डॉ.श्रीराम गीत

 सर, मी सध्या नियमित स्वरूपातील एम.कॉम आणि मुक्त विद्यापीठाच्या एमए लोकप्रशासन या दोन अभ्यासक्रमांच्या शेवटच्या वर्षाला असून माझे संगणक शिक्षण झालेले आहे. तसेच १० वीत ८९ व १२ वी मध्ये मला ७८ होते. पदवी बँकिंग अँड फायनान्स मध्ये पूर्ण केली आहे. त्यात मला ७८.१२ होते. सध्या माझे वय २२ वर्ष आहे. सध्या बँकिंगच्या व तत्सम परीक्षा देत आहे. परंतु त्यात यश अद्याप मिळालेले नाही. कामाचा अनुभव नाही. इंग्रजी संभाषण कौशल्यांमध्ये कमी पडतो. परंतु मराठी उपयोजित लेखनाची आवड आहे. आता घरच्या अडचणींमुळे पुढील काही महिन्यातच नोकरीची अत्यंत आवश्यकता भासणार आहे. मेहनत घेण्याची पूर्ण तयारी आहे. यासाठी बँकिंगच्या परीक्षांची तयारी पुढे सुरू ठेवून किमान चांगल्या वेतनाच्या खासगी थेट नोकरींचे (ज्यातून चांगले अनुभव आणि कौशल्य मिळतील) आणि पुढील करिअरचे कोणते पर्याय असू शकतात? तसेच कमी वेळेत आणि कमी किमतीत अथवा विनामूल्य असे कोणते निवडक ऑनलाइन किंवा ऑफलाइन व्यावसायिक कोर्सेस मला पुढील काळात उपयुक्त ठरतील? याबाबत मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती.

सार्थक रमेश गायकवाड, नाशिक.

तुला अकाउंटिंग व टॅक्सेशनमध्ये नाशिकमध्ये नोकरी मिळणे अजिबात कठीण नाही. अनेक कारखान्यांमध्ये या स्वरूपाची माणसे पाहिजे असतात. पगारा करता अडून न राहता काम शिकण्याला प्राधान्य दिल्यास नोकरी नक्की मिळेल. नाशिकमध्ये किवा आसपास मोठ्या ट्रेडिंग वा होलसेल पद्धतीचे काम करणाऱ्या कंपन्यांमध्येही जीएसटीची नीट माहिती घेतल्यास नोकरी मिळू शकते. अकौंटस व टॅक्सेशनमध्ये एकदम मोठा पगार फारच क्वचित मिळतो. कामाची प्रगती व प्रशिक्षणात दाखवलेला शिकण्याचा झपाटा यातून पगार वाढत जातो. सध्या नोकरी शोधण्यावर लक्ष केंद्रित करावे. अन्य कोर्सेस करण्याचा विचार नोकरीतील एक वर्ष किमान पूर्ण होईपर्यंत नको. विचारल्या प्रश्नाला त्याच भाषेत उत्तर देण्याचा प्रयत्न करताना इंग्रजी सुधारणे शक्य असते. या शिवाय इंग्रजी वृत्तपत्राचे मोठ्याने वाचन करणे ही उपयोगी पडेल. या दोन्हीचा सराव लगेच सुरू करू शकता.

हेही वाचा >>> शिक्षणाची संधी : बँकिंग टेक्नॉलॉजीमधील संधी

● माझी २०२३ ला प्लेन बीएससी झाली आहे, सध्या मी एमपीएससी कम्बाईनची तयारी करत आहे त्या मधून ( ASO, STI, PSI) यांपैकी एखादी पोस्ट मिळवून स्वत:ला स्थिर करण्याचा प्लॅन आहे, त्यानंतर मला यूपीएससीची तयारी करायची आहे, कारण ते माझे ध्येय आहे, परंतु माझा प्रश्न हा आहे की यांपैकी एखाद्या पदावर कार्यरत असताना यूपीएससीची तयारी करणे शक्य होईल का? माझा हा निर्णय योग्य ठरेल का? कृपया मार्गदर्शन करावे.

संध्या काटे तुझे कोणतेही मार्क न देता माझे प्लेन बीएससी झाले आहे या वाक्यावर तुझ्या यशापयशाबद्दल किंवा तयारी बद्दल मी कोणतेही नेमके विधान करू शकत नाही. तू उल्लेख केलेल्या तीन पदांसाठी खूप तीव्र स्पर्धा असते. सायन्स मधील पदवी पर्यंतच्या साऱ्या प्रवासात या तयारी मध्ये लागणारी एकही गोष्ट थेटपणे अभ्यासाला नसते. अजून एका गोष्टीचा उल्लेख करत आहे. इंजिनीअर, डॉक्टर, आर्किटेक्ट होण्यासाठी सायन्स घेतले जाते. तिकडे जाऊ न शकणारे बीएससी कडे वळतात हा गेल्या पंधरा वर्षातील ढोबळ अनुभव आहे. मात्र डॉक्टर, इंजिनीअर झालेल्या पैकी अनेक जण पदवीनंतर पुन्हा राज्यसेवा स्पर्धा परीक्षांकडे वळतात. त्यातीलच अनेक जण यशस्वी होतात हे नावानिशी मला माहिती आहे. गेल्या वर्षी पदवी हातात आल्यानंतर तू केलेल्या स्पर्धा परीक्षेच्या तयारी बद्दल काही माहिती दिली असतीस तर अधिक लिहिणे योग्य ठरले असते. तुला हव्या असणाऱ्या तीन पदांपर्यंत तू कधी पोहोचशील याचा विचार करण्याऐवजी या पदावरच्या व्यक्ती काय काम करतात त्याचे स्वरूप जाणून घेणे आणि नियमितपणे तीन वर्ष अभ्यास करून मिळेल ते पद घेणे यावर लक्ष केंद्रित करावे. या तीन वर्षासाठी तुझा खर्च कोण करणार? तीन वर्षानंतर अन्य पर्याय कोणचा? यावर घरच्यांशी बोलून निर्णय घ्यावा. तू न विचारताच एक शेवटचे उत्तर देत आहे. डीएड केव्हा बीएडचा प्लॅन बी म्हणून विचार करू शकतोस.