मुलांनी काही आगळं वेगळं करायचं ठरवलं की, अनेक कंगोरे एकदम टोकदारपणे समोर येतात. हे कंगोरे खरे किती, का खोटे याच वास्तव दाखवण्याचा हा ‘आरसा’. सोशल मीडिया व ऑनलाइनचा बोलबाला खूप असला तरीही नृत्य कलेला सुरुवात करताना प्रत्यक्ष गुरुच्या समोर शिकणे याला अजून तरी पर्याय नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शास्त्रोक्त नृत्य शिकणे ही अनेक मुलींची सुरुवात असते. त्याचे अनेक फायदे होतात. हालचालीतील सुबकता, देहबोली आपोआप बदलते. स्वत:च्या शरीराची ओळख होते. प्रत्येक स्नायूंच्या हालचालीतून व्यक्तीकरण्याच्या अभिजात छटांची ओळख नेमक्या वाढत्या वयात करून दिली जाते. समूहातील हालचाली करताना गटकार्याबद्दल, सहकाऱ्यांच्या आदराबद्दलची जाणीव नकळत निर्माण होते. शिवाय संपूर्ण शरीराला व्यायाम होतो ते वेगळेच. जाड्यता किंवा ओबेसिटी हा अलीकडचा लहानपणापासून दिसून येणारा विकार मुलींना कायमचा त्रास देतो. वयात आल्यानंतर त्यात प्रचंड भर पडते व पीसीओडी सारखे विकार कायमचे मागे लागतात. याचे प्रमाण आता दहा टक्के पेक्षा जास्त दिसून येते. हे समाजाचे व्यायामाकडे झालेले दुर्लक्ष म्हणून समजायला हरकत नाही. शाळकरी मुलींना सहसा जिमला पाठवले जात नाही, तशी त्यांच्याकडून मागणी ही नसते. मोकळ्या मैदानावर जाणे आणि भरपूर खेळणे हा प्रकार जवळपास बंद झाल्यात जमा आहे. मात्र, आजही नृत्याच्या क्लासची फी अनेक कुटुंबांना परवडण्याच्या पलीकडची आहे हेही वास्तव लक्षात घ्यायला हवे. अभ्यास महत्त्वाचा का नृत्य या साऱ्याची चर्चा सामान्यपणे इयत्ता सातवी पासून सुरू होते. आठवी, नववी, दहावी ही तीन वर्ष साऱ्या पालकांच्या दृष्टीने आता करियरवर फोकस करण्याची बनली आहेत. मन लावून शास्त्रोक्त नृत्य शिकण्या मधला हा एक फार मोठा अडथळा आहे. त्यावर कोणीच उपाय सांगू शकत नाही. फारच क्वचित नुपूरने हट्ट धरला आणि तो पुरवला गेला असे घडते. मात्र नुपूर समोरच्या अडचणींचा पाढा प्रत्येक मुलीला तोंड देऊन स्वत:च्या कुवतीप्रमाणे सोडवावा लागतो. यावर गेल्या ५० वर्षात फार फरक पडलेला नाही. हेही इथेच नमूद करणे गरजेचे आहे. नामवंत नृत्यांगना रोहिणी भाटे यांच्यासह सर्वांनाच स्ट्रगलर या भूमिकेतून जावे लागते. मात्र, गेल्या २५ वर्षांत यात निरनिराळ्या संधी उपलब्ध होत गेल्या आहेत. ज्याप्रमाणे निव्वळ चित्रकले ऐवजी उपयोजित चित्रकला हा सतत मागणीचा विषय बनला आहे, तशीच काहीशी परिस्थिती नृत्यकलेला ‘डान्स’, या शब्दातून झळाळी देऊ लागली आहे.

हेही वाचा >>> MPSC मंत्र : अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – चालू घडामोडी

कोरिओग्राफर, डान्स डायरेक्टर, बॅकग्राऊंड डान्सर, ग्रुप डान्सर अशा विविध अंगी भूमिकांतून उत्पन्नाची साधने निर्माण होऊ लागली आहेत. अनेक चॅनलवर चालणाऱ्या डान्स रिअॅलिटी शोमध्ये वय वर्षे पाच पासून तीसपर्यंत मुला मुलींचा सहभाग आढळतो. त्यावर टीका करणाऱ्यांची संख्या कमी नसली तरी त्यातून तुम्हाला प्रसिद्धी आणि पैसा दोन्ही मिळतो हे नाकारता येत नाही. या साऱ्या प्रकाराला बॉलीवूड डान्स या एका शब्दात अमेरिकेने बसवले आहे. ‘मै माधुरी दीक्षित बनना चाहती हू’, हे शक्य नसले तरीही आज माधुरी दीक्षित परीक्षक असताना तिच्यासमोर नृत्य करून दाखवणे अनेकांना शक्य झाले आहे. नावाजलेले कोरिओग्राफर त्यांचे स्वत:चे ट्रूप्स घेऊन निरनिराळ्या कार्यक्रमाला शोभा आणतात. शामक दावर हे त्यातील प्रमुख नाव. नृत्य म्हटले की मुलगी याला छेद देणारे नर्तक अभिनेते कमी नाहीत. मिथुन चक्रवर्ती, प्रभू देवा, गोविंदा, ऋतिक रोशन, शाहिद कपूर आणि सध्याच्या पिढीचा लाडका टायगर श्रॉफ यांचे पदलालित्य, नृत्यकौशल्य डोळ्यांचे पारणे फिटवणारे असते. नृत्यांगनांची यादी खूप मोठी होईल.

उपयोजन गरजेचे

नृत्य कला कोणत्याही प्रकारची असो त्याचा पटकन समाजाची गरज म्हणून वापर कसा करता येईल हा विचार करणारी कोणीही व्यक्ती त्यातून करिअरचा रस्ता पकडू शकते. रस्ता खडतर असला तरी काही वर्षांनी त्यात जम बसू शकतो. नृत्य, नाट्य, गायन, वादन या चारही कलांचे एकत्रिकरण करून ललित कलेतील पहिली पदवी निर्माण केली गेली आहे. सर्व विद्यापीठात हा अभ्यासक्रम बारावी नंतर उपलब्ध आहे. नंतर मास्टर्स करायचे झाले तर त्यासाठीही मोजक्या ठिकाणी आता सोय झाली आहे. गोवा किंवा भोपाळ येथील कला अकादमीमध्ये गुरुकुल पद्धतीत शिकण्याची सोय आहे.

खरे तर लखनऊमध्ये त्याला सुरुवात झाली. एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे ती म्हणजे किमान १६ वर्षांची खडतर वाटचाल वा तपश्चर्या या रस्त्यावर करावीच लागते. याच्या जोडीला थोडेफार अभिनय कौशल्य असेल तर ओटीटी, शॉर्ट फिल्म किंवा एखाद्या मोठ्या इव्हेंटमध्ये पूरक म्हणून अर्थप्राप्तीची शक्यता आहेत. पालकांचा आर्थिक पाठिंबा यामध्ये गृहीत धरलेला आहे. तोच नसेल तर मात्र फरपट होते. सोशल मीडिया व ऑनलाइनचा बोलबाला खूप असला तरीही या कलेला सुरुवात करताना प्रत्यक्ष गुरुच्या समोर शिकणे याला अजून तरी पर्याय नाही. काही वर्षांपूर्वी सरोज खान यांनी सलग अर्धा तास या पद्धतीत प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रमा एका चॅनल वर केला होता. पण त्यानंतर हा प्रयोग कोणी केल्याचे ऐकिवात वा पाहण्यात नाही. या सदराच्या जाणकार वाचकांनी यातून काय तो स्वत:चा बोध घ्यावा.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Training in indian classical dance learning indian classical dance zws
Show comments