फारुक नाईकवाडे

जगभरात होणारे भूकमुक्तीसाठीचे प्रयत्न आणि प्रत्यक्षात भुकेच्या समस्येचे वास्तव मांडणारा अहवाल यांबाबत मागील लेखामध्ये चर्चा करण्यात आली. या लेखामध्ये भूक आणि पोषण याबाबतच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि त्याबाबतचे विश्लेषण याबाबत चर्चा करण्यात येत आहे.

जागतिक भूक निर्देशांकाची गणना

या निर्देशांकाची गणना तीन आयामांमधील चार निर्देशकांच्या आधारे करण्यात येते.

वरील सर्व बाबींचा अन्न सुरक्षा, आर्थिक विकास, सामाजिक विकास, आरोग्य, चालू घडामोडी अशा अनेक ठिकाणी संदर्भ येतो. त्यामुळे या संकल्पना व्यवस्थित समजून घेणे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.

* भूक

भूक निर्देशांकामध्ये केवळ कॅलरी हा निकष न ठेवता पोषण हा निकष घेऊन भुकेचे मापन केलेले दिसून येते. मात्र बहुतांश वेळी ही संकल्पना अपुऱ्या कॅलरीशी संबंधित असल्याचे समजले जाते व त्याप्रमाणे तिचे मापन केले जाते. उपासमार, कुपोषण इत्यादी संकल्पना बारकाईने समजून घेणे यासाठी महत्त्वाचे आहे.

* उपासमार (Food Deprivation) किंवा न्यून पोषण (Undernourishment)

संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संघटनेच्या व्याख्येनुसार व्यक्तीला आरोग्यपूर्ण जीवन जगण्यासाठी तिच्या वय, लिंग, बांधा आणि शारीरिक श्रमांच्या मानाने आवश्यक असलेल्या कॅलरींच्या तुलनेत अत्यंत कमी कॅलरींचा आहार म्हणजे उपासमार (Food Deprivation) किंवा न्यून पोषण (Undernourishment) ठरते.

* अवपोषण

अवपोषण ही संकल्पना न्यून पोषणापेक्षा जास्त विस्तृत आहे. यामध्ये केवळ कॅलरींचाच नाही तर आवश्यक ऊर्जा, प्रथिने, व्हिटॅमिन्स आणि खनिजे यांचाही विचार करण्यात येतो. आहाराचा अपुरा पुरवठा आणि त्यापासून मिळाणाऱ्या पोषणाचे कमी प्रमाण यामुळे अवपोषणाची समस्या उद्भवते. त्यामुळे बालकांमध्ये उंचीच्या मानाने कमी वजन (Wasting) किंवा वयाच्या मानाने कमी उंची (Stunting) तसेच वयाच्या मानाने कमी वजन (Underweight) अशा प्रकारच्या समस्या दिसून येतात.

* अतिपोषण

>   यामध्ये शरीराच्या आवश्यकतेपेक्षा जास्त कॅलरींचे सेवन करणे किंवा आहार संतुलित नसणे किंवा सूक्ष्म पोषक द्रव्ययुक्त आहार न घेणे यातील एक किंवा जास्त बाबी समाविष्ट होतात. याच्या परिणामी उंचीच्या मानाने वजन खूप जास्त (Overweight, Obesity) होते.

>   एखाद्या व्यक्तीच्या उंचीशी वजनाचे गुणोत्तर ((Body Mass Index – BMI) २५ पेक्षा जास्त असेल तर ती व्यक्ती जास्त वजन असलेली समजली जाते तर हे गुणोत्तर ३० पेक्षा जास्त असेल तर ती व्यक्ती स्थूल समजली जाते. हे गुणोत्तर व्यक्तीचे किलोग्रॅममधील वजन भागीले तिच्या मीटरमधील उंचीचा वर्ग (km/ms) अशा प्रकारे मांडले जाते.

* कुपोषण

ही संकल्पना जास्त समावेशक आहे. यामध्ये पोषणाशी संबंधित सर्व प्रकारच्या समस्यांचा समावेश होतो. यामध्ये मुख्य तीन प्रकार आहेत.

>   कमी पोषणाशी संबंधित बाबी

>   न्यून पोषण, अवपोषण, कमी वजन

>   सूक्ष्म पोषक द्रव्यांशी संबंधित बाबी

> सूक्ष्म पोषक खनिजे आणि व्हिटॅमिन्सची कमतरता

>   अतिरिक्त पोषणाशी संबंधित बाबी

अति वजन (Overweight३), स्थूलपणा (Obesity), आणि आहाराशी संबंधित असंसर्गजन्य आजार अशा सर्व बाबींचा समावेश होतो.

* शाश्वत विकास लक्ष्य (SDG)

सन २०१५ मध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेने स्वीकारलेल्या १७ शाश्वत विकास लक्ष्यांमध्ये भूकमुक्ती हे दुसऱ्या क्रमांकाचे लक्ष्य आहे. यामध्ये पुढील उद्दिष्टे समाविष्ट आहेत.

>   सन २०३० पर्यंत भुकेपासून मुक्ती आणि सर्वाना पर्याप्त, आरोग्यपूर्ण व पोषक आहार उपलब्ध करून देणे.

>   सन २०३०पर्यंत सर्व प्रकारचे कुपोषण संपविणे.

>   सन २०३० पर्यंत कृषी उत्पादन दुप्पट करणे.

>   सन २०३० पर्यंत शाश्वत अन्नोत्पादनाच्या पद्धती व प्रक्रिया प्रस्थापित करणे.

>   सन २०२०पर्यंत  बियाणी, पिके व पाळीव प्राण्यांच्या जनुक विविधतेचे संवर्धन करणे.

संयुक्त राष्ट्र पोषण कार्यक्रमाचे दशक (सन २०१६ ते २०२५)

संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारण सभेने एप्रिल २०१६मध्ये सन २०१६ ते २०२५ हे संयुक्त राष्ट्र पोषण कार्यक्रमाचे दशक म्हणून घोषित केले आहे. या दशकामध्ये पुढील सहा क्षेत्रांमध्ये कार्य करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

>    आरोग्यपूर्ण आहारासाठी अनुकूल व शाश्वत अन्न उत्पादन.

>    सर्वासाठी सामाजिक सुरक्षा आणि पोषणविषयक शिक्षण.

>    आरोग्य यंत्रणांचे पोषण गरजांशी समायोजन.

>    व्यापार आणि गुंतवणूक धोरणे पोषणास पूरक असतील याची खात्री करून घेणे.

>   सर्व वयोगटांच्या पोषणासाठी पूरक वातावरणनिर्मिती.

>   पोषणाशी संबंधित उत्तरदायित्व सुनिश्चित करणे.