सागर भस्मे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मागील काही लेखांतून आपण महाराष्ट्रातील नद्या आणि प्रमुख डोंगररांगांविषयी माहिती घेतली. या लेखातून आपण महाराष्ट्रातील वने आणि त्यांच्या प्रकारांबाबत जाणून घेऊ या. महाराष्ट्रात एकूण वनक्षेत्र ६१,९३६.४२ चौ. किमी असून, हे क्षेत्र महाराष्ट्राच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी २०.१ % आहे. वास्तविक पाहता, पर्यावरण संतुलनासाठी भूमीच्या ३३ टक्के क्षेत्र वनाखाली असणे आवश्यक आहे. मात्र, त्या तुलनेत महाराष्ट्रातील वनक्षेत्र कमी आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वाधिक वनक्षेत्र गडचिरोली जिल्ह्यात असून, सर्वांत कमी वनक्षेत्र लातूर जिल्ह्यात आहे.

हेही वाचा – UPSC-MPSC : महाराष्ट्राचा भूगोल : कोकणातील नद्या

महाराष्ट्रातील वनांचे प्रमुख प्रकार

१) उष्ण कटिबंधीय सदाहरित वने : या वनांमध्ये पर्जन्याचे प्रमाण २०० सेंमीपेक्षा अधिक असते. सह्याद्रीच्या पायथ्याला सिंधुदुर्ग सावंतवाडी व सह्याद्रीच्या पश्चिमेकडील उतारावर जांभ्या मृदेच्या भागात ही वने आढळतात. या वनांमध्ये फणस, जांभूळ, सिडार, पांढरा, कावशी, ओक व नागचंपा हे वृक्षांचे प्रकार आढळतात. या वनातील वृक्षांची पाने अतिशय रुंद असतात आणि या वृक्षांचे लाकूड अतिशय कठीण असून, त्याचा ‘टिंबर’ म्हणून उपयोग होत नाही.

२) उष्ण कटिबंधीय निमसदाहरित वने : या वनांमध्ये पर्जन्याचे प्रमाण १५० ते २०० सेंटिमीटरपर्यंत असते. या वनामध्ये शिसम, बिबळा, कदंब, किंजल, रानफळस, आंबा, सुपारी व नारळ या प्रकारचे वृक्ष आढळतात. या वनांमधील वृक्ष आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे असून, ही वने महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने आंबोली, लोणावळा व इगतपुरी येथे आढळतात.

३) उपउष्ण कटिबंधीय सदाहरित वने : या वनांमध्ये पर्जन्याचे प्रमाण २५० सेंमीपेक्षा जास्त असते. या वनांमध्ये काटवी, बेहडा, जांभळा, अंजन, हिरडा, लव्हेंडर व तेचपन या प्रकारचे वृक्ष आढळतात. महाराष्ट्रामध्ये ही वने सातपुडा, गाविलगड टेकड्या, माथेरान, पाचगणी, महाबळेश्वर, अस्तंबा डोंगर या ठिकाणी आहेत. या वनातील वृक्ष आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे असून, त्यांची मोठ्या प्रमाणात तोड करण्यात आली असल्याने त्यांचे प्रमाण कमी झाले आहे.

४) उष्ण कटिबंधीय आर्द्र पानझडी वने : या वनांमध्ये पर्जन्याचे प्रमाण १२० ते १६० सेंटिमीटरदरम्यान असते. या वनांमध्ये मुख्य वृक्ष सागवान असून, त्याचबरोबर चंदन, पळस, आवळा, हिरडा, बिबळा, लेंडी व खैर या प्रकारचे वृक्ष आढळतात. या वनांचा प्रकार चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील चिरोल व नवेगाव टेकड्यांवर आढळतो. त्यांना अल्लापल्ली वने म्हणून ओळखले जाते. तसेच सह्याद्रीच्या पर्जन्यछायेच्या प्रदेशात सातमाळा, बालाघाट, हरिश्चंद्र, डोंगररांग, धुळे, ठाणे, पुणे, नाशिक, कोल्हापूर व भंडारा या भागांतही या वनांचे प्रकार आढळतात.

५) उष्ण कटिबंधीय शुष्क पानझडी वने : या वनांमध्ये पर्जन्याचे प्रमाण ५० ते १०० सेंटीमीटरदरम्यान आढळते. या वनांमध्ये सागवान, शिसम, तेंडू, पळस, धावडा, लेंडी, अंजन, बोर, बेल व आवळा या प्रकारचे वृक्ष आढळतात. ही वने महाराष्ट्रातील एकूण क्षेत्राच्या ६० टक्के असून, प्रामुख्याने ते सातपुडा पर्वतरांग, अजिंठा डोंगररांग, सह्याद्रीचा पूर्व भाग, विदर्भ, अमरावती, नागपूर, भंडारा व गोंदिया या ठिकाणी आढळतात.

हेही वाचा – UPSC-MPSC : महाराष्ट्राचा भूगोल : कोकण किनारपट्टी

६) उष्ण कटिबंधीय काटेरी वने : या वनांमध्ये पर्जन्याचे प्रमाण ५० सेंटिमीटरपेक्षा कमी असून, प्रामुख्याने नीम, कोरफड, हिरडा, निवडुंग, खैरे, बाभूळ, हिवर या प्रकारचे वृक्ष या वनांमध्ये आढळतात. महाराष्ट्रामध्ये काटेरी वनांचे क्षेत्र सर्वाधिक म्हणजे ६३ टक्के आहे. ही वने प्रामुख्याने पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, धुळे, जळगाव, अहमदनगर, सोलापूर, मराठवाडा, विदर्भातील काही भाग, तसेच पठारी प्रदेशांमध्ये आढळतात.

७) खाजण वने : खाजण वने महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने कोकण किनारपट्टीच्या भागांमध्ये आढळतात. या वनांना ‘दलदली वने’ असेसुद्धा म्हणतात. कारण- ही वने दलदलीच्या भागांमध्ये आढळतात. महाराष्ट्रामध्ये खाजण वनांचे क्षेत्र ३०४ चौ.किमी असून, त्यांचे सर्वाधिक प्रमाण रायगड, ठाणे, पालघर, मुंबई उपनगर या भागांमध्ये आहे. ही वने समुद्रकिनाऱ्याचे संरक्षण करण्याचे काम करतात. या वनांमध्ये प्रामुख्याने अॅव्हिसिनिया व रायझोफोरा या दोन वृक्षांचे प्रमाण आढळते. या वनांतील वृक्षांची उंची कमी असून, त्यांच्या खोडांना सर्व बाजूंनी मुळे फुटलेली असतात.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc mpsc maharashtra geography forests and their types mpup spb
First published on: 28-07-2023 at 19:00 IST