Money Mantra प्रश्न : क्रिटिकल केअर इन्शुरन्स पॉलिसी म्हणजे काय ?

उत्तरः ही एक अशी इन्शुरन्स पॉलिसी आहे की, ज्यामुळे पॉलिसीधारकास काही विशिष्ट आजाराचे निदान झाल्यास पॉलिसी कव्हरची रक्कम विमाकंपनीकडून एकरकमी क्लेम म्हणून दिली जाते. ही पॉलिसी नेहमीच्या मेडिक्लेम पॉलिसीसोबत घेणे फायद्याचे ठरू शकते.

प्रश्न: क्रिटिकल केअर इन्शुरन्स पॉलिसी घेणे का आवश्यक आहे व तिचे फायदे काय?

उत्तरः बऱ्याचदा काही विशिष्ट आजारांमुळे आपल्याला नोकरी अथवा व्यवसाय काही काळ करता येत नाही. मात्र आपले नेहमीचे खर्च चालूच राहतात (उदा: कर्जाचे हप्ते, दैनंदिन घरखर्च , मुलांच्या शाळा- कॉलेजचा खर्च ) आपल्या मेडिक्लेम पॉलिसीमुळे हॉस्पिटल व अन्य अनुषंगिक झालेला खर्च किंवा पॉलिसी कव्हर या दोन्हीतील कमी असलेल्या रकमेपर्यंत क्लेम मिळतो. यातून आपले वर उल्लेखिलेले खर्च भागविता येत नाहीत. जर आपल्याकडे क्रिटिकल केअर इन्शुरन्स पॉलिसी असेल आणि अशा पॉलिसीत समाविष्ट असणाऱ्या गंभीर आजाराचे आपल्याला निदान झाले तर पॉलिसी कव्हर इतकी रक्कम एकमूठी मिळत असल्याने आपले वरील खर्च काही प्रमाणात भागविता येतात.

आणखी वाचा-Money Mantra: निवृत्तीनंतरच्या गरजांसाठी सिस्टिमॅटिक विड्रॉल प्लॅन (SWP) कसा वापरायचा ?

प्रश्न : क्रिटिकल केअर इन्शुरन्स पॉलिसीमध्ये कोणत्या विशिष्ट आजारांचा समावेश असतो?

उत्तरः या पॉलिसीत सुमारे ३५ ते ३६ आजारांचा समावेश असतो यातील काही प्रमुख आजार असे आहेत.
१) हृदय विकार (हार्ट अटॅक)
२) किडनी ट्रान्सप्लांट
३) पक्षाघात (पॅरालीसीस)
४) ब्रेन ट्युमर
५) कर्करोग
६) अंधत्व
आजार व त्यांचे स्वरूप यांवर मिळणारा क्लेम इन्शुरन्स कंपनीनुसार कमी- अधिक असू शकतो.

आणखी वाचा-Money Mantra: म्युच्युअल फंडाच्या युनिट्स विक्रीपश्चात होणारा भांडवली नफा व करदायीत्व

प्रश्न : क्रिटिकल केअर इन्शुरन्स पॉलिसीसाठी काही प्रतीक्षा कालावधी (वेटिंग पिरीयड) आहे का?

उत्तरः पॉलिसीधारकास पॉलिसीत समाविष्ट असणाऱ्या कोणत्याही आजाराचे निदान झाल्यास शक्य तितक्या लवकर इन्शुरन्स कंपनीस कळविणे आवश्यक असते. मात्र क्लेम मिळण्यासाठी निदान झाल्यापासून किमान ३० दिवस पॉलिसीधारक हयात असणे आवश्यक असते. हा कालावधी कंपनी व आजारानुसार कमी- अधिक असू शकतो.

प्रश्न : क्रिटिकल केअर इन्शुरन्स पॉलिसी कव्हर किती घ्यावे?

सर्वसाधारणपणे आपल्याला परवडणारा प्रीमियम, आनुवांशिक आजारांची शक्यता व अशा आजारांवर होणारा संभाव्य खर्च विचारात घेऊन त्यानुसार पॉलिसी कव्हर ठरवावे.