सासर-माहेरचा ‘गुंता’

पहिलं बाळंतपण हे माहेरीच झालं पाहिजे, अशी विचित्र प्रथा आपल्या समाजात रूढ झालेली आहे आणि अजूनही ती कटाक्षाने पाळली जाते.

पहिलं बाळंतपण हे माहेरी झालं पाहिजे, अशी विचित्र प्रथा आपल्या समाजात रूढ झालेली आहे आणि अजूनही ती कटाक्षाने पाळली जाते. बाळंतपण सासरी झालं काय किंवा माहेरी झालं काय, जोपर्यंत गर्भवती स्त्री आणि होणारं बाळ सुखरूप आहे तोपर्यंत कुणी काही आक्षेप घ्यायचं कारण नाही; पण जेव्हा या नियमाचं पालन करताना गर्भावस्थेत आणि बाळंतपणानंतर होणारा आर्थिक भार सासरच्या लोकांनी उचलायचा की माहेरच्या लोकांनी सोसायचा असे निकष लावले जातात तेव्हा मात्र आक्षेप घेतला पाहिजे असं वाटतं.

विवाहित स्त्रीचं जीवन माहेर आणि सासर या दोन कुटुंबांत विभागलं जातं. गर्भधारणा आणि अपत्यजन्म हा दोन्ही कुटुंबांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. अपत्यजन्माशी संबंधित, सासर-माहेरच्या नात्यात या आनंदाच्या क्षणी काही वेळेस काही तणावपूर्ण प्रसंग घडताना दिसून येतात. यामुळे या जिव्हाळ्याच्या नात्यात कटुता निर्माण होते आणि संवेदना बोथट होतात. ‘माहेरच्या माणसांना कायम दुय्यम स्थान आणि सासरच्या लोकांचा सन्मान’ ही मानसिकता ग्रामीण भागात राहणाऱ्या अशिक्षित लोकांमध्ये आजही आहे, याचं दु:ख मानावं की शहरात राहणाऱ्या, सुशिक्षित लोकांच्या मनातून ही भावना अजूनही बऱ्याच प्रमाणात अस्तित्वात आहे, याबद्दल संताप व्यक्त करावा हे कळत नाही. शहरातून, काही सुशिक्षित कुटुंबांतून हा विचार बदलताना दिसतो; पण त्या बदलाचा वेग कमी आहे.

पहिलं बाळंतपण हे माहेरीच झालं पाहिजे, अशी विचित्र प्रथा आपल्या समाजात रूढ झालेली आहे आणि अजूनही ती कटाक्षाने पाळली जाते. फार कमी कुटुंबांत या प्रथेचं पालन होत नसावं. बाळंतपण सासरी झालं काय किंवा माहेरी झालं काय, जोपर्यंत गर्भवती स्त्री आणि होणारं बाळ सुखरूप आहे तोपर्यंत कुणी काही आक्षेप घ्यायचं कारण नाही, असं आपण थोडय़ा वेळासाठी मान्य करू; पण जेव्हा या नियमाचं पालन करताना गर्भावस्थेत आणि बाळंतपणानंतर होणारा आर्थिक भार सासरच्या लोकांनी उचलायचा की माहेरच्या लोकांनी सोसायचा असे निकष लावले जातात तेव्हा मात्र आक्षेप घेतला पाहिजे, असं वाटतं. या सर्व घडामोडीत बऱ्याचदा सासरची मंडळी माहेरच्या लोकांची परीक्षा बघताना दिसून येतं, ते वाईट आहे.

एकदा काय झालं, एक गर्भवती प्रसूतिवेदना सहन करत असताना अमुक एका कारणासाठी या रुग्णाचं सिझेरियन करणे जास्त योग्य राहील असा सल्ला एका डॉक्टरने दिला. त्या प्रसंगी सासर आणि माहेर दोन्ही बाजूंचे लोक उपस्थित होते. सासरच्या लोकांनी लगेच होकार दिला- डॉक्टर, तुम्हाला जर वाटत असेल की सिझेरियन करणं योग्य आहे तर अवश्य करा, आमची हरकत नाही. तेवढय़ात माहेरची मंडळी त्या डॉक्टरला जरा बाजूला घेऊन म्हणाले, ‘‘लगेच सिझेरियन करणं आवश्यक आहे का? अजून थोडीशी वाट पाहता येणार नाही का?’’ त्यावर ते डॉक्टर म्हणाले, ‘‘सासरच्या लोकांनी तर परवानगी दिली आहे ना!’’ त्यावर त्या गर्भवतीचे आई-बाबा म्हणाले, ‘‘ते हो म्हणतील, त्यांना थोडंच बिल द्यायचं आहे? पैसे तर आम्ही खर्च करणार आहोत.’’

माहेरच्या माणसांना वाटत असतं की, झाला तर झाला खर्च, पण आपल्या लेकीचं बाळंतपण चांगल्या खासगी रुग्णालयात करावं म्हणजे सासरी आपल्या मुलीला त्रास होणार नाही; नाहीतर ते लोक आपल्याला ‘नावं’ ठेवतील.

दुसऱ्या बाळंतपणाच्या वेळी हीच सासरची मंडळी आपल्या सुनेला, सरकारी रुग्णालयात नेताना आम्ही पाहिलं आहे, कारण तिथे पैसे लागत नाहीत. ‘तुम्ही या वेळी असं का केलं?’ हा प्रश्न माहेरच्या लोकांना उघडपणे विचारण्याची सोय नसते पण मनात कुठेतरी हा दुजाभाव घर करून राहतो, जो सासर-माहेरातील अंतर कळत-नकळत वाढवत असतो. माहेरच्या लोकांनी पहिल्या बाळंतपणावर खर्च केला पाहिजे, इथे हा प्रश्न संपला तरी चाललं असतं. त्यापुढे ‘बोळवण’ नावाचा एक प्रकार असतो. बाळंतपणानंतर दोन-तीन महिन्यांनंतर जेव्हा लेक सासरी जाते, तेव्हा माहेरच्या लोकांनी जावयाला, जावयाच्या आई-वडिलांना, आजी असेल तर आजी वगैरे नातेवाईकांना नवीन कपडे, चांगल्यापैकी साडी, भेटवस्तू देऊन पाठविण्याच्या प्रथेला ‘बोळवण’ म्हणतात. मी एका बाळंत झालेल्या स्त्रीला आणि तिच्या आईला म्हटलं, ‘‘हा सगळा प्रकार बंद करा, तू तुझ्या नवऱ्याला सांगू शकत नाही का की माझ्या आई-बाबांना ‘बोळवण’ प्रकार परवडत नाही म्हणून?’’ त्यावर तिने दिलेलं उत्तर मला अनपेक्षित होतं. ती म्हणाली, ‘‘माझा नवरा म्हणाला, बोळवण तर करायलाच पाहिजे, आम्ही आमच्या बहिणींचं केलं नाही का?’’ ग्रामीण भागात अजूनही फक्त पहिलंच नाही तर प्रत्येक बाळंतपण माहेरीच झालं पाहिजे, असं मानणारी आणि प्रत्यक्षात आणणारी कुटुंबंदेखील आहेत. हा झाला बाळंतपणावर होणाऱ्या खर्चाचा मुद्दा. याशिवाय केवळ पहिलं बाळंतपण माहेरी व्हायला पाहिजे या नियमामुळे बाळंतपणाच्या चांगल्या सुविधा असलेल्या गावातून केवळ माहेरी गेलं पाहिजे म्हणून खेडय़ात गैरसोयीच्या ठिकाणी काही ग्रामीण लोक जातात आणि प्रसूतिवेदना सुरू झाल्यानंतर, त्या अवस्थेत रात्री-बेरात्री भाडय़ाचं वाहन करून शहरात घेऊन येतात. या सासर-माहेरच्या गुंत्यामुळे त्या गर्भवतीच्या किंवा होणाऱ्या बाळाच्या जिवावर बेतू शकतं हे, हा नियम पाळणाऱ्या लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे.

शहरी भागातदेखील काही नमूद करण्याजोग्या घटना घडतात. एक सुशिक्षित-कायद्याचा पदवीधर, न्यायाधीश होण्याची परीक्षा उत्तीर्ण झालेली, उच्चवर्णीय, आर्थिक परिस्थिती चांगली असलेल्या कुटुंबातील गर्भवती माझ्याकडे नियमित तपासणीसाठी येत होती. सातव्या महिन्यात तपासणीसाठी आलेली असताना, तिनं मला सहज विचारलं, ‘‘डॉक्टर, मी प्रवास करू शकते का?’’ मी ‘हो’ म्हणालो. विचारलं, ‘‘कुठे जाताय?’’ ती म्हणाली, ‘‘तुळजापूरला. माझं माहेर आहे तिथे आणि माहेरी जरा आरामाला जावं म्हणते.’’ तिच्या सोबत तिचे पती आलेले होते. ते गावातील प्रथितयश वकील. मी त्यांना जरा तक्रारीच्या सुरातच म्हणालो, ‘‘वकीलसाहेब, हे बरोबर नाही. आपल्यासारख्या सर्वार्थाने परिपूर्ण असलेल्या घरातल्या स्त्रीलादेखील गर्भावस्थेत आरामासाठी माहेरी जावं लागतं हे काही मला पटलं नाही. तिला सासरी आराम का मिळू नये? तिला सासरी आराम कसा मिळेल हे बघण्याची जबाबदारी तुमची.’’ ‘‘तुम्ही सांगताय ते बरोबर आहे, मी करतो प्रयत्न,’’ असं म्हणून ते गेले. पंधरा दिवसांनंतर ते जोडपं परत तपासणीसाठी आलेलं असताना मी त्यांना सहज विचारलं, ‘‘काय मग जाऊन आलात ना तुळजापूरला, झाला आराम माहेरी?’’ त्यावर ती म्हणाली, ‘‘मागच्या खेपेला तुम्ही  समजावून सांगितल्यानंतर आम्हाला पटलं. मी माहेरी गेलेच नाही, माझ्या आईलाच बोलावून घेतलं इथे नांदेडला!’’ काय बोलावं अशा वेळी?

समजा एखाद्या गर्भवतीला, अमुक तिचा रक्तदाब वाढलेलं आहे म्हणून किंवा अन्य काही कारणांमुळे जर डॉक्टरने बजावून सांगितलं की, तिला ‘बेडरेस्ट’ची गरज आहे, तर लगेच नवरा म्हणतो, ‘‘असं आहे का? ठीक आहे. मग मी  तिला माहेरी पाठवून देतो.’’ त्याच्या बोलण्यातली ही सहजताच बरंच काही सांगून जाते.

बाळंतपणानंतर सर्वसाधारणपणे दीड महिन्यानंतर काहीही त्रास नसला तरी गर्भवतीने डॉक्टरकडे तपासणीसाठी यावं असं अपेक्षित असतं. एकदा एक आई म्हणाली, ‘‘हिच्या सासरच्या मंडळींचा सारखा तगादा आहे, हिला सासरी पाठवा म्हणून, पण मी चार-सहा महिने तरी पाठवणार नाही. कारण हिची सासू लई खराब आहे, तिला बिलकूल आराम मिळणार नाही. तुमी तिच्या सासरच्या लोकांना सांगा, हिची तब्येत अजून बराबर न्हाही, हिला आरामाची गरज हाय म्हणून. तुमी डॉक्टरांनी सांगितलं तर त्यांना पटल, नुसत्या आमच्या सांगण्यावर ते लोक ऐकत नाहीत.’’ असंही घडतं काही वेळा.

गर्भावस्थेत आणि बाळंतपणानंतर, स्त्रीला सासरीदेखील आवश्यक तो आराम मिळालाच पाहिजे. हे केवळ कर्तव्यापोटी न होता, मनातून झालं पाहिजे. खर्च सिझेरियनचा असो वा नॉर्मलचा, आर्थिक परिस्थिती समाधानकारक असो अथवा नसो, प्रत्येक कुटुंबात, अर्धा खर्च सासरच्या आणि अर्धा खर्च माहेरच्या लोकांनी करायला काय हरकत आहे? वास्तविक पाहता, पहिलं बाळंतपण माहेरी ही प्रथा बंद होऊन, लग्न खर्चापासून ते गर्भावस्था, बाळंतपणापर्यंतचे सर्व खर्च ‘फिफ्टी-फिफ्टी’ अशी प्रथा रूढ झाल्यास, सासर-माहेरचा झालेला हा अनावश्यक गुंता सोडवता येईल.

atnurkarkishore@gmail.com

chaturang@expressindia.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अपत्यजन्माचे समाजभान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Dr kishore atnurkar article on pregnancy

ताज्या बातम्या