१० लाखांतील
उर्वरित रक्कम (पहिल्या महिन्यात रु. १०,००,०००- ७६,०७० =रु.९,२३,९३०) शिल्लक कर्ज रकमेतून वजा करून व्याज आकारणी केली जाईल.

हेही वाचा…Money Mantra: निवृत्तीनंतरच्या गरजांसाठी सिस्टिमॅटिक विड्रॉल प्लॅन (SWP) कसा वापरायचा ?

थोडक्यात, सामंत जेवढी शिल्लक, जेवढ्या कालावधीसाठी आपल्या होम सेव्हर खात्यात ठेवतील तेवढ्या प्रमाणात त्यांच्या होम लोनवर व्याज कमी आकारले जाईल. शिवाय अशी जमा केलेली रक्कम ते हवी तेव्हा, हवी तशी काढू शकतील. भविष्यातही त्यांना वेळोवेळी मिळणारी रक्कम आपल्या होम सेव्हर ओव्हर ड्राफ्ट खात्यात जमा करून गरजेनुसार काढता तर येईलच शिवाय यामुळे आपल्या होम लोन वरील व्याजही वाचविता येईल. ज्यांना आपला हप्ता नियमित भरता येईल शिवाय अधूनमधून बोनस, एक्स ग्रेशिया, शेतीचे किंवा अन्य साधनातून रक्कम मिळणार असेल आणि ती खर्चासाठी लगेचच लागणार नसेल अशासाठी ही सुविधा निश्चितच फायदेशीर आहे.

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is home saver loan how to take advantage of it mmdc psg
First published on: 09-05-2024 at 15:42 IST