कोणत्याही लहान-मोठय़ा कार्यालयांमध्ये ह्युमन रिसोर्स किंवा मनुष्यबळ विकास विभाग हा असतोच. कर्मचारीवर्गाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी, त्यांच्या सकारात्मक शक्तींचा व्यवस्थापनाच्या लाभासाठी जास्तीत जास्त उपयोग करून घेण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन करणे हे मनुष्यबळ विकास विभागाचे प्रमुख काम असते.
प्रगतीच्या अनेक आकर्षक आणि लाभदायक संधी उपलब्ध करून देणाऱ्या मनुष्यबळ विकास क्षेत्राकडे सध्या होतकरू युवावर्गाचा ओढा अधिक असलेला दिसतो. करिअर अभ्यासकांच्या मते, नजीकच्या भविष्यात या क्षेत्रातील नोकरीच्या संधींत आणि या नोकऱ्यांतून होणाऱ्या आíथक प्राप्तीत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे.
तुमचे शिक्षण, अनुभव या गोष्टी जर मानव संसाधन विकास क्षेत्रासाठी पूरक असतील तर हे क्षेत्र प्रगतीसाठी निवडायला काहीच हरकत नाही. कारण सध्याच्याच नव्हे तर आगामी १०-२० वष्रे नोकरीच्या व आमदनीच्या दृष्टीनेही या क्षेत्रातील चित्र आशादायक आहे.
पूर्णत: व्यावसायिक स्वरूपाच्या या क्षेत्रात जर अव्वल स्थानावर विराजमान व्हायचे असेल तर माहितीची गुप्तता, कामातील एकाग्रता, सुसूत्रता, परस्पर व्यवहारातील सामंजस्य, वित्त व लेखा विषयक ज्ञान, तुम्ही ज्या संस्थेसाठी किंवा कंपनीसाठी काम करत आहात त्यासंबंधी सखोल माहिती या बाबी महत्त्वाच्या ठरतात.   
या कार्यक्षेत्रात उत्तम जनसंपर्क महत्त्वाचा असतो. या  उद्योगक्षेत्राच्या गरजा वर्षांगणिक बदलत असतात. कर्मचाऱ्यांचा सर्वागीण विकास, उत्तम कर्मचाऱ्यांना टिकवून ठेवणे, कामाच्या ठिकाणाचे कार्य पर्यावरण उत्साहवर्धक, व प्रेरणादायी ठेवणे या सर्व गोष्टी या करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी कळीच्या ठरतात.
आजच्या घडीला मनुष्यबळ विकास विभागात काम करणाऱ्या व्यक्तीकडे या क्षेत्रातील शिक्षणाची रीतसर पदवी असणे गरजेचे आहे. ह्युमन रिसोर्स विषयातील पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना नोकरीत प्राधान्यक्रम मिळतो. उत्तम नोकरी आणि भरपूर वेतनाची महत्त्वाकांक्षा पूर्ण करायची असेल तर पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षणाला पर्याय नाही. या क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी किमान पदवी शिक्षण जरुरीचे असले तरी त्याव्यतिरिक्त उत्तम जनसंपर्क, संवादकौशल्य, व्यावसायिक मूल्यांची जपणूक, व्यवहार चतुरता या गोष्टीही  आवश्यक ठरतात.
एच.आर. क्षेत्रात प्रमाणपत्र अभ्यासक्रमापासून ते पदव्युत्तर पदवी किंवा डॉक्टरेट डीग्रीपर्यंत शिक्षणाचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. अशा उच्चशिक्षित व्यक्ती बऱ्याचदा अध्यापन वा प्रशिक्षण क्षेत्रात कार्यरत असतात.
ह्युमन रिसोर्स पदवी अभ्यासक्रमांतून मुख्यत्वेकरून कामगार अनुपातावर नियंत्रण, कर्मचारीवर्गाचे समाधान व अन्य व्यवस्थापकीय विषय शिकवले जातात.
एच.आर. क्षेत्रात स्वत:चा अनुभव व कार्यनिपुणतेच्या जोरावर आपण स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण करू शकतो तसेच मनुष्यबळ विकास क्षेत्रात उत्तम व्यावसायिकही बनू शकतो.
या उद्योगक्षेत्रात कामाचा अनुभव आणि कामातील डावपेच समजून घ्यायचे असतील तर त्यासाठी रीतसर शिक्षण घेऊन स्वत:ला पात्र बनवणे महत्त्वाचे ठरते. यासाठी काही वेळा कॉर्पोरेट शिक्षणाच्या एक-दोन दिवसांच्या कार्यशाळाही लाभदायक ठरू शकतात.  
मनुष्यबळ विकास क्षेत्रातील स्वत:च्या क्षमता  दुणावण्यासाठी याच कार्यक्षेत्रातील भरपाई, लाभ, वर्कफोर्स प्लािनग अशा संदर्भातील विशेष अभ्यासक्रम पूर्ण करता येतात. ज्ञानात भर, व्यावसायिक गुणवत्ता, कामातील नेमकेपणा या सर्वच गोष्टी अभ्यासक्रमातून साध्य होण्यास मदत होते.
एच.आर. क्षेत्रात काम करताना जर नवनवीन तंत्रांचा स्वत:च्या कार्यपद्धतीत वापर केला तर साहजिकच कार्यक्षमता वधारते आणि कामाचा दर्जा सुधारतो. मात्र यासाठी सातत्याने नवनवीन संकल्पना शिकणे आणि अमलात आणणे गरजेचे आहे.
एच.आर. क्षेत्राचा आवाका खूप मोठा आहे. त्यात अनेक बाबी सामावलेल्या आहेत. उदा. कंपनीत कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे अथवा कामावरून कमी करणे, कामाचे वातावरण उत्साहवर्धक पण काम करण्यास उद्युक्त ठरेल असे राखणे, दुसऱ्या कोणत्याही कंपनीशी विलीनीकरण झाल्यानंतर दोन्ही ठिकाणच्या कर्मचाऱ्यांची कामांच्या दृष्टिकोनातून व्यवस्था लावणे, कामाच्या ठिकाणी सुसंवादाचे वातावरण राखणे, कर्मचाऱ्यांमधील वाद मिटवणे, कंपनी व कर्मचारी दोघांनाही फायदेशीर ठरतील अशा कल्याणकारी योजना राबवणे, मुख्य म्हणजे हे सर्व कायद्याच्या व सरकारी नियमांच्या चौकटीत बसवणे, कर्मचाऱ्यांच्या कामाचे मूल्यमापन करणे इत्यादी. एकंदरीत या क्षेत्राची कार्यप्रणाली कर्मचारी/कामगार व व्यवस्थापन यांच्यातील परस्पर संबंधांशी निगडित असते.  
सध्याच्या काळात एच.आर. क्षेत्राची ध्येयधोरणे रुंदावली आहेत. उपलब्ध मनुष्यबळ अधिक परिणामकारकरीत्या उपयोगात यावे यासाठी कामांची आखणी केली जाते. कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवणारे, कामाची क्षमता वाढवणारे वातावरण निर्माण केले जाते. या सर्वामुळे उत्पादनक्षमता वाढून कामगार, व्यवस्थापन व भागधारक या सर्वानाच त्याचा लाभ होतो. या क्षेत्रात काम करताना पेलाव्या लागणाऱ्या जबाबदाऱ्यांचे स्वरूप कंपनीच्या आकारावर अवलंबून असते. लहान कंपन्यांतून अनेक प्रकारची कामे अंगावर घ्यावी लागतात, तर मोठय़ा कंपन्यांमध्ये कामाची विभागणी केली जाते. त्यात एच.आर. विषयक व्यवस्थापकीय कामे व प्रत्यक्ष कामगार/ कर्मचाऱ्यांशी निगडित दैनंदिन कामे अशी वाटणी केली जाते. तर काही मध्यम आकाराच्या कंपन्यांतून एच.आर. विषयक कामे बाहेरील संस्थांकडून करून घेतली जातात.
एच.आर. क्षेत्रात नोकरी करणाऱ्या व्यक्ती व्यवस्थापन आणि कर्मचारी यांच्यात सामंजस्य  राखण्याचे काम करतात. कंपनीतील कर्मचारीवर्गाला आíथक सुरक्षेचा दिलासा देण्याची जबाबदारी या विभागाला पार पाडावी लागते. गरजेनुसार आवश्यक पात्रतेच्या कर्मचारीवर्गाची नेमणूक करावी लागते.
या क्षेत्रात काम करण्यासाठी फक्त व्यक्ती जोडण्याची  वृत्ती उपयोगी नाही, तर पुरेसे व्यवहार ज्ञान, विश्लेषक विचारसरणी आणि एकाच वेळी अनेक कामे हातावेगळी करण्याची हातोटी असणे जरुरीचे आहे.
एच.आर. क्षेत्रात उमेदवारीच्या काळात सहायक पदाची नोकरी  मिळवण्यासाठी या विषयांतील पदवीपर्यंतचे शिक्षण पुरेसे ठरते. मात्र, व्यवस्थापकपदासाठी एम.बी.ए. किंवा एम.एच.आर.एम. (मास्टर्स ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट) या पदव्या आवश्यक असतात.
मनुष्यबळ विकास क्षेत्राचे बहुशाखीय स्वरूप पाहता बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन, पब्लिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशन,  सायकॉलोजी, सोशिओलॉजी, पोलिटीकल सायन्स, इकोनॉमिक्स आणि स्टॅटिस्टिक्स या विषयांचा अभ्यासही उपयोगी ठरू शकतो. पण जर एका विशिष्ट विषयात प्रावीण्य मिळवायचे असेल तर मात्र फायनान्स, लेबर रिलेशन्स, लेबर लॉ, लेबर इकॉनॉमिक्स, लेबर हिस्ट्री यांमध्ये शिक्षण घेणे उत्तम.
या कार्यक्षेत्रात काम करताना वरील शिक्षणाबरोबरच खालील स्वभाववैशिष्टय़े आत्मसात करणे उपयुक्त ठरते- चिकित्सक व विश्लेषणात्मक विचारसरणी, उत्तम वक्तृत्व व लेखन कौशल्य, विचारातील व्यावसायिक दृष्टिकोन, सर्वसमावेशक वृत्ती, निर्णयक्षमता.
एच.आर. क्षेत्रात भविष्यातील प्रगतीचे चित्र  आशादायक आहे. सध्या कॉम्प्युटर व डाटा प्रोसेसिंग सव्‍‌र्हिसेस, हेल्थ केअर आणि रुग्णालये या क्षेत्रांत एचआरसंबंधित नोकरीच्या संधी अधिक प्रमाणात उपलब्ध आहेत.
या कार्यक्षेत्रातील काही महत्त्वाची पदे व त्यांची कामे –
० एच.आर. जर्नलिस्ट : लहान कंपन्या कर्मचाऱ्यांची निवड, कामाचे प्रशिक्षण, व्यवस्थापनाला कायदेविषयक सल्ला वगरे कामांसाठी या प्रकारच्या व्यक्तींची तात्पुरत्या स्वरूपाची नेमणूक करतात. यासाठी एच.आर. विषयक र्सवकष ज्ञान असणे गरजेचे आहे.
० एच.आर मॅनेजमेन्ट : मोठय़ा कंपन्यांच्या एच.आर विभागातून डायरेक्टर ह्युमन रिसोर्स या पदावरील व्यक्ती कर्मचारी संदर्भातील कोणत्याही निर्णयासाठी उत्तरदायी असते.
० कॉम्पेन्सेशन मॅनेजर : कर्मचाऱ्यांचा पगार, त्यांच्या कामाचे मूल्यमापन, प्रस्तुत कंपनीत देण्यात येणाऱ्या पगाराची इतर समकक्ष कंपन्यांशी तुलना करून पाहणे, बाबी कायद्याच्या व सरकारी नियमांच्या चौकटीत बसवणे आदी गोष्टी या व्यक्तीकडून अपेक्षित असतात. यासाठी आíथक नियोजनाचे सखोल ज्ञान आवश्यक असते.
० एम्प्लॉयमेंट बेनिफिट मॅनेजर : उत्तम पगार, चांगली मिळकत देणारी भविष्य निर्वाह योजना, लाभदायी विमा योजना या सर्वच गोष्टी कोणत्याही कंपनीतील कर्मचाऱ्यांना आकर्षति करत असतात. परंतु कंपनीला होणाऱ्या  निव्वळ नफ्यावर या कर्मचारीहिताच्या योजनांमुळे अतिरिक्त ताण न आणता त्यांची यशस्वी अंमलबजावणी करण्याचे कसब या पदावरील व्यक्तीकडे असावे लागते. त्याचबरोबर कायद्याच्या बदलत्या तरतुदीविषयी माहिती बाळगणेही  गरजेचे ठरते.
० रिक्रुटर्स : या प्रकारचे काम करणाऱ्या व्यक्ती कंपनीतील किंवा कंपनीबाहेरीलही असू शकतात. हे रिक्रुटर्स एका विशिष्ट विषयात पारंगत असतात. उदा. कॅम्पस इंटरव्ह्य़ूू वगरे. रिक्रुटर्सचे काम करणाऱ्या व्यक्तींना आवश्यक क्षमतेच्या उमेदवारांना निरनिराळ्या माध्यमांचा उपयोग करून हेरण्याचे कौशल्य असावे लागते. इच्छुक उमेदवारांशी बोलून, त्यांची तोंडी चाचणी घेऊन, संबंधित उमेदवार निवडण्याजोगा आहे किंवा नाही हा निर्णय घ्यावा लागतो.
० प्रशिक्षक : अनेक मोठय़ा कंपन्यांतून, कर्मचारी प्रशिक्षण वर्गावर देखरेख करण्यासाठी या प्रकारच्या व्यक्तींची नेमणूक केली जाते. या अंतर्गत नवीन कर्मचाऱ्यांना कामाचे, व्यावसायिक कौशल्यांचे प्रशिक्षण देणे या कामांचा समावेश होतो. काही वेळा कर्मचारी व वरिष्ठ यातील सुसंवादासाठी, वरिष्ठ पदांवरील कर्मचाऱ्यांनाही मार्गदर्शन केले जाते.
० एच. आर. कन्सल्टन्ट : या प्रकारच्या व्यक्ती किंवा संस्था ग्राहकांना कर्मचारी व व्यवस्थापनाचे संबंध, कर्मचारी प्रशिक्षण वगरे संदर्भात समुपदेशन करतात.
० आउटप्लेसमेंट स्पेशालिस्ट : आस्थापानांतून अशा प्रकारच्या हुद्यावरील व्यक्ती, ज्या कर्मचाऱ्यांना विविध कारणांसाठी कामावरून कमी केले आहे अशा लोकांना पुढील करिअर संधीविषयी मार्गदर्शन करतात.
या क्षेत्रात शिक्षण आणि अनुभव घेतलेल्या व्यक्तींना खासगी, सरकारी, बँक्स, एम्प्लॉयमेन्ट ब्युरो, पर्सनल एजन्सीज, एज्युकेशनल इन्स्टिटय़ूट्स, औद्योगिक कारखाने आदी ठिकाणी नोकरीच्या संधी सहज उपलब्ध होऊ शकतात.                      
 
अनुवाद : गीता सोनी  

Mahindra XUV700 Diesel 7Seater launch
मारुती, टाटा अन् ह्युंदाईला फुटला घाम, महिंद्राची ५ सीटर कार आता ७ सीटर पर्यायात पाच रंगात देशात दाखल, किंमत…
shivar lokarang article, shivar loksatta
शिवाराच्या दयनीय अवस्थेचे चित्र…
Upsc ची तयारी: अर्थव्यवस्था : भारतातील बेरोजगारीचे अंत:प्रवाह
New policy, MHADA, MHADA officers,
म्हाडा अधिकारी, कर्मचाऱ्यांची मक्तेदारी संपविण्यासाठी नवे धोरण