श्रीकांत जाधव

सर्वसाधारणपणे आधुनिक भारताच्या इतिहासाची सुरुवात १८ व्या शतकाच्या सुरुवातीपासून होते, असे मानले जाते. प्रस्तुत लेखामध्ये १८ व्या आणि १९ व्या शतकाच्या मध्यापर्यंत म्हणजेच १८५७ पर्यंतच्या आधुनिक भारताच्या इतिहासावर मागील परीक्षेत विचारण्यात आलेल्या प्रश्नांचे स्वरूप कसे होते आणि यासाठी लागणारा आकलनात्मक दृष्टिकोन याचा आढावा घेणार आहोत. २०२० मधील मुख्य परीक्षेमध्ये १८ व्या आणि १९ व्या शतकातील घटनांवर प्रश्न विचारण्यात आलेले नाहीत. खाली देण्यात आलेले काही प्रश्न हे २०१३ ते १९ मध्ये झालेल्या मुख्य परीक्षेतील आहेत. तुलनेने आधुनिक भारताच्या या कालखंडावर कमी प्रश्न विचारले जातात.

कोणत्या कारणामुळे ब्रिटिशांनी भारतातून करारबद्ध कामगार त्यांच्या इतर वसाहतीमध्ये आणलेले होते? ते त्यांची सांस्कृतिक ओळख तेथे जतन करू शकले का? या प्रश्नाचे योग्य आकलन करण्यासाठी ब्रिटिशांच्या वसाहतीचे स्वरूप माहिती असणे गरजेचे आहे. ब्रिटिशांच्या वसाहती या मुख्यत्वे व्यापारवाढीच्या माध्यमातून अस्तित्वात आलेल्या होत्या आणि पुढे जाऊन यातूनच ब्रिटिश साम्राज्यवादाची सुरुवात झालेली होती. अशातच १८ व्या शतकाच्या मध्यामध्ये ब्रिटनमध्ये औद्योगिक क्रांती सुरू झालेली होती. तसेच यापूर्वीच ब्रिटिशांनी आफ्रिका, आशिया आणि अमेरिका खंडामध्ये वसाहती स्थापन केलेल्या होत्या. या वसाहतींमध्ये भारतातून त्यांनी कामासाठी आणलेले कामगार होते. या वसाहती ब्रिटनमधील औद्योगिक क्षेत्रासाठी लागणारा कच्चा माल निर्यात करत असत. अशा पद्धतीने या प्रश्नाची उकल करून घेऊन उदाहरणासह हे कामगार तेथील वसाहतीमध्ये स्वत:ची सांस्कृतिक ओळख जतन करू शकले का, याचे विश्लेषण उत्तरामध्ये द्यावे लागते.

एकोणिसाव्या शतकातील भारतीय प्रबोधन आणि राष्ट्रीय ओळख याचा उदय यामधील दुवे (linkages) याचे परीक्षण करा. या प्रश्नाचे आकलन करताना भारतीय प्रबोधन याचा थोडक्यात परामर्श देऊन १९ व्या शतकाच्या मध्यानंतर भारतीयांमध्ये राष्ट्रीयत्वाची जाणीव निर्माण होण्याची सुरुवात झालेली होती. यातूनच भारतीय राष्ट्रवादाचा उदय झाला. यामुळे भारतीयांना एक राष्ट्रीय ओळख मिळालेली होती व यामध्ये भारतीय प्रबोधनाची महत्त्वाची भूमिका होती. म्हणून भारतीय प्रबोधन आणि राष्ट्रीय ओळख याचा उदय यामधील दुवे अधोरखित करून परीक्षण करणे उत्तरामध्ये अपेक्षित आहे.

‘स्पष्ट करा की अठराव्या शतकाच्या मध्यातील भारतातील राजकीय व्यवस्था विखंडीत छायेने कशा प्रकारे घेरलेली होती.’ या प्रश्नाचे योग्य आकलन होण्यासाठी १८ व्या शतकातील राजकीय सत्ता समीकरणे कशी होती याची माहिती असणे गरजेचे आहे. १७०७ मध्ये औरंगजेबाचा मृत्यू झालेला होता. इथून पुढे मुघल साम्राज्याच्या ऱ्हासाची सुरुवात झालेली होती. मुघल साम्राज्यात कार्यरत असणाऱ्या सुभेदारांनी स्वत:च्या स्वायत्त सत्ता बंगाल, हैदराबाद आणि अवध या प्रांतांमध्ये स्थापन केलेल्या होत्या. याचबरोबर मराठा सत्तेचे पेशवे यांच्या अधिपत्याखाली पुनरुज्जीवन झालेले होते. एक प्रबळ राजकीय सत्ता म्हणून तिचा उदय झालेला होता. दक्षिणेत म्हैसूर हैदर अलीच्या नेतृत्वाखाली राजकीय सत्ता बनलेली होती. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने स्वत:ला राजकीय प्रतिस्पर्धी म्हणून प्रस्थापित करण्यास प्रारंभ केलेला होता. इ. महत्त्वाच्या घडामोडींचा उत्तरामध्ये परामर्श देऊन १८ व्या शतकाच्या मध्यातील भारतातील राजकीय व्यवस्था विखंडित छायेने कशा प्रकारे घेरलेली होती, हे स्पष्ट करावे लागते.

‘१७६१ मध्ये पानिपतची तिसरी लढाई झाली. पानिपत येथेच अनेक साम्राज्यांना धक्का देणाऱ्या लढाया का झाल्या?’ हा प्रश्न एका विशिष्ट ठिकाणाचा संदर्भ देऊन विचारण्यात आलेला आहे आणि याचे आकलन करताना आपल्याला १५२६ मध्ये झालेल्या पानिपतच्या पहिल्या लढाईचा संदर्भ लक्षात घेऊन हे स्थान व्यूहात्मकदृष्टय़ा कसे महत्त्वाचे होते, या अनुषंगाने उत्तर लिहावे लागते.

‘स्पष्ट करा की १८५७ चा उठाव हा वसाहतिक भारतातील ब्रिटिश धोरणाच्या विकासातील महत्त्वाची घटना होती.’  या प्रश्नाचे योग्य आकलन होण्यासाठी कंपनी काळातील ब्रिटिश धोरणांची मूलभूत माहिती असणे गरजेचे आहे. कारण १८५७ च्या उठावानंतर जे काही बदल करण्यात आले होते याला कंपनी काळात राबविण्यात आलेली ब्रिटिश धोरणे कारणीभूत होती आणि उत्तर लिहिताना या धोरणाचा उत्तरामध्ये दाखला देऊनच उत्तर लिहावे लागते. १८५७ च्या उठावाचे महत्त्व नमूद करावे लागते.

उपरोक्त प्रश्नांच्या विश्लेषणावरून आपणाला या घटकाची तयारी कशी करावी, याची एक सुस्पष्ट दिशा मिळते. थोडक्यात या प्रश्नावरून असे दिसून येते की या विषयाचे सखोल आणि सर्वागीण आकलन असणे आवश्यक आहे. या घटकाचा मूलभूत अभ्यास करण्यासाठी बिपिनचंद्र लिखित ‘आधुनिक भारत’ हे जुने एनसीईआरटीचे पुस्तक सर्वप्रथम अभ्यासणे गरजेचे आहे. त्यानंतर या घटकाचा सखोल अभ्यास करण्यासाठी बी.एल. ग्रोवर लिखित ‘आधुनिक भारताचा इतिहास’ आणि शेखर बंडोपाध्याय लिखित ‘प्लासी टू पार्टिशन’ या संदर्भग्रंथांचा उपयोग होतो.