सागर भस्मे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मागील लेखातून आपण महाराष्ट्रातील वने आणि त्यांच्या प्रकारांबाबत माहिती घेतली. या लेखातून आपण सातपुडा पर्वतरांगेविषयी जाणून घेऊ या. सातपुडा पर्वतरांग ही भारतातील प्राथमिक पूर्व-पश्चिम पर्वतरांगांपैकी एक आहे; जी विंध्य पर्वतरांगेला समांतर असणारी आणि पश्चिमेला गुजरातपासून पूर्वेला ओडिशापर्यंत पसरलेली आहे. यात महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, आंध्र प्रदेश व तेलंगणा या राज्यांच्या काही भागांसह अनेक भारतीय राज्ये समाविष्ट आहेत. ही श्रेणी उत्तर वदक्षिण भारतामधील नैसर्गिक सीमा म्हणून काम करते आणि दख्खनच्या पठाराला उत्तरेकडील मैदानापासून वेगळे करते.

हेही वाचा – UPSC-MPSC : भूगोल : कावेरी नदीप्रणाली

भूवैज्ञानिक निर्मिती

सातपुडा पर्वतरांगेच्या निर्मितीचे श्रेय लाखो वर्षांच्या भूवैज्ञानिक प्रक्रियेला दिले जाते. यात प्रामुख्याने गाळाच्या खडकांच्या थरांचा समावेश आहे; ज्यामध्ये वाळूचा खडक, शेल व चुनखडी या प्रमुख खडकांचे प्रकार आहेत. याची उत्पत्ती प्राचीन महाखंडात सापडते; ज्याने या पर्वतांच्या उत्थानासाठी टेक्टोनिक हालचाली केल्या. कालांतराने नद्या, वारा आणि इतर नैसर्गिक शक्तींद्वारे होणारी धूप यामुळे आजच्या स्थितीतील सातपुडा पर्वतरांगेची निर्मिती झाली.

या पर्वतरांगेला सात घड्या किंवा सात डोंगररांगा आहेत. म्हणून या पर्वतरांगेचे नाव सातपुडा पर्वत, असे पडले आहे. सातपुडा पर्वतरांग नर्मदा नदी व तिच्या दक्षिणेकडील तापी नदी यांच्यादरम्यान स्थित आहे. या पर्वतरांगेतील सर्वांत उंच शिखर धूपगड असून, त्याची उंची १३५० मीटर आहे. सातपुडा पर्वतरांगेमुळे नर्मदा व तापी या अरबी समुद्राला मिळणाऱ्या दोन नद्या खचदरीमुळे अलग झालेल्या आहेत. त्यामुळे सातपुड्याची उत्तर सीमा नर्मदा नदीने; तर दक्षिण सीमा तापी नदीने निर्धारित केलेली आहे.

सातपुडा पर्वतरांगेची एकूण लांबी ९०० किमी असून, रुंदी सुमारे सरासरी १६० किमीपेक्षा अधिक आढळते. या पर्वतरांगेतील शिखरांची सरासरी उंची हजार मीटर पेक्षा जास्त आढळते; तर अगदी काहीच भागांत उंची फक्त ५०० मीटरपेक्षा कमी आढळते. या रांगेचा आकार साधारणपणे त्रिकोणाकृती असून, त्याचा पाया मैकल डोंगररांगेत; तर शिरोभाग पश्चिमेस रतनपूर येथे आहे. सातपुडा पर्वतरांगेने एकूण ७५ हजार चौ.किमी क्षेत्र व्यापलेले असून, सातपुड्याचा काही भाग वलीकरण व भूहालचालींतून निर्माण झालेला आहे.

हेही वाचा – UPSC-MPSC : भूगोल : महानदीप्रणाली

सातपुडा पर्वतरांगेचे प्रामुख्याने तीन भाग आढळतात. त्यामध्ये पश्चिमेकडील राजपीपला टेकड्या, मध्य भागातील बैतुल पठार महादेव व गाविलगड टेकड्या आणि पूर्वेकडे मैकल पर्वतरांग यांचा समावेश होतो. त्यांची सरासरी उंची ९०० मीटरदरम्यान असून पठारी प्रदेशांमध्ये ते एकमेकांना जोडलेले आहेत. राजपूत टेकड्यामुळे नर्मदा व तापी या दोन नद्यांची खोरी एकमेकांपासून वेगळी झाली आहेत.

सातपुडा पर्वतरांगेत प्रामुख्याने वालुकाश्म खडक, जांभा खडक; तर काही उंच भागांत बेसॉल्ट खडक आढळतो. त्यापैकी पंचमढीच्या प्रदेशात वालुकाश्म खडक उघड्या स्वरूपामध्ये आढळून येतो. तर उंच शिखरांवर जांभा खडक आढळतो. काही ठिकाणी आपल्याला बेसॉल्ट खडकापासून तयार झालेले सुळके आढळून येतात. पश्चिम भागातील मुख्य सातपुडा पर्वतरांगेत लाव्हापासून बनलेले गट पर्वत आहेत.

महाराष्ट्रामध्ये सातपुडा पर्वतरांगेचा प्रामुख्याने भाग धुळे, नंदुरबार व अमरावती या जिल्ह्यांमध्ये आढळतो. महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील तोरणामाळ पठार हे सातपुडा पर्वतरांगेत स्थित असून, त्याची सरासरी उंची सुमारे एक हजार मीटर आहे; तर अमरावती जिल्ह्यातील गाविलगड टेकड्यांतील सर्वांत उंच शिखर वैराट असून, या शिखराची उंची ११७७ मीटर आहे.

हेही वाचा – UPSC-MPSC : भूगोल : महाराष्ट्रातील मृदा आणि तिचे प्रकार

आदिवासी जमाती

भिल्ल, गोंड, कोरकू, कोल, बैगा, कातकरी, मावची, हलवा, माडिया, पावरे, धनका, कमार, मुडिया, भराई या येथील आदिवासी जमाती आहेत. तसेच याबरोबर बंजारा, मेंढीपालन करणारे शिलारी आणि शिकार करणारे फासेपारधीसुद्धा या प्रदेशांमध्ये आढळतात.

व्यवसाय :

व्यवसायाच्या दृष्टीने सातपुडा पर्वतरांगेतील भाग थोडासा मागासलेला असून, येथे पशुपालन, शेती, लाकूडतोड, तसेच नैसर्गिक साधनसंपत्तीवर अवलंबून असलेले डिंक, लाख, मध, तेंडूची पाने गोळा करणे या प्रकारचे व्यवसाय केले जातात. दक्षिणेकडील वैनगंगा व पेंच नदीच्या खोऱ्यामध्ये मैदानी प्रदेशात गहू, ज्वारी, मका, बाजरी आणि भात, तसेच ऊस व कापूस यांचे उत्पादन घेतले जाते. यामधील गोंड जमाती स्थलांतरित स्वरूपाची शेती करतात.

खनिज संपत्ती :

खनिज संपत्तीमध्ये सातपुड्यातील महादेव टेकड्यांमध्ये मँगनीजचे, पेंच नदीच्या खोऱ्यात दगडी कोळसा, तसेच बॉक्साईट, ग्रॅफाईट, डोलोमाईट, निकेल, अभ्रक, चुनखडी, जिप्सम, लोह इत्यादी खनिजे सातपुडा पर्वतरांगेत आढळतात.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc mpsc indian geography satpuda mountain range mpup spb