सागर भस्मे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मागील लेखातून आपण महाराष्ट्रातील झोपडपट्ट्यांबाबत माहिती घेतली. या लेखातून आपण महाराष्ट्रातील सांस्कृतिक आणि धार्मिक पर्यटन स्थळांविषयी जाणून घेऊया. पण, त्यापूर्वी पर्यटन म्हणजे नेमकं काय ते बघू. ‘पर्यटक’ ही संज्ञा ‘ट्रॅव्हलर’ (प्रवासी) या शब्दाऐवजी वापरण्यात येते. पर्यटन म्हणजे प्रवास. पर्यटन हा एक स्वतंत्र राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय उद्योग म्हणून विकसित झाल्याचे दिसून येते. त्यामुळे राज्यातसुद्धा पर्यटन उद्योगाच्या संधी विकसित करणे महत्त्वाचे आहे.

पर्यटन उद्योगमुळे सेवाउद्योगांना महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त होते. आंतरराष्ट्रीय पर्यटनाप्रमाणेच अंतर्गत पर्यटनाचाही देशाच्या आर्थिक स्थितीवर अनुकूल परिणाम होत असतो. पर्यटनाचा अतिशय महत्त्वाचा लाभ म्हणजे मोठ्या प्रमाणावर निर्माण होणाऱ्‍या रोजगारसंधी. पर्यटन हा श्रमप्रधान सेवाउद्योग असल्यामुळे आणि विकसनशील देशांमध्ये मोठ्या संख्येने श्रमिकांची उपलब्धता असल्याने, पर्यटन उद्योगाचा विकास बेकारी व अर्धरोजगारी या समस्यांचे काही प्रमाणात निराकरण करू शकतो. आर्थिक लाभांखेरीज पर्यटनाच्या योगे विविध देशांतील भिन्नभिन्न लोक एकत्र येऊ शकतात व एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेऊ शकतात.

हेही वाचा- UPSC-MPSC : महाराष्ट्रातील झोपडपट्ट्या; कारणे, संबंधित समस्या अन् उपाययोजना

महाराष्ट्रातील सांस्कृतिक आणि धार्मिक पर्यटन व त्यांची वैशिष्ट्ये :

महाराष्ट्रात पुण्याचा गणेशोत्सव, अष्टविनायक, शिर्डीचे साईमंदिर, पंढरपूरचे विठ्ठल रुख्मिणी मंदिर, ज्ञानदेवाची आळंदी, तुकोबांचा देहू, कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची भवानी इत्यादी दैवतं महाराष्ट्राची नव्हे, तर भारतीयांचीसुद्धा आहेत. लेणी व शिल्पस्थाने यांच्या रूपाने महाराष्ट्राने आपल्या प्राचीन संस्कृतीचा वारसा जपून ठेवलेला आहे.

१) महाराष्ट्रातील अष्टविनायक स्थळे

राज्यात एकूण आठ गणपती स्थळे पश्चिम महाराष्ट्र भागात, तर आठ विदर्भातील जिल्ह्यात आहेत.

पुणे परिसरातील अष्टविनायक स्थळे : गणपती हे महाराष्ट्राचे प्रिय आराध्यदैवत आहे. अष्टविनायक हा शब्द ‘अष्ट’ आणि ‘विनायक’ या दोन शब्दांना जोडून तयार झालेला आहे. अष्ट म्हणजे आठ आणि विनायक म्हणजे आठ गणपती. अष्टविनायकांची मंदिरे (स्थळे) महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहेत. अष्टविनायकाची तीर्थयात्रा म्हणजे पुणे आणि त्याच्या आजूबाजूच्या क्षेत्रात वसलेल्या आठ प्राचीन पवित्र गणपतींच्या मंदिराचे दर्शन घेणे होय. या प्रत्येक मंदिरांचा स्वतःचा असा एक स्वतंत्र इतिहास आणि त्यासोबत जोडलेली स्वतःची आख्यायिका आहे. प्रत्येक मंदिरातील गणपतीच्या मूर्त्या विलक्षण आहेत. या प्रत्येक मंदिरातील गणेश मूर्तीचे रूप आणि गणपतीच्या सोंडेची ठेवण ही एकमेकांपासून भिन्न आहे.

  • मोरगाव, पुणे : मोरेश्वर
  • थेऊर, पुणे : चिंतामणी
  • रांजणगाव, पुणे : महागणपती
  • लेण्याद्री, पुणे : गिरिजात्मक
  • ओझर, पुणे : विघ्नहर
  • सिद्धटेक, अहमदनगर : सिद्धिविनायक
  • पाली, रायगड : बल्लाळेश्वर
  • महड, रायगड : वरदविनायक

विदर्भातील अष्टविनायक स्थळे :

  • नागपूर : टेकडी गणपती, नागपूर
  • नागपूर : शमी विघ्नेश, अदासा
  • नागपूर : अष्टदशभुज, रामटेक
  • यवतमाळ : चिंतामणी, कळंब
  • भंडारा : भृशुंड, मेंढा
  • भंडारा : सर्वतोभद्र, पौनी
  • चंद्रपूर : वरदविनायक, भद्रावती
  • वर्धा : सिद्धिविनायक, केळझर

या मंदिरांच्या संचाला ‘विदर्भातील अष्टविनायक’ असे म्हटले जाते.

२) देवीची साडेतीन पीठे :

प्रत्येक धार्मिक स्थळाचे एक वेगेळे वैशिष्ट्य आणि इतिहास असतो. त्यामुळे लोकांच्या मनामध्ये या धार्मिक स्थळांचे एक स्थान निर्माण झालेले असते. महाराष्ट्रातील देवींची शक्तिपीठे संपूर्ण देशामध्ये प्रसिद्ध आहेत.

  • श्री महालक्ष्मी, कोल्हापूर : शिलाहार राजवटीपूर्वी कार्हारक (आजचे कराड) येथील सिंध वंशातील राजाने हे मंदिर बांधलेले आहे. तसेच हे मंदिर कोल्हापूरच्या परिसरात आढळणाऱ्या काळ्या दगडापासून बनवण्यात आलेले आहे.
  • श्री तुळजाभवानी, तुळजापूर : तुळजाभवानी देवीचे मंदिर बालाघाटावरील एका डोंगरमाथ्यावर आहे. मंदिराच्या काही भागांची बांधणी हेमाडपंती आहे. तुळजाभवानी देवीच्या आशीर्वादाने शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा मिळाली होती.माहूरची रेणुकामाता, नांदेड : हे मंदिर तेराव्या शतकात देवगिरीच्या यादव राजाने बांधले होते. रामगड किल्ला हा माहूरच्या जवळपास आहे आणि त्यामध्ये सुंदर कोरीव काम केलेल्या लेणीदेखील आहेत.
  • सप्तश्रृंगी माता, नाशिक : हे मंदिर अर्ध देवीचे पीठ म्हणून संबोधले जाते. येथे महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती या तिघींचेही हे एकच रूप आहे, असे मानले जाते. सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये येथे सात उंच शिखरे आहेत, त्यावरूनच या ठिकाणाचे नाव सप्तश्रृंगी गड पडले आहे. ४८०० फूट उंचीवरील सप्तश्रृंग गडावर ही देवी वसलेली आहे.

३) ज्योतिर्लिंग स्थळे

भारतात एकूण १२ ज्योतिर्लिंग मंदिरे आहेत, त्यापैकी महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे पाच ज्योतिर्लिंग आहेत.

  • परळी-वैजनाथ, बीड : हे मंदिर देवगिरीच्या यादवांच्या काळात त्यांचा प्रधान श्रीकरणाधिप हेमाद्री याने बांधले आहे. अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला.
  • औंढा नागनाथ, हिंगोली : याचे प्राचीन नाव आमर्दक. ही एक शिवाची उपाधी असून, या नावाचा एक शैवपंथही अस्तित्वात होता. ‘आमर्दक सन्तान’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या शैव अनुयायांचे हे मुख्य पीठ असून, त्याचा प्रसार सातव्या ते अकराव्या शतकात झाल्याचे मानले जाते.
  • त्र्यंबकेश्वर : हे नाशिकपासून २८ कि.मी. अंतरावर असलेल्या ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी आहे. गोदावरी नदीचा उगम येथेच झालेला आहे. नाशिकमध्ये दर बारा वर्षांनी अर्ध सिंहस्थ कुंभमेळा भरतो. शैवांचे आखाडेही त्र्यंबकेश्वरात जमतात. येथे निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिर आहे.
  • भीमाशंकर, पुणे : हेमाडपंथी पद्धतीचे हे मंदिर आहे. या ज्योतिर्लिंगामधून पश्चिमी महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी एक असणारी भीमा नदी उगम पावते. हे ठिकाण सह्याद्रीच्या प्रमुख रांगेत असून अतिशय घनदाट अरण्याने वेढले गेले आहे. १९८४ साली या अरण्याची अभयारण्य म्हणून घोषणा झाली.
  • घृष्णेश्वर, संभाजी नगर : दौलताबादपासून सुमारे ११ कि.मी. अंतरावर आणि वेरूळ लेण्यांजवळ हे मंदिर आहे. मंदिराचे बांधकाम लाल रंगांच्या दगडामध्ये करण्यात आले आहे. या मंदिराचे नक्षीकाम अवर्णनीय आहे.

हेही वाचा – UPSC-MPSC : महाराष्ट्रातील जलसिंचन व्यवस्था कशी आहे? तिचे प्रकार कोणते?

४) महाराष्ट्रातील संतांची जन्मस्थाने व समाधीस्थाने :

महाराष्ट्राला संतांची मोठी परंपरा आहे. संतांनी आपल्या रोजच्या जीवनातील दाखले देत जनमानसाच्या मनावर संस्कार केले. पंढरपूर येथे यमाई तुकाई तलावाच्या काठावर ‘नमामि चंद्रभागा योजने’अंतर्गत येणाऱ्या तुळशी उद्यानाच्या भिंतीवर चित्रमय संतमेळा साकारला आहे.

संत व त्यांची जन्मस्थाने –

  • रामदासस्वामी यांचा जन्म जांब, जालनामधे झाला.
  • ज्ञानेश्वर, सोपानदेव, निवृत्तीनाथ, मुक्ताबाई यांचा जन्म आपेगाव, औरंगाबाद (संभाजी नगर) येथे झाला.
  • संत तुकराम – देहू, पुणे
  • संत नामदेव – नरसी, हिंगोली
  • जनाबाई – गंगाखेड, परभणी
  • गोविंद प्रभू – महानुभाव पंथाची काशी म्हणून ओळखला जाणाऱ्या अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथे झाला.

महाराष्ट्रात सुमारे २६ संत/सत्पुरुषांच्या समाध्या आहेत. त्यापैकी काही महत्वाचे स्थान पुढीलप्रमाणे :

  • गजानन महाराज – शेगांव बुलढाणा
  • संत ज्ञानेश्वर – आळंदी, पुणे
  • संत एकनाथ – पैठण, संभाजी नगर
  • चोखामेळा – पंढरपूर, सोलापूर
  • संत तुकराम – देहू, पुणे
  • साईबाबा – शिर्डी, अहिल्या नगर
  • गाडगे महाराज – अमरावती
  • रामदासस्वामी – सज्जनगड
  • गुरू गोविंदसिंग – नांदेड
  • राष्ट्रसंत तुकडोजी महाराज – मोझरी, अमरावती इ.

५) महाराष्ट्रातील प्रसिद्ध लेण्या :

लेणी म्हणजे डोंगरातील दगडांवर केलेले कोरीव काम होय. नाशिक येथे असणार्‍या पांडव लेण्यांमुळे ‘लेण’ हा शब्द आला. त्यापासूनच लेणी हा शब्द रूढ झाला. महाराष्ट्रात बौद्ध, जैन, हिंदू या धर्मांच्या-पंथांच्या विविध लेणी एकत्र किंवा वेगवेगळ्या स्वरूपात बघायला मिळतात.

१) अजिंठा लेणी : अजिंठा लेण्यांत गौतम बुद्धाच्या विविध भावमुद्रा तसेच बौद्ध तत्त्वज्ञानाला चित्रशिल्प रूपात व्यक्त करणाऱ्या शिल्पकला बघायला मिळतात. हा तालुका सोयगाव छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील इ.स. पूर्व २ रे शतक ते इ.स. ४ थे शतक अशा प्रदीर्घ कालखंडात निर्मिलेल्या २९ बौद्ध लेणी आहेत. या लेण्या छत्रपती संभाजीनगर शहरापासून १०० ते ११० कि.मी. अंतरावर वाघूर नदीच्या परिसराशेजारी आहेत. तसेच या लेणी नदीपात्रापासून १५-३० मीटर उंचीवर विस्तीर्ण अशा डोंगररांगामधे कोरल्या आहेत. अजिंठा लेणी ही जागतिक वारसा स्थान म्हणून युनेस्कोने इ.स. १९८३ साली घोषित केली आहे. जून २०१३ मध्ये महाराष्ट्रातील सात आश्चर्यांची घोषणा करण्यात आली असता त्यात अजिंठा लेणी हे प्रमुख आश्चर्य ठरले आहे.

२) वेरूळ लेणी (Ellora Caves) : ही छत्रपती संभाजी नगर शहरापासून ३० कि.मी. अंतरावरील वेरूळ गावातील जगप्रसिद्ध लेणी आहे. या लेण्यांची निर्मिती सह्याद्रीच्या सातमाळापर्वत रांगेतील डोंगरकड्यात साधारणतः पाचव्या ते दहाव्या शतकाच्या कालखंडात झाली. या लेण्यांची शैली ही द्रविडी शैली आहे. युनेस्कोने इ.स. १९८३ मध्ये वेरूळ लेणीचा समावेश जागतिक वारसास्थळांच्या यादीत केला.

हेही वाचा – UPSC-MPSC : अपरंपरागत ऊर्जासंपत्ती म्हणजे काय? या ऊर्जेची निर्मिती महाराष्ट्रात कुठे केली जाते?

याशिवाय महाराष्ट्रात बोरिवली येथे कान्हेरीच्या लेणी, नाशिकमध्ये ‘पांडवलेणी’, भाजे (जि. पुणे), जिंतूर (जि. परभणी), बेडसे (जि. पुणे.), मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील कार्ला येथे कार्ला लेणी, मुंबईपासून ११ कि.मी. अंतरावर रायगड येथे समुद्रात घारापुरी या बेटावर घारापुरी लेणी या लेणी आहेत.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc mpsc geography religious and cultural tourism in maharashtra mpup spb
First published on: 07-11-2023 at 17:03 IST