जपान म्हटले की पर्यटकांच्या डोळ्यांपुढे येणाऱ्या गोष्टी म्हणजे फुजी पर्वत, अनेक सुंदर सुंदर देवळे आणि वसंत ऋतूत बहरणारी चेरीची फुले. शिंतो आणि बौद्ध धर्माच्या या देशात शिंतो आणि बौद्ध मंदिरे सर्वत्र आढळतात आणि त्यांचे निरनिराळे सण वर्षभर सुरू असतात. टोकियो आणि ओसाकासारख्या मोठय़ा शहरांमध्ये अशा प्रकारचे सण अनेक विदेशी पर्यटकांनाही आकर्षित करतात. मात्र, सर्वसाधारणपणे पर्यटकांची पावले सहसा न फिरकणारी, ‘जरा हटके’ असलेली ठिकाणे आणि त्या ठिकाणचे विशिष्ट सणही जपानमध्ये अनेक आहेत. त्यातलीच एक जागा म्हणजे आओमोरी प्रांतातला ओसोरे पर्वत आणि दरवर्षी तिथे होणारा ‘इताको महोत्सव’!जपानच्या पारंपरिक, निसर्गपूजक शिंतो धर्मात निसर्गातील अनेक जागा पवित्र मानल्या गेल्या आहेत. पर्वतही त्याला अपवाद नाहीत. जपानच्या तीन सर्वात पवित्र पर्वतांपैकी एक म्हणजे हा ओसोरे पर्वत. त्याला कारणही तसेच आहे. जपानी भाषेत ‘ओसोरेझान’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या पर्वताच्या नावाचा शब्दश: अर्थ आहे- ‘भीतीचा पर्वत’ किंवा ‘भयगिरी’!  हा पर्वत जपानमध्ये नरकाचे प्रवेशद्वार मानण्यात येतो.होन्शू बेटाच्या उत्तर टोकाशी असलेल्या शिमोकिता द्वीपकल्पातला हा पर्वत जागृत ज्वालामुखी आहे. सर्वत्र करडय़ा रंगाचे खडक, खदखदणाऱ्या लाव्हारसाचे खड्डे आणि त्यातून येणाऱ्या सल्फरच्या वाफा बघून शेकडो वर्षांपासून जपानी लोकांना हा ‘भयगिरी’ नरकाचे प्रवेशद्वार वाटला यात नवल नाही. या पर्वताजवळच्या उसोरी सरोवरातून एक नदी उगम पावते आणि होन्शू बेटाच्या उत्तरेच्या त्सुगारू सामुद्रधुनीला जाऊन मिळते.बौद्ध धर्माच्या समजुतीप्रमाणे मरणानंतर मानवी आत्मा इहलोक सोडून मृत्युलोकात जातो. पण त्यासाठी त्याला सान्झू (त्रिपार) ही नदी ओलांडावी लागते. जिवंतपणी त्या व्यक्तीने जसे आयुष्य जगलेले असेल त्यावरून मृतात्म्याला नदी कशा प्रकारे पार करावी लागेल, हे ठरते. सद्गुणी व्यक्तीचा आत्मा विनासायास पुलावरून चालत नदी ओलांडतो. तितक्याशा सद्गुणी नसलेल्या व्यक्तीचा आत्मा नदीच्या उथळ भागातून चालत नदी पार करतो. पण दुर्गुणी व्यक्तीच्या आत्म्याला मात्र विषारी सर्प आणि दैत्यांनी भरलेल्या नदीच्या मुख्य पात्रातून चालत जावे लागते.उसोरी सरोवरातून निघणारी ही नदी म्हणजेच मृतात्म्यांना पार करावी लागणारी सान्झू नदी अशी जपानी लोकांची समजूत आहे. उसोरी सरोवराजवळ या नदीवर एक पूल आहे आणि सद्गुणी लोकांचे मृतात्मे हाच पूल ओलांडून मृत्युलोकात जातात अशी त्यांची धारणा आहे.जपानच्या आदिवासी ऐनू लोकांच्या भाषेत या सरोवराचे नाव ‘उशोरो’ (खड्डयाची जागा) असे होते आणि त्याचेच पुढे ‘उसोरी’ असे रूपांतर झाले. ओसोरे पर्वत आणि उसोरी सरोवराच्या परिसरात सर्वत्र सल्फरचा तीव्र दर्प जाणवतो. उसोरी सरोवराच्या विषारी पाण्यामुळे माशाची एक जात वगळता सर्व जलसृष्टी केव्हाच संपुष्टात आलेली आहे. कीटकांचे आवाजही कुठेच ऐकू येत नाहीत. सर्वत्र जाणवते ती भयाण, नि:शब्द शांतता. परंतु वाऱ्याचे घोंघावणे आणि या भागात आढळणाऱ्या काळ्या कावळ्यांची कावकाव मात्र इथे अविरत चालू असते. नरक म्हणून अगदी शोभेल अशीच जागा आहे ही!बौद्ध धर्मात सांगितलेल्या नरकाची आठवण करून देणारी ही जागा पाहून इ. स. ८६२ मध्ये एन्निन या बौद्ध भिक्षूने ओसोरे पर्वताजवळ ‘बोदाईजी’ नावाचे बौद्ध मंदिर बांधले. हे मंदिर ‘क्षितिगर्भ’ या बोधीसत्त्वाला वाहिलेले आहे. क्षितिगर्भाचे जपानी नाव ‘जिझो बोसात्सू’! ‘नरकाचा बोधिसत्त्व’ असलेला जिझो हा लहान मुलांचा रक्षक आहे, तसाच तो मरण पावलेल्या मुलांचा आणि गर्भपात झालेल्या भ्रृणांचा रक्षक देवही आहे. ओसोरे पर्वताच्या परिसरात ‘जिझो’चे अनेक दगडी पुतळे आढळून येतात.दरवर्षी जुलै महिन्यात होणारा ‘इताको महोत्सव’ ओसोरे पर्वताला भेट देणाऱ्यांचे खास आकर्षण आहे. जपानी भाषेत ‘इताको’ म्हणजे जोगीण. जपानच्या उत्तर भागातील या पारंपरिक वृद्ध जोगिणी बहुतेक वेळा अंध असतात. आपल्या आध्यात्मिक शक्तीमुळे त्या मृतात्म्यांशी संपर्क साधू शकतात अशी जपानमध्ये समजूत आहे. तसेच दुष्ट शक्तींनी झपाटलेल्या लोकांना त्यांच्या कचाटय़ातून सोडवण्याचे सामथ्र्यही त्यांच्या अंगी असते अशीही लोकसमजूत आहे. दिवसेंदिवस इताकोंची संख्या कमी होत असली तरी ही परंपरा जपानमध्ये आजही टिकून आहे. ‘इताको’ बनण्यासाठी अंध मुलींना अत्यंत खडतर प्रशिक्षणाच्या दिव्यातून जावे लागते. वयाच्या बाराव्या वर्षांपासूनच या प्रशिक्षणाला सुरुवात होते. भल्या पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या या प्रशिक्षणात मुख्यत: बौद्ध ग्रंथांचे पाठांतर आणि आत्यंतिक शारीरिक कष्टांद्वारे मानसिक शक्तीचा विकास या दोन गोष्टींचा समावेश असतो. कमीत कमी अन्नावर दिवस काढणे, रात्रीची झोप जवळजवळ वज्र्य करणे, हिवाळ्यातल्या कडाक्याच्या थंडीत बर्फासारख्या थंडगार पाण्याच्या बादल्यांमागून बादल्या अंगावर ओतणे- अशा कठोर गोष्टींतून त्यांची मानसिक आणि आध्यात्मिक शक्ती ‘घडवली’ जाते. अखेर ‘समाधी’ अवस्थेत गेल्यावर त्यांचे प्रशिक्षण पूर्ण होते आणि आता त्या मृतात्म्यांशी संपर्क साधू शकणाऱ्या ‘इताको’ जोगिणी बनतात.  दरवर्षी २० ते २४ जुलै हे पाच दिवस ओसोरे पर्वताजवळच्या बोदाईजी मंदिराच्या परिसरात ‘इताको महोत्सव’ भरतो. आसपासच्या भागातल्या ‘इताको’ येऊन आपले तात्पुरते तंबू ठोकतात. या दिवसांत आपल्या मृत नातेवाईकांशी, मित्रांशी किंवा अन्य व्यक्तींशी ‘संपर्क’ साधू इच्छिणाऱ्या लोकांची तिथे रीघ लागलेली असते. तीन-चार निरनिराळ्या इताकोंमार्फत आपल्या इष्ट व्यक्तीशी संपर्क साधू पाहणारे लोकही असतात. मृत व्यक्तीबद्दल काही प्रश्न विचारल्यानंतर (मृत्यू कधी आला, कसा आला, इत्यादी.) इताको तो मृतात्मा कोणत्या प्रकारचा आहे हे ठरवते आणि दहा-पंधरा मिनिटे काही विशिष्ट मंत्रांचा भराभर उच्चार करते. या कालावधीत तिचा त्या मृतात्म्याशी ‘संपर्क’ प्रस्थापित होतो आणि त्यांचे संदेश तिला मिळतात असे लोक मानतात. इताको महोत्सवातील हा प्रकार ‘इताको नो कुचियोसे’ (‘जोगिणीच्या मुखाद्वारे’) या नावाने ओळखला जातो.आज जपान हे विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जागतिक स्तरावर नाव कमावलेले राष्ट्र आहे. अशा देशामध्ये एकविसाव्या शतकातही जोगिणींच्या महोत्सवासारखे सण साजरे होत असतील अशी बहुतेक परदेशी लोकांना कल्पनाही नसते. पण आधुनिकता आणि पारंपरिकता या दोन्ही गोष्टींचे काहीसे विचित्र मिश्रण हीच जपानची खरी ओळख आहे. एकीकडे जगभर यंत्रमानव आणि मोटारी निर्यात करणारा जपान आपल्या शेकडो वर्षांपूर्वीच्या धारणा आणि परंपरांना कसा घट्ट धरून आहे याचे सर्वोत्तम उदाहरण बघायचे असेल तर उत्तर जपानमधील या नरकाच्या प्रवेशद्वाराला- ‘भयगिरी’ला एकदा आवर्जून भेट द्या!
nissimb@hotmail.com